मुंबई : "गेल्या २००० वर्षांपासून जगाने आपल्याकडे सुख आणि शांती आणण्यासाठी निरनिराळे प्रयोग केले. प्रत्येकाने भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचाही वापर केल्याचे दिसले. इतकेच नव्हे तर त्यांनी वेगवेगळे धर्म आजमावले, तसेच भौतिक समृद्धीही मिळवली. परंतु या सर्वांमधून योग्य समाधान काही त्यांना मिळाले नाही. त्यामुळे आता संपूर्ण जगाला भारताकडूनच आशा आहेत.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शुक्रवारी बँकॉक येथे केले. येथील इम्पॅक्ट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'वर्ल्ड हिंदू फाउंडेशन'तर्फे तीन दिवसीय (दि. २४ ते २६ नोव्हेंबर) 'वर्ल्ड हिंदू काँग्रेस' संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेसलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या संमेलनात जगभरातून हजारो हिंदू बांधव सहभागी झाले आहेत.
या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, "आजचे जग हे योग्य मार्गावर चालत नाहीये. ते कुठेतरी डगमगत आहे. शांततेच्या मार्गापासून दूर जात आहे. त्यामुळे आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागून आहे. विशेषत: कोविड काळात भारताने केलेल्या उत्तम कामगिरीनंतर जगाने भारताविषयी पुनर्विचार करणे सुरू केले आहे. भारतच आपल्याला मार्ग दाखवू शकेल असा विचार सध्याचे जग करत आहे. संपूर्ण जग शोधत असलेली परंपरा ही भारताला आहे. वसुधैव कुटुंबकम या विचाराने भारताने यापूर्वीही अशी अनेक कार्य केली आहेत. आपला समाज आणि आपले राष्ट्रही याच हेतूने जन्माला आले आहे."
सरसंघचालक पुढे म्हणाले, "जागतिक मुस्लिम परिषदेचे महासचिव काही महिन्यांपूर्वी भारतात आले होते. आमची इच्छा असेल तर आम्ही जगात एकोपा आणू शकतो, असे मत त्यांनी आपल्या एका भाषणातून व्यक्त केले होते. यासाठी भारत आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे हे आपले कर्तव्य आहे आणि हिंदू समाज याच कारणासाठी जन्माला आला आहे."
उपस्थितांना आणि या माध्यामातून भारतीयांना आवाहन करत ते म्हणाले, "आपल्याला प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचून संपर्क वाढावावा लागेल. त्यामुळेच सर्व हिंदू एकत्र येतील आणि जगातील प्रत्येकाशी संपर्क साधतील. यातून संपूर्ण जगाशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आपल्याला समाजातील प्रत्येकाशी संपर्क साधावा लागेल. आज निःस्वार्थ सेवेत आपण जगाचे अग्रेसर झालो आहोत."
या संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी मंचावर विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री स्वामी विज्ञानानंदजी, थायलंडच्या शराफ ग्लोबल ग्रुपचे अध्यक्ष/संस्थापक सुशील कुमार सराफ, विश्व हिंदु परिषदेचे महासचिव मिलिंद परांडे, पुण्यात्मानंदजी महाराज, माता अमृतानंदमयी (अम्मा) आदी मान्यवर उपस्थित होते.