नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याच्या आणि जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने भाजपने देशव्यापी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिनानिमित्त रांची, झारखंड येथून याची सुरुवात केली होती. देशातील २ लाख ५ हजार ग्रामपंचायतींमध्ये प्रचार अभियान म्हणून चालणारी ही यात्रा पहिल्या टप्प्यात १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान २१ राज्यांतील ६८ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता देशातील उर्वरित भागांमध्ये ही यात्रा ३ डिसेंबर पासून सुरू होऊन २६ जानेवारी २०२४ रोजी चालणार आहे.
भाजपच्या या यात्रेदरम्यान आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय योजनांची नोंदणी आदींसह विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच माय भारत पोर्टलवर युवकांची नोंदणी केली जाणार आहे. या यात्रेसाठी भाजपने राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, तरुण चुघ आणि सुनील बन्सल यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आखलेल्या रणनीतीनुसार केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य सरकारच्या मंत्र्यांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांना यात्रेत सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकसभा प्रवास योजनेत सहभागी केंद्रीय मंत्री या योजनेंतर्गत आपापल्या मतदारसंघांमध्ये ३ दिवस राहणार आहेत. यामध्ये सर्व खासदारांना प्रवास करताना जास्तीत जास्त वेळ आपापल्या मतदारसंघात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे खासदार नाहीत, तेथे राज्यसभा खासदारांना राहण्यास सांगण्यात आले आहे.
भाजप आणि यात्रांचे अतुट नाते
भाजप आणि यात्रा यांचे अतुट नाते आहे. भाजपने यापूर्वी सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेद्वारे भारतीय राजकारणात हिंदुत्वास केंद्रस्थानी आणले होते. त्यानंतरही भाजप नेतृत्वाने वेळोवेळी रथयात्रांद्वारे आपली भूमिका मतदारांसमोर मांडली होती. आता यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची कामगिरी मतदारांसमोर मांडण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे आयोजन केले आहे. ही यात्रा देशातील सर्व जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जाणार आहे. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.