संघ स्वयंसेवकाच्या दृष्टीने पुणे शहरातील मोतीबागेची वास्तू ही एक अत्यंत सन्मानाची जागा होती आणि आहे. मी शिवाजीनगर गावठाण भागात जुन्या काळापासून कार्यरत होतो. या मोतीबागेच्या वास्तूशी माझ्या अनेक आठवणी निगडित आहेत. त्यापैकी दोन आठवणी आज इथे सांगाव्याशा वाटतात.
साधारणतः 1970-72च्या सुमारास, तात्याराव बापट पुणे शहर प्रचारक होते. पुण्याच्या कोणत्याही भागातील संघाचा स्वयंसेवक असो, तो मोतीबागेशी जोडला गेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोतीबागेत येत राहिले पाहिजे, यासाठी ते आग्रही असत. त्यावेळी आमच्या शिवाजीनगर भागात कैलास काची हे एक स्वयंसेवक होते. ते कुस्ती खेळत. एकदा त्यांनी एक कुस्ती जिंकली. आपल्या या स्वयंसेवकाचे कौतुक म्हणून आम्ही 20-25 कार्यकर्त्यांनी त्याची मिरवणूक काढली. मिरवणूक संध्याकाळनंतर सुरू झाली. शिवाजीनगरपासून मोतीबागेपर्यंत सर्वांनी त्यांची खांद्यावर मिरवणूक काढली. मोतीबागेत पोहोचेपर्यंत रात्र झाली होती.
मात्र, आपल्या स्वयंसेवकाने कुस्ती जिंकलेली आहे आणि त्याला इतरांनी मिरवत आणले आहे, हे तात्यांना कळाले. ते खाली आले. त्यांनी शाल इत्यादी देऊन त्याचे कौतुक केले. मोतीबागेत कुणी स्वयंसेवक काही विशेष कार्य करून आला, तर त्याचे आगतस्वागत केले पाहिजे आणि कौतुकही केले पाहिजे, असे सांगून मिरवणुकीने तेथपर्यंत नेल्याबद्दल आम्हा सर्वांचेही कौतुक केले. याचप्रकारे एक एक कार्यकर्ता जोडला पाहिजे, असे सांगितले. असे अनेक प्रसंग मोतीबागेने पाहिले आहेत.
मोतीबागेच्या वास्तूचे पुणे शहरातले स्थान हे आगळेवेगळे होते, ते तसे कायम राहिले आहे. या वास्तूमधून जे घडते आहे ते पूर्णपणे समाजहितकारक आणि देशहितकारक असते, असा भाव पुण्याच्या कित्येक नागरिकांमध्ये त्या काळापासून आहे आणि अनेकांनी ही प्रतिमा खूप ठळकपणे, आग्रहपूर्वक जपली आहे. याचे एक उदाहरण आठवते. शिवाजीराव ढेरे हे माझ्या आईकडून नातलग होते. ते काँग्रेसचे पुण्यातले नेते होते महापौर झाले. त्यावेळी त्यांना अभिनंदन करण्यासाठी आणि चहापानासाठी मोतीबागेत येण्याचे आमंत्रण दिले होते.
ते आले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक, कार्यकर्ते इत्यादी काही मंडळी होती. त्यावेळी शिवाजीरावांनी मोतीबागेत पोहोचल्यावर कार्यकर्त्यांना निक्षून सांगितले की, ही संघाची वास्तू आहे, याचे भान ठेवा. इथे तंबाखू मळणे, तोंडात ठेवणे, बिडी-सिगारेट पिणे असले काही करू नका. अशा गोष्टी इथे घडत नाहीत. मोतीबागेतली ही वास्तू आहे आणि या वास्तूचे पावित्र्य जपले पाहिजे.या एका गोष्टीवरून पुण्याच्या अनेक नागरिकांच्या मनात मोतीबागेच्या वास्तूला काय महत्त्व आहे, काय स्थान आहे, हे लक्षात येईल. अशा या वास्तूचे रूपांतर अधिक मोठ्या वास्तूत होते आहे, ही प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे.
अॅड. बाबा चव्हाण
(लेखक हे किसान संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)