देशाला ‘परम वैभव’ मिळवून देण्यासाठी तेथे राहणार्या किंवा येऊन जाणार्या प्रत्येक व्यक्तीने पुण्यातील मोतीबाग संघकार्यालयाच्या जागेला मंत्राचे सामर्थ्य आणून दिले आहे.
एखाद्या ठिकाणाला पुण्यक्षेत्राचा किंवा ज्ञानपीठाचा दर्जा मिळतो, तो त्यावर तशा स्वरुपाच्या नावाची पाटी लावून नव्हे, तर तेथे सुरू असलेल्या कामावरून मिळतो. गेली ६५-७० वर्षे चारित्र्य संवर्धनाचे, राष्ट्र उभारणीचे आणि देशाला ‘परम वैभव’ मिळवून देण्यासाठी तेथे राहणार्या किंवा येऊन जाणार्या प्रत्येक व्यक्तीने पुण्यातील मोतीबाग संघकार्यालयाच्या जागेला मंत्राचे सामर्थ्य आणून दिले आहे. तेथे प्रांतातून गेली ५० वर्षे येत राहिलेल्या, अनेक जणांना कदाचित मोतीबागेचा घरनंबरही माहीत नसेल; पण तेथे पूजनीय श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, प्रा. रज्जूभैय्या, श्रद्धेय मोरोपंत किंवा दत्तोपंत ठेंगडी यांच्या बौद्धिकांतील प्रत्येक शब्द तोंडपाठ किंवा हृदयपाठ असेल.
एकदा श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी मोतीबागेतील एका बौद्धिकात बोलताना म्हणाले होते की, ‘’कोणतेही काम व्यापक करत असताना, त्याला कार्यालय हे लागत असते. पण, कार्यालय हे प्रामुख्याने कामासाठी असते.” त्यांनी एका इंग्रजी म्हणीचाही संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते की, ‘’टेक केअर ऑफ एव्हरी पेनी अॅण्ड पौंड विल टेक केअर ऑफ इट्स ओन” याचे आपल्या भाषेत सांगायचे झाले, तर ‘टेक केअर ऑफ पैसा आणि रुपी विल टेक केअर ऑफ इट्स ओन’ हे उदाहरण ऐकताना एक लक्षात ठेवा की, आपण काही रुपये किंवा पौंड जमविणारी माणसे नाही, तर बहुमोल स्वयंसेवकांसारखी रत्ने तयार करणारी माणसे आहोत. ‘परम् वैभवम् नेतुमेतत् स्वराष्ट्र’ हे त्यांचे शब्द उपस्थित सर्वांच्या मनात खोलवर रुजले. ते शब्द म्हणजे शतकाशतकांचे ध्येय स्वयंसेवकांच्या मनात ठसवायचा, तो एक मंत्र होता. वेदकाळात ऋषी-मुनींना वेदांचे मंत्र दर्शन देत असत, त्याच पद्धतीने श्रद्धेय दत्तोपंतांनी सर्वांच्या हृदयावर किंवा आत्म्यावरही ध्येयाचे दर्शन ठसविले.
मोतीबागेत गेली ६०-७० वर्षे वारंवार जाणारी मंडळीही आपल्या संघटनेच्या कामाखेरीज अन्य बाबींची चौकशीही करत नसत. पण, आज प्रत्येकाच्या समोर मोतीबागेची आज नव्याने उद्घाटित होत असलेली व आतापर्यंतची त्या-त्या काळातील इमारत उभी राहत आहे. प्रारंभी आत प्रवेश करताना डावीकडील लाकडी वाडा आणि समोर एक शेड होती. उजव्या बाजूला तीन खोल्या होत्या. पहिल्या खोलीत चौकशीचे कार्यालय असायचे. अनेकांची कामे तेथेच निम्मी पूर्ण होत असत. उत्तरेकडील दोन मजले आणि दामूअण्णा यांची खोली वगैरे तयार झाल्यावर नंतर घातलेल्या एका पूजेच्या कार्यक्रमात परम पूजनीय बाळासाहेब देवरस म्हणाले होते की, ”कार्यालय मोठे झाले, चांगले झाले. त्यासाठी काम करणार्या सर्वांचे परिश्रम आपण पाहिले. फार बरे वाटले. पण, सर्वांनीच एक गोष्ट लक्षात ठेवूया की, कार्यालय म्हणजे काम नव्हे. समाजातील आपल्या प्रत्येकाचे चारित्र्य, शिस्त, सतत अभ्यासवृत्ती, ध्येयाप्रति समर्पण या बाबी उभ्या करणे म्हणजे आपले काम होय.”
मी १९७० नोव्हेंबरमध्ये ’तरूण भारत’मध्ये बातमीदार म्हणून रुजू झाल्यापासून माझा कधी-कधी मोतीबागेशी संबंध येत असे. तो बहुदा येथे येणार्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या बैठकीमुळेच येत येत. पहिली काही वर्षे मोतीबागेतील भेटीगाठींचे वृत्त देण्याचे काम कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तीच करीत असे. मी फक्त बाजूला बसण्यापुरता जात असे. तेव्हा ’तरुण भारत’ची काही मोठी जबाबदारी असलेले विनायकराव जोशी मोतीबागेत राहत असत. अन्य कोणत्या तरी कामाला तेथे गेलेलो असताना, मला माननीय विनायकराव यांनी हाक मारली आणि म्हणाले की, ”बरंच काही चांगलं लिहिता म्हणे; पण लक्षात ठेवा. वेळीच आपले विधी आणि निषेध निश्चित करा. नाही तर या पत्रकारितेत हरवला, तर शोधूनही सापडणार नाही.“ खरे म्हणजे ते असे का म्हणाले, हे मला अजूनही कळलेले नाही. पण, दुसर्या दिवशी त्यावेळचा एक सहकारी प्रमोद महाजन (नंतरचे भाजपचे राष्ट्रीय नेते) मला म्हणाला की, ”काय मोरबा, कानाच्या झिणझिण्या कमी झाल्या की नाही.” मी उत्तर दिले.
”अरे, अजून सुरू व्हायच्यात. कारण मला अजून कळलेले नाही की, ते मला असे का म्हणाले. पण, एक गोष्ट खरी की, मी त्यामुळे अजून हबकलो आहे.” त्यावर तो म्हणाला की, ”हबकू वगैरे नको; पण अशाच शब्दांनी आमची आयुष्ये उभी राहिलीत. हे शब्द कळायला कदाचित चार-दोन दिवस लागतील किंवा ५० वर्षेही लागतील; पण एक लक्षात ठेव, विनायकराव रागावले आहेत ना! आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही आणि त्यांचे नाव आयुष्यभर काढशील.’‘ झालेही तसेच! त्यांचे माझ्यावर बारीक लक्ष असे. अन्य कोणी लेखाची कितीही स्तुती केली, तरी विनायकराव यांच्या चेहर्यावरील आठीही हलत नसे, तरीही माझ्या निवासाची आणि अन्य गरजांचीही ते चौकशीही करीत आणि काळजीही घेत.
असेच एकदा त्यावेळच्या ’तरुण भारत’च्या टिळकरोडवरील कार्यालयाशेजारी हॉटेल रामनाथमध्ये डबा खात असताना, प्रमोद महाजननी मला सांगितले होते की, ”मीही खेड्यातून आलो आहे. मी असाच दबकत-दबकत असतो. पण, एक गोष्ट लक्षात ठेव, आपले संपादक बापुराव भिशीकर, वृत्तसंपादक वसंतराव गीत आणि संघाचे प्रचारक विनायकराव जोशी हे आपले ‘ब्रह्मा-विष्णू-महेश’ आहेत. त्यांचे नाव घेतले तरी पत्रकारिता चांगली समजेल.” माझ्याबाबत तरी घडले तसेच. मी ही आठवण महाजन दिल्ली भेटल्यावर आवर्जून सांगितली.
- मोरेश्वर जोशी