पाटणा : बिहारच्या शिक्षण विभागाने २०२४ साठीचे शालेय सुट्यांचे कॅलेंडर जारी केले असून यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश हिंदू सणांच्या सुट्या रद्द केल्या आहेत, तर ईद आणि मोहरमच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय सरकारी शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारच्या साप्ताहिक सुटीचा आदेश जारी केला. केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी या आदेशाचा निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार सरकारने २०२४ साठी जारी केलेल्या सुटीच्या कॅलेंडरमध्ये रक्षाबंधन जन्माष्टमी, रामनवमी, महाशिवरात्री. मकरसंक्रांती, नागपंचमी या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वकरी ईद आणि मोहरमची सुटी एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. हे सुट्यांचे कॅलेंडर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना लागू होईल.
याशिवाय दिवाळीलादेखील केवळ एक दिवस सुटी देण्यात आली आहे. तसेच ईदला तीन दिवसांच्या सुट्या आहेत. नवीन कॅलेंडरमध्ये ६ मुस्लिम सणांना एकूण १० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. तर यात चार हिंदू सणांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी ९ दिवसांच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
बिहारमध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या सुट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नितीश कुमार सरकाच्या या निर्णयामुळे भाजपकडून टीका करण्यात आली आहे. भाजपने या आदेशाला 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ बिहार' असे म्हटले आहे.
बिहार सरकारच्या या कृत्याचा केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनीदेखील निषेध केला आहे. ते म्हणाले की, "तृष्टीकरणाचे सरदार असलेल्या काका पुतण्याच्या सरकारचा हिंदूविरोधी चेहरा पुन्हा एकदा पुढे आला आहे. एकीकडे मुस्लिम सणांच्या सुट्या वाढवण्यात येत आहेत. तर दुसरीकडे हिंदू सणांच्या सुट्या रद्द करण्यात येत आहे. मतपेढीसाठी अशा प्रकारे सनातन आणि हिंदू धर्माचा खेळ करणाऱ्या सरकारचा धिक्कार करतो," असे त्यांनी म्हटले आहे.