'वसुधैव कुटुम्बकम्’ हा शब्द भारतीयांसाठी नवीन नाही. पाश्चात्य देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ’जी २०’च्या निमित्ताने त्याची नव्याने ओळख करून दिली. हा शब्दप्रयोग विविध देशांत वेगवेगळ्या स्वरुपांत वापरला जातो. नोव्हेंबर महिना उजाडताच अमेरिकेसह कॅनडा आणि लगतच्या देशांमध्ये ‘थँक्सगिव्हिंग’ची चर्चा होत असते. ’थँक्सगिव्हिंग’ म्हणजेच ’कृतज्ञता’ अथवा ‘आभार.’ गेल्या काही वर्षांत त्याचे वारे आपल्याकडेही वाहू लागले आहेत. ‘थँक्सगिव्हिंग’ म्हणजे नेमके काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.
आपल्याकडे ‘तीळगूळ घ्या आणि गोड बोला’ याचेच अमेरिकन स्वरूप; मात्र ते अधिक विस्तृत म्हणजेच ‘थँक्सगिव्हिंग’ असा म्हणता येईल. मावळत्या वर्षभरात आपल्याला कुणी काही मदत केली असेल; मात्र आपण त्याचे आभार मानले नसतील किंवा मानू शकलो नाहीत किंवा आपल्या कृतीमुळे एखादा दुखावला गेला असेल, तर आपण त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे अथवा आभार मानणे, त्यानिमित्त मित्रमंडळी अथवा आप्तस्वकीयांसोबत मेजवानी आणि एकमेकांना भेटवस्तू देऊन ऋणनिर्देश व्यक्त करण्याचा, हा सण गेल्या काही वर्षांत जगभर (मुस्लीम देश वगळता) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हल्लीच्या स्मार्ट युगात प्रत्यक्ष संवाद कमी होत असताना, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्ताने का असेना, आपण एकत्र येत असू तर त्या उपक्रमाचे स्वागतच केले पाहिजे. भौतिक सुखसोयींच्या जाळ्यात अडकलेली कुटुंबं हल्ली आकाराने संकुचित होत आहेत. त्यातून कृतज्ञता व्यक्त करण्याची औपचारिकताही अनेकांकडे नसते. मात्र, आपल्या व्यवहारात पावलोपावली कृतघ्न व्यक्ती भेटत असतात. ते आपले मित्र मंडळी असोत की, ज्या देशांना आपण मदत केली असेल ते देश असो. कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी स्वार्थासाठी कृतघ्नांची यादी लांबलचक होत जाते.
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी, तर कॅनडामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या सोमवारी हा सण साजरा केला जातो. हा दिवस ’टर्की डे’ म्हणूनदेखील ओळखला जातो. या दिवशी मित्रमंडळी अथवा आप्तस्वकीयांसह खाद्यपदार्थांची मेजवानी, रोषणाई, आतषबाजी ऐवढेच नाही, तर मोठमोठ्या मॉलमध्ये भरघोस सुटसह वस्तूंची लयलूट केली जाते. या दिवसाची हे लोक वर्षभर मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. यंदाचा ‘थँक्सगिव्हिंग डे’ गुरुवार, दि. २३ नोव्हेंबरला होता. या दिवशी अमेरिकेसह अनेक राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात येते. ‘थँक्सगिव्हिंग डे’च्या अनेक दंतकथा आणि परंपराही आहेत. मूळचे अमेरिकन ज्यांना ‘व्हॅम्पानोग नेटिव्ह’ म्हणून संबोधले जाते, ते आणि १६२१च्या कालावधीत प्लायमाऊथ, मॅसॅच्युसेट्सच्या इंग्रजी वसाहतींनी ज्यांना ‘यात्रेकरू’ म्हणून ओळखले जाते, त्यांनी तेथील पीक कापणीच्या मेजवानीचा आनंद लुटला, ज्यास अमेरिकन लोक ‘थँक्सगिव्हिंग’ची प्रेरणा मानतात. त्यावेळी पहिल्या ‘थँक्सगिव्हिंग’ची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचा इतिहास आहे.
राष्ट्राध्यक्ष असताना अब्राहम लिंकन यांनी १८६३ पर्यंत अमेरिकन गृहयुद्धादरम्यान ’नॅशनल थँक्सगिव्हिंग डे’ची औपचारिक मुहूर्तमेढ रोवली. १९४२ मध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी ‘थँक्सगिव्हिंग डे’ला राष्ट्रीय स्वरूप दिले. हा दिवस म्हणजे मावळत्या वर्षातील कृतज्ञता आणि त्यागाचा सन्मान करण्याचा दिवस असल्याचे अमेरिकन लोक मानतात. यानिमित्त अमेरिकन लोक घर आणि घराबाहेर मोठ्या प्रमाणात रोषणाई करून जल्लोष करतात. कॉर्पोरेट कल्चरमुळे भारतासह अनेक आशियाई देशांतही ‘थँक्सगिव्हिंग डे’ साजरा केला जातो.संवादासह सोशल मीडियाचे जाळे जगभर पसरल्याने संपूर्ण जगच आपल्या मोबाईलमध्ये सामावले आहे. त्यात प्रत्यक्ष भेटून एकमेकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासही वेळ नसतो. सोशल मीडियाच्या महाजालात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ’वसुधैव कुटुम्बकम्’ ही भारताने जगाला दिलेली देणगी असून, ती वेगवेगळ्या स्वरुपात अन्य देशांतही दिसून येते. त्यातून कृतघ्नपणाला त्या दिवसासाठी का होईना, मूठमाती देऊन कृतज्ञता व्यक्त करत ‘अतिथी देवो भव’ अनुभवू या!
मदन बडगुजर