मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रसिद्ध राणीची बाग म्हणजेच भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा १६१वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. राणीच्या बागेतच आयोजित केलेल्या या सोहळ्यामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थीतीत हा सोहळा झाला.
या पार्श्वभूमीवर वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील विविध वनस्पतींच्या तसेच वाळवंटात आढळणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडाझुडपांच्या प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले. या निमित्ताने प्लास्टिक पासुन तयार केलेले आसन व्यवस्था असलेले १५ बाक प्रोजेक्ट मुंबई या संस्थेने उद्यानाला भेट दिले आहेत. हे बाक पर्यटकांच्या सुविधेच्या दृष्टीने उद्यानातील विविध ठिकाणी बसविण्यात आले आहेत. तसेच, मनराव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ५ व्हीलचेअर्स उद्यानाला हस्तांतरित करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे प्राणिसंग्रहालयातील गांडूळ खत प्रकल्पावर काम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांनी केलेल्या गांडूळ खत विक्रीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान ही करण्यात आला. याचबरोबर, जगाच्या एकूण सात खंडांपैकी सहा खंडातील वृक्ष वनस्पती आहेत त्या वनस्पतींवर आधारित नवीन मालिका 'सिल्वन फॉरेस्ट'च्या प्रोमो व्हिडिओचे अनावरण करण्यात आले. तसेच, वर्धापन दिनाचे औचित्य साधून युनिकेअर हेल्थ सेंटरच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.