विज्ञानाची आवड असल्यामुळे त्याच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोटतिडकीने विद्यार्थी घडवणार्या डॉ. सुधीर कुंभार यांची ही विज्ञानविश्वातील सफर...
विज्ञानाचा प्रसार व्हावा आणि त्यातल्या लहानसहान गोष्टी विद्यार्थ्यांना समजाव्या, या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी स्वतः हाताने बनवलेल्या माहितीपूर्ण भित्तीफलकांचा १०५८वा अंक सोमवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होईल. या संकल्पनेचे जनक आणि त्यावर अखंडपणे काम केलेले विज्ञानप्रसारक म्हणजे डॉ. सुधीर कुंभार.
सुधीर यांचा जन्म सांगलीतील कवलापूर गावातला. सातवीपर्यंतचं शिक्षण नांद्रे गावात पूर्ण केल्यानंतर, पुढील शिक्षण चांदोरी येथे घेतले. कराडच्या एस. जी. एम. महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. सातार्यातील आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये शिक्षणशास्त्राचा अभ्यास केला. डॉ. सुधीर यांनी ‘बीएससी’, ‘एमए’ आणि ‘एमएड’पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी ’एन्व्हार्यन्मेंटल कम्युनिकेशन’ या विषयात ’पीएचडी‘ पूर्ण केली. सुरुवातीच्या काळात पुण्यातील वडगाव मावळ येथे शाळेत रुजू झाल्यानंतर, ढेबेवाडीची कर्मवीर भाऊराव पाटील शाळा, सातार्यातील एका शाळेत २२ वर्षांची शिक्षकी सेवा त्यांनी दिली. त्यानंतर आता कडेगावच्या महात्मा गांधी विद्यालयात विज्ञान शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी तळमळ आणि जागरूकता निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून नावीन्यपूर्ण संकल्पनांना मूर्त रूप देणार्या सुधीर यांनी १९९८ साली पर्यावरण आणि विज्ञानाशी संबंधित पहिला भित्तीफलक तयार केला. यानंतर दर रविवारी याच विषयांशी संबंधित भित्तीफलक बनवत, त्यामध्ये पर्यावरणातील विविध विषयांचा समावेश करायला त्यांनी सुरुवात केली. वनस्पती, प्राणी, कीटक, फुलपाखरे, पक्षी यांविषयीची शास्त्रीय माहिती, छायाचित्रे यांचे एकत्रीकरण असलेला हा भित्तीफलक अतिशय आकर्षक. रविवारी हा भित्तीफलक बनवल्यानंतर सोमवारी तो प्रकाशित करून शाळेच्या सूचना फलकावर लावायचा, असा त्यांचा नित्यक्रम. दर आठवड्याला नवीन विषयावर भित्तीफलक बनवत, विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांवर जनजागृती होऊ लागली. त्याचबरोबर दिनविशेष किंवा इतर विशेष औचित्य साधत दिवाळीतील प्रदूषण, ’पक्षी सप्ताहा’निमित्त पक्ष्यांविषयी, ’वन्यजीव सप्ताहा’मध्ये सस्तन प्राण्यांविषयी माहिती या भित्तीफलकांवर झळकते.
शाळेच्या सूचना फलकावरील तक्ता त्या शाळेपुरताच मर्यादित राहत असल्याने, या भित्तीफलकाला पुढे सोशल मीडियामुळे प्रसाराचा अनोखा मार्ग मिळाला. विज्ञानाचा अगदी निःस्वार्थ भावनेने आणि कल्पकपणे वापर केलेल्या या भित्तीफलकांच्या संकल्पनेची दखल ’लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’नेही घेतली. २०१६ साली वॉलपेपर अर्थात भित्तीपत्रके म्हणून ’लिमका बुक’ने याची नोंदस घेतली आहे. याच भित्तीपत्रकांची डॉ. सुधीर यांनी अनेक ठिकाणी मोफत प्रदर्शनेही आयोजित केली. बस स्थानके, रेल्वे स्थानके, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणांवर या भित्तीफलकांचे प्रदर्शन भरवले जाते. ”अनेकदा सार्वजनिक ठिकाणी भित्तीफलकांचे प्रदर्शन भरवूनही माझी भित्तीफलके कधीच खराब केली गेली नाही किंवा फाडली गेली नाहीत, हेच माझ्या कामाचं यश आहे,” असे सुधीर सांगतात.
याव्यतिरिक्त सुधीर जटा निर्मूलनाचे देखील काम करतात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सुधीर आपले योगदान देत असून जटा सोडवणे व त्याबाबत जनजागृती केली जाते. कराड-ढेबेवाडी रोडवरील वाहनांच्या धडकेत मृत्यू झालेल्या प्रत्येक प्राण्याचा त्यांच्याकडे २००४ पासूनचा डाटादेखील उपलब्ध आहे. वणवा निर्मूलन मोहीम, त्याचबरोबर फुलपाखरू उद्यान, औषधी वनस्पतींच्या उद्यानामध्येही त्यांनी हातभार लावला आहे. गेली ३३ वर्षं विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी ’विज्ञान पंधरवडा’ आयोजित केला जातो. तसेच ‘रयत विज्ञान परिषदे’अंतर्गत प्रकाशित होणार्या ‘विज्ञान पत्रिका’ या मासिकाचे संपादक म्हणूनही गेली दहा वर्षं सुधीर यांच्यातडे जबाबदारी आहे. ‘फुलपाखरू’ या विषयावरील पॉकेट बुक, तर ’वणवा निर्मूलन मोहीम’, ’पर्यावरण आणि प्रदूषण’ ,‘पर्यावरण मित्र होऊया’ यांसारख्या माहितीपूर्ण पुस्तकांचे लेखक म्हणूनही डॉ. सुधीर प्रसिद्ध आहेत.
विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा २०११ सालचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘रयत शिक्षण संस्थे’अंतर्गत दिला जाणारा ’यशवंतराव चव्हाण बेस्ट टीचर पुरस्कार’ (२०१३), २०११ सालचा ’मधुकरराव चौधरी पुरस्कार’ आणि ‘मराठी विज्ञान परिषदे’अंतर्गत दिला जाणारा २०२० सालचा ‘विज्ञान प्रसार पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी सुधीर यांच्या कामाला एक सोनेरी किनार लावली, असेच म्हणावे लागेल. याव्यतिरिक्त कोल्हापूर आकाशवाणीच्या ’विज्ञान जगत’ मालिकेसाठी आणि सातारा आकाशवाणीच्या परिसर विज्ञान मालिकेसाठी दोन वर्षं लेखनाचे कामही त्यांनी केले आहे. त्याचबरोबर भारतातून काही निवडक व्यक्तींची किंवा संस्थांच्या ’तखझछएढ क्लब’ या निवडीत सुधीर सहभागी असलेल्या ’कडेगाव सायन्स क्लब’ची दोनदा निवड झाली आहे. विज्ञान प्रसार आणि ज्ञान प्रसाराचा वसा, वारसा आणि ध्यास घेतलेले सुधीर येत्या काही काळातच शिक्षकी पेशातून निवृत्ती होतील. पण, निवृत्त झाल्यानंतर ही विज्ञानप्रसाराचे काम सोडणार नाही, हे दृढ निश्चयाने सांगणार्या, अशा या विज्ञाननिष्ठ शिक्षकाला दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!