आपण काय बोलतो, कोणाला उद्देशून बोलतो, संसदेत कसे वागतो याचे भान म्हणा प्रारंभीपासून राहुल गांधींना नव्हतेच. त्यांच्यासारख्या सर्वज्ञानीला तसे कोणी काँग्रेसमध्ये चार भल्या गोष्टी शिकवण्याचाही प्रश्न नाही आणि जिथे त्यांच्या मातोश्रीच पंतप्रधानांचा उल्लेख ‘मौदा का सौदागर’ असा करतात, तिथे मातृसंस्कारांची अपेक्षा तर शून्यच! आताही व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावरील फुटकळ टीकेवरून प्रेरणा घेऊन, बालिश राहुल बरेच बडबडून गेले. स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी होते म्हणून भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाला, इथंपासून ते मोदी सामना बघायला उपस्थित होते, म्हणून भारताला पराजय पत्करावा लागला, यांसारख्या अतिशय निराधार, फडतूस दाव्यांवर आता राहुल गांधींचीही मदार! यावरुन पुनश्च त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचा स्तर आणखीन किती निच्चांक गाठू शकतो, याचीच पूर्ण कल्पना यावी. पंतप्रधान मोदींना (पीएम) ‘पनौती मोदी’ म्हणून आपण हिणवले, म्हणजे मोदीविरोधकांच्या गोटात आपण ‘हिरो’ ठरू, आपल्या पक्षाला भरमसाठ मतदान सध्या राज्यांतील निवडणुकांत होईल, असा या पप्पू गांधींचा गैरसमज असावा. त्यांनी, त्यांच्या पक्षाने जेव्हा-जेव्हा मोदींवर असे वैयक्तिक शाब्दिक हल्ले चढवले, तेव्हा-तेव्हा त्याचा उलट फायदाच भाजपला झाला, याचे साधे भानही गांधींना नाही. ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’च्या फुकटच्या ‘नॅरेटिव्ह’वर आपणही स्वार होऊन काय ती प्रसिद्धी पदरात पाडून घ्यायची, हीच राहुल गांधींची अनीती. ते तसेही म्हणतातच की, माध्यमे आमचा दुस्वास करतात. आम्हाला पुरेसे ‘कव्हरेज’ देत नाही. म्हणूनच मग असे पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरले की, किमान त्या दिवसाच्या फुकटच्या ‘प्राईम टाईम’ प्रसिद्धीची सोय झालीच म्हणून समजा! म्हणजे बघा, एका पैशाचाही खर्च नाही. फक्त मोदींना चार शिव्या हासडा आणि लगोलग प्रसिद्धीझोतात झळका! हीच राहुल आणि त्यांच्या काँग्रेसची पूर्वापारची कूप्रथा. पण, काँग्रेस हे कदापि मान्य करणार नाही की, मोदी हे ‘पनौती’ नसून, ते भारताच्या ‘प्रगतीचे पाईक’ आहेत. २०१४ पासून ते आजतागायत विविध क्षेत्रांत भारताने घेतलेली भरारी हे त्याचेच द्योतक. त्यामुळे मोदींविरोधात अशीच आधारहीन, पातळी सोडून पप्पूने कितीही टीका केली, द्वेष केला तरी ‘जितेगा तो मोदीही!
’
जो भारतमातेला विसरला तो...
एका सक्षम पंतप्रधानासमोेर विरोधी नेत्याचा चेहरा कसा नसावा, याचा आदर्शच राहुल गांधींनी आजवरच्या भारतीय राजकारणाच्या इतिहासात प्रस्थापित केला, असे म्हटले तरी अजिबात वावगे ठरू नये. कारण, सत्ताधारी मुळात हुशार, ज्ञानी आहेतच. पण, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सुद्धा तितकाच ताकदीचा विरोधी चेहरा हवा, जो आज भारताच्या राजकीय क्षितिजावर दुरान्वयेही दिसत नाही. त्यामुळे मोदींचा वारू रोखण्यासाठी विरोधकांचे असे ५० चेहरे जरी एकत्र आले, तरी त्याची परिणीती सक्षम विरोधकांमध्ये होऊ शकत नाही. त्यातच सध्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या धामधुमीत तर विरोधी गटातील नेत्यांच्या वाणीचा तोल सुटलेला दिसतो. राहुल गांधींसारख्या घोर अज्ञानीने तर चक्क ‘कोण भारतमाता’ असा प्रश्न उपस्थित केला. एवढेच नाही तर मोदींनी ‘भारतमाता की जय’ न बोलता ‘अदानीमाता की जय’ बोलावे, अशी एक तथ्यहीन शेरेबाजीदेखील केली. त्यामुळे आपण किती असबद्ध, उरलीसुरली अक्कल गहाण ठेवून शाब्दिक ओकार्या काढतोय, याची खुद्द राहुल यांनाच जाणीव नसावी. त्यातच काही दिवसांपूर्वी कोणी तरी तत्त्वज्ञ म्हणून गेले की, ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी यांच्यातील परिपक्वता म्हणे वाढीस लागली. पण, हा स्वप्नाळू दावा जर सत्यकथन करणारा असता, तर भारतभ्रमणाचे कौतुक करत फिरणार्या राहुल गांधींना ‘कोण ही भारतमाता? तीचा शोध घ्यावा लागेल!’ असा अनैसर्गिक प्रश्नच मुळी पडला नसता. पण, असो. त्यांना ‘पप्पू’ म्हणतात ते असेच का? आणि ही ‘पप्पूगिरी’च त्यांना बुडवणारी ठरली आणि पुढेही बुडवेलच, हे निश्चित! आता फक्त एकच आशा की, उद्या आपल्याच मातेसंबंधी या पप्पूला असे कोणतेही चित्रविचित्र प्रश्न न पडो! ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’ यांसारखे नारे भाजपने दिल्यामुळे, ते अन्य कोणी देऊ नये किंवा त्यांना विरोध करावा, असे मुळीच नाही. पण, फक्त ते भाजपच्या मुखी आहे, त्याचा संबंध हिंदुत्वाशी जोडून, ते-ते सगळं वाईट हा तर्कच मुळी तथ्यहीन. म्हणूनच कोणे एके काळी स्वातंत्र्यसेनानींनी ‘भारतमाता की जय’ हे नारे देत प्राणार्पण केले, त्याच स्वातंत्र्यसंग्रामातील आपल्या घराण्याच्या योगदानाचे सतत कोडकौतुक करणार्या गांधींच्या या दिवट्याला, भारतमातेच्या या राजकीय विस्मरणाची मोठी किंमत मोजावी लागेल, हे वेगळे सांगायला नकोच!