पुण्यात तळजाईला २०१६ मध्ये विराट स्वरुपात झालेल्या ‘शिवक्ती संगम’चे नियोजन, पूर्वतयारी आणि सूत्रसंचालन हे मोतीबागेत कार्यालय स्थापन झाले होते. त्याच्या व्यवस्थापनात कैलास सोनटक्के यांच्यासह सह-महाव्यवस्थापक राहिलेल्या रवींद्र शिंगणापूरकर यांच्या आठवणी...
दि. १ ऑक्टोबर, २०१४ या दिवशी, दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी होणारी महानगर समन्वयाची बैठक संपल्यानंतर आपल्याला भेटायचे आहे, असे कैलासजी सोनटक्के यांनी सांगितले. बैठकीनंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील स्वयंसेवकांच्या एकत्रीकरण कार्यक्रमाविषयी तसेच त्याच्या व्यवस्था विषयात मला सह-महाव्यवस्थापक म्हणून दायित्व स्वीकारता येईल का, असे विचारले.त्यानंतर या कार्यक्रमाच्या तयारीसाठी विविध बैठकांना सुरुवात झाली. ठिकाण होते, अर्थातच मोतीबागेतील बैठक कक्ष..या मोठ्या उपक्रमाच्या व्यवस्थेची पूर्वतयारी म्हणून आम्ही ‘देवगिरी संगम’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व सर्व व्यवस्थांचा आढावा घेतला. या भेटीनंतर मोतीबागेमध्ये जानेवारी २०१६ मध्ये होणार्या ‘शिवशक्ती संगम’ची तयारी करण्यासाठी कार्यालयाची सुरुवात झाली. कैलासजी सोनटक्के, आनंद ओक, धनंजय काळे, बाळासाहेब दळवी, गिरीधारी बुचडे, राजाभाऊ कदम, रवी धुमाळ, डॉ. प्रवीण दबडघाव, अण्णा वाळिंबे, तसेच अन्य संघ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र सातत्याने सुरू झाले.
पूर्वीच्या मोतीबागेत मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असणार्या जिन्यावरून वर गेल्यावर समोरच्या खोलीमध्ये ‘शिवशक्ती संगम’चे कार्यालय सुरू करण्यात आले. याच कार्यालयामध्ये ‘शिवशक्ती संगम’च्या प्राथमिक आराखड्याच्या बैठका झाल्या. १०० एकराचा प्रत्यक्ष कार्यक्रम परिसर, त्याला जोडून असणारा साधारणपणे २५० एकराचा सिद्धता केंद्राचा परिसर, त्याला जोडून वाहन तळासाठी आवश्यक असणारा २११ एकराचा परिसर, अशा विविध गोष्टींचा आराखडा त्याच ठिकाणी चर्चिला गेला आणि अंतिम करण्यात आला. त्या आराखड्याप्रमाणे आवश्यक असणार्या जागांची पाहणी करण्यासाठी पुण्याच्या विविध प्रवेश रस्त्यांवर जाऊन चाचणी करण्यात आली. पिरंगुट रस्ता, कात्रज रस्ता, हडपसर-मांजरी परिसर, नगर रस्ता, पुणे-मुंबई रस्ता अशा अनेक ठिकाणी या कार्यक्रमासाठी जागा पाहण्यात आली आणि अंतिमतः मारुंजी, मेरे व जांबे या तीन गावांच्या संगमाच्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी स्थान नक्की करण्यात आले. हे स्थान नक्की झाल्यानंतर विविध खात्यांच्या योजना, प्रत्येक खात्याचे कामाचे स्वरूप, त्यासाठी असणार्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या नावांची योजना, तसेच त्या खात्यामध्ये काम करणार्या अन्य कार्यकर्त्यांच्या नावाची योजना ही याच मोतीबागेच्या कार्यालयामध्ये निश्चित करण्यात आली.
सहा जणांची सुकाणू समिती त्यानंतर विविध ३५ खात्यांचे प्रमुख, सहप्रमुख आणि त्या प्रत्येक खात्यात विविध उपखाती व स्वयंसेवक अशी साधारणपणे आठ हजार जणांची जणू एक मोठी फौजच या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आली. मोतीबागेतील याच कार्यालयामधून या सर्व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना तयार करण्यात आली. केशव सभागृह, माधव सभागृह, मोरोपंत पिंगळे सभागृह, रज्जूभैया सभागृह तसेच विविध बैठक कक्षांत त्यांच्या बैठक क्षमतेनुसार बैठकांचे, प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. विविध बैठका जवळपास दिवसभर या मोतीबागेत सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सातत्याने चालू होत्या. तेथेच निर्णय होत होते, त्यानुसार अंमलबजावणी होत होती. आढावा घेतला जात होता, समस्या आल्यास मार्गही काढण्यात येत होता.दि. ३ जानेवारी, २०१६ रोजी ‘शिवशक्ती संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर चार दिवस मैदानावरील सर्व गोष्टींची आवराआवर झाली. त्यानंतर सर्व साहित्याचा आणि उपक्रमांचा हिशोब करणे यासाठीच्या बैठका परत एकदा मोतीबागेच्या याच कार्यालयात अनुभवल्या. अशा रीतीने कार्यक्रमाचे पूर्व नियोजन, प्रत्यक्ष कामांची अंमलबजावणी आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या सर्व हिशोबाची पूर्तता, या सर्व गोष्टी मोतीबागेतील कार्यालयामध्ये घडल्या.
या कालावधीत मोतीबागेत येणार्या सर्व स्वयंसेवक, कार्यकर्ते व अधिकारी यांची भोजन व्यवस्था ‘अन्नपूर्णा’ येथे चोख बजावली गेली. त्याबरोबरच याला साक्षीदार असणारे मोतीबागेतील सर्व निवासी स्वयंसेवक व अधिकारी हेसुद्धा या कामात सातत्याने सहभागी होते. मोतीबागेतील या सर्व व्यवस्थेने सर्वांची ऊर्जा सातत्याने वरच्या पातळीवर राहण्यास मदत झाली.सरसंघचालक, सरकार्यवाह, अ.भा.अधिकारी तसेच क्षेत्र व प्रांत अधिकारी यांच्याबरोबरच विविध बैठका, चर्चा व त्यातून मिळालले त्यांचे मार्गदर्शन हा व्यक्तिशः एक संस्मरणीय ठेवा आहे. नोव्हेंबर २०१४ ते एप्रिल २०१६ असा सुमारे १७ महिने मोतीबागेच्या कार्यालयातले वातावरण सातत्याने अनुभवता आले, सर्वांचा सहवास लाभला. हा सहवास जीवन समृद्ध करणारा आहे.
रवींद्र शिंगणापूरकर