राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लाभलेल्या कर्मयोगी पू. सरसंघचालकांच्या प्रेरणादायी नेतृत्वाच्या आणि अगणित कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा हिंदू राष्ट्र एकसंघ ठेवण्यामध्ये अमूल्य वाटा आहे.पू. डॉक्टरजी म्हणायचे की, “शरीर बलवान होण्यासाठी प्रतिदिन नियमितपणे व्यायाम करावा लागतो, त्याचप्रमाणे देशव्यापी प्रचंड शक्ती निर्माण होण्यासाठी राष्ट्रदेवतेची व्यापक प्रमाणावर ‘दैनंदिन उपासना’ करावी लागते.”याच दैनंदिन उपासनेसाठी, संघाची दोन ठिकाणं आहेत पहिलं म्हणजे दैनंदिन शाखा आणि दुसरे ठिकाण म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मोतीबाग!
मोतीबाग ही इतिहासरुपी वास्तू आहे. मूळची वास्तू 103 वर्षं जुनी आहे. आताचे ‘309, शनिवार पेठ’ ही जागा मूळची कानोजी आंग्रे यांचे सरदार बिवलकर यांची होती. संघाच्या कार्यालयासाठी, एकत्रिकरणासाठी एखादी मोठी जागा उपलब्ध करण्याची गरज संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. बाबा भिडे आणि सर्व तेव्हाच्या सर्व कार्यकर्त्यांना जाणवली आणि मग जागेचा शोध सुरू झाला आणि मध्यवर्ती भागात असलेली ही वास्तू त्यांच्या निदर्शनास आली.2004 साली मोतीबागेचे काही बांधकाम झाले. गोसेवा, धर्म जागरण, पर्यावरण व इतर अनेक अशा संघाच्या आयामांना सुरुवात झाली होती. म्हणजेच संघाचे काम वाढत चालले होते. या सर्व आयमांचे प्रमुख कार्यकर्ते, त्यांच्या बैठकी, वास्तव्य येथे होत होते. पुणे हे महाराष्ट्र प्रांताचे मुख्य कार्यालय असल्यामुळे येथे मोठ्या वास्तूची गरज भासायला लागली म्हणून या जागेचा पुनर्विकास करावा, असे सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे आले.
2021 पासून या कामाची खरी सुरुवात झाली. 2021च्या भाऊबीजेच्या दिवशी भूमिपूजनाला सरदार बिवलकरांचे वंशज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.महत्त्वाचे म्हणजे, ’स्वमे स्वल्प समाजाय सर्वस्व’ या पद्धतीने सर्व कंत्राटदार, वास्तुविशारद, सर्व सेवा पुरवणारे यांनी स्वतःच्या व्यावसायिक फायदा न बघता, संघाचे काम आहे म्हणून संपूर्ण सेवा दिलेली आहे .आताचे बांधकाम पर्यावरणपूरक असे झालेले आहे. ओल्या कचर्याचे संपूर्ण वर्गीकरण आणि त्यापासून मिथेन गॅसची निर्मिती आणि त्याचा वापर स्वयंपाकासाठी करणे, नेट मीटरिंग-सोलर सिस्टिम तसेच पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर या व अशा अनेक पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून मोतीबागेच्या वास्तूची निर्मिती झालेली आहे.
1925 साली पू. डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली, तेव्हापासून गेली 98 वर्षं संघकार्य, राष्ट्रकार्य अखंड चालू आहे. संघ शताब्दीकडे वाटचाल करतोय, म्हणजे संघाला 100 वर्षे होत आहेत, या ईश्वरी कामात आपला सहभाग असणे, हे आपले भाग्यच! आपण या ईश्वरी कामात, राष्ट्रकामात नसलो तरीसुद्धा हे ईश्वरी काम सदैव चालू राहणार, यात शंका नाही. अखंड भारत व हिंदू राष्ट्र घडण्यामध्ये माझा सहभाग असणे, हे ईश्वराकडे मागणे करून दररोज माझी प्रार्थना शाखेमध्ये होऊ दे, अशी ईश्वरचरणी मागणी करुयात.
संघ एक कुटुंब आहे. संघाचे काम म्हणजे व्यक्तिनिर्माण. संघाचे काम म्हणजे ईश्वरी कार्य, सेवारुपी कार्य. व्यक्ती निर्माण हाच संघ शाखेचा मूळ गाभा आहे. मोतीबागेत सर्व स्वयंसेवकरुपी मोती येतात आणि या सर्व मोत्यांची बाग म्हणजेच आपली मोतीबाग!या वास्तूच्या बांधकामाची सरुवात 2003-04 साली झाली. तेव्हाची एक आठवण आवर्जून सांगतो. मोतीबागेमध्ये त्या वेळेचे माननीय पू. सरसंघचालक रजूभैय्या यांनी एक बैठक घेतली होती, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की, “ही वास्तू अशा पद्धतीने बांधा की वस्ती विभागातला आपला स्वयंसेवक, की जो आर्थिकदृष्ट्या सक्षम नसला तरी या ठिकाणी आल्यावर त्याला बिचकायला होता कामा नये. या वास्तूमध्ये आल्यावर तो त्याच्या घरीच आहे, हे त्याला जाणवलं पाहिजे. जिव्हाळा, आपुलकी तिथेच तयार होईल,“ हे त्यांनी आवर्जून सांगितलं.
सांगायला आवडेल की, याच पद्धतीने या वास्तूची निर्मिती झाली आहे. याची प्रचिती आता आपल्या सगळ्यांना येथे आल्यावर होईलच. या विचारधारणेला कुठेही तडा जाणार नाही, याची संपूर्ण जबाबदारीच जणू आताचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत प्रचारक अण्णा वाळिंबे यांनी घेतली होती. समाजामधील सर्व स्वयंसेवकांनी यासाठी त्यांच्या उत्पन्नामधून ऐच्छिक निधी मोतीबागेच्या पुनर्बांधणीसाठी दिलेला आहे.दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 मोतीबाग आपल्या सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे, आवर्जून बघण्यासाठी यावे.वरील बरीचशी माहिती मला ’भारतीय सांस्कृतिक संवर्धन संस्थे’चे अध्यक्ष रजत जोशी यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. त्यांचे मनापासून आभार.वास्तू म्हटलं की, आपल्या घरातल्यांसाठी असते, स्वतःसाठी असते किंवा आपल्या पुरती असते, असं म्हटलं जातं. मात्र, मोतीबाग ही वास्तू समाजातील प्रत्येक स्वयंसेवकासाठी आहे. संघ म्हणजे समाज आणि समाज हे कुटुंब आणि या कुटुंबाचची वास्तू म्हणजेच आपली मोतीबाग!
-योगेश देशपांडे