मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कोविड काळात झालेल्या ऑक्सीजन घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या एका निकटवर्तीयाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामध्ये रोमीन छेडा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यांच्या असोसिएट्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी रात्री मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प घोटाळ्यात रोमीन छेडाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोमीन छेडा हे आदित्य ठाकरेंचे निकवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलचा खुलासा केला.
किरीट सोमय्या म्हणाले की, "कोविड काळात तत्कालिन ठाकरे सरकारने मोठ्या प्रमाणात बोगस कंपन्यांना ऑक्सिजन प्लांटचे कॉन्ट्रॅक्ट् दिले होते. यासाठी १४० कोटी रुपये दिले गेले. त्यानंतर रोमीन छेडा यांनी १४० कोटी रुपये घेऊन फक्त ३८ कोटीं रुपयांचे प्लांट लावलेत. १०२ कोटी रुपयांचे ऑक्सिजन चोरण्याचे पाप उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केले" असे किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.
तसेच "उद्धव ठाकरे सेनेने ऑक्सिजन चोरल्याने शेकडो कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्याची जबाबदारी उद्धव ठाकरे घेणार का?" असा सवालही त्यांनी केला आहे. याशिवाय गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये महापालिकेने रोमिन छेडा यांना ५३ प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. यात राणी बाग येथील पेंग्विनच्या कॉन्ट्रॅक्ट्पासून ऑक्सिजनचे प्लांट बसवण्याचेही कॉन्ट्रॅक्ट होते."
"यासाठी बोगस मशीन लावण्यात आले जे वेळेवर सुरुच झाले नाहीत. ज्यावेळी ऑक्सिजनची गरज होती त्याच्या एक वर्षानंतर हे प्लांट सुरु झालेत. त्यामुळे या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे," असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
याशिवाय रोमीन छेडाला कॉन्ट्रॅक्ट देणारे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांचीही चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. "मी याविषयी आपण आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केली असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.