किरकसालमध्ये निसर्ग पर्यटनाची नांदी; दुष्काळी गावाला मिळाली रोजगाराची संधी

eco tourism started in kiraksal

    28-Nov-2023   
Total Views | 586
kiraksal bio


मुंबई (समृद्धी ढमाले):
सातारा जिल्ह्यातील किरकसाल या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या गावामध्ये आता निसर्ग पर्यटनाची (kiraksal) सुरूवात होत आहे. पुण्या-मुंबईतील पर्यटकांना किरकसालची (kiraksal) जैवविविधता पाहता यावी तसेच स्थानिकांना ही रोजगाराच्या संधी मिळाव्या या दृष्टीकोनातून निसर्ग पर्यटनाची सुरूवात करण्यात आली आहे. (kiraksal)


माण तालुक्यातील किरकसाल हे गाव दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, या गावातील लोकांनी २०१९ साली आपल्या गावातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी 'किरकसाल जैवविविधता व्यवस्थापन समिती'ची स्थापना केली. या गावात विस्तारलेली गवताळ कुरणे पाहायला मिळतात. त्यामुळे गावकऱ्यांनी लाॅकडाऊनंतर या गवताळ प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या जैवविविधतेची नोंद केली. या नोंदी जैवविविधता नोंदवहीत नमूद केल्या. सद्यपरिस्थितीत या नोंदवहीत २०४ प्रजातीचे पक्षी, ८४ प्रजातीची फुलपाखरे आणि सस्तन प्राण्याच्या १५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. याच जैवविविधतेला जगसमोर उलगडून त्याव्दारे गावाला उपजीविकेची संधी देण्यासाठी निसर्ग पर्यटनाला सुरुवात होणार आहे.


तुरिही ट्रॅव्हल कंपनी आणि गावकरी यांनी एकत्र येत या प्रकल्पाची सुरूवात केली आहे. डिसेंबर महिन्यात या प्रकल्पामधील पहिली इको-टुर आयोजित केली गेली आहे. गुरूवार दि. २८ डिसेंबर ते रविवार दि. ३१ डिसेंबर दरम्यान ही चार दिवसांची निसर्ग सहल आयोजित करण्यात आली असून या सहलीमध्ये वन्यजीव सफारी, विविध ठिकाणांवर पक्षीनिरिक्षण अशा अनेक संधी पर्यटकांना मिळणार आहेत. यासाठी संपर्क - ९४४९८५५८३५ आणि ९७०२००१४३७ या क्रमांकावर करावा. दै. 'मुंबई तरुण भारत'ने देखील या गावाला प्रोत्साहन मिळावे म्हणून यंदाच्या 'स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वाॅरियर्स अवाॅर्ड'मधील 'बडिंग नॅच्युरिलिस्ट' या श्रेणीमध्ये किरकसालची जैवविविधता नोंदवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे कार्यकर्ते चिन्मय सावंत यांचा गौरव केला होता.  
WWFच्या सहाय्याने होणार लांडग्यांचे संवर्धन

WWF म्हणजेच वर्ल्ड वाईड फंड या संस्थेने किरकसाल गावातील जैवविविधता पाहुन लांडगा संवर्धन प्रकल्पासाठी निधी दिला आहे. ग्रासलँड्स म्हणजेच गवताळ प्रदेश परिसंस्थेतील लांडग्यांचे महत्त्व अधोरेखीत करत लांडग्याचे संवर्धन करण्यात येणार असून त्यामध्ये जैवविविधता सर्वेक्षण (Biodiversity Monitoring), क्षमता निर्माण कार्यशाळा (Capacity Building Workshop) आणि दस्तावेजीकरण (Documentation) करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गवताळ प्रदेश परिसंस्थेचे संवर्धन तसेच स्थानिकांना रोजगार मिळण्यास ही मदत होणार आहे.  



समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121