मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयासोबत तिने सुत्रसंचलनात देखील बाजी मारली आहे. आजवर विविध मालिका, वेब मालिका आणि चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारलेल्या प्राजक्ताची एक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. झी मराठी वाहिनीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील मेघना. या मालिकेला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी मालिकेचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, "आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन १० वर्ष झाली. त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता. आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम”.
प्राजक्ता माळीने पुढे असेही लिहिले आहे की, "आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या.) आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत. #आदित्य-मेघना. महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयुष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. #बाबाजी लक्ष असू द्या"