‘वाद-विवाद-संवाद’ या विषयावर मागील आठ श्लोकांतून समर्थांनी आपले विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. वादविवादाला उद्युक्त करणार्या अहंभावाला विवेकाने आवरता येते. विवेकाने अहंकाराला दूर सारून आपल्या आचारविचारात पालट करायचा असेल, तर परमेश्वराची भक्ती केली पाहिजे.
अहंकार-गर्व-ताठा या गोष्टी आपल्या आयुष्यात नित्याच्या झाल्याने आपण त्याविषयी फारसे गंभीर नसतो. ‘मी सगळे जाणतो, माझा अनेक गोष्टींचा, तत्त्वांचा अभ्यास आहे. मग मी त्याचा अहंकार का बाळगू नये? आहे मी अहंकारी!’ अशी भाषा ऐकायला मिळते. अहंकाराने माणसाच्या मनातील ’स्व’ सुखावला जातो, हे खरे आहे. त्यामुळे अहंकार सोडायला माणसे, सहजासहजी तयार नसतात. तथापि हेही समजून घेतले पाहिजे की, अहंकाराने माणसाच्या मनात गर्व साठत जातो. पुढे पुढे या अहंकाराची भावंडे गर्व, ताठा, स्वार्थ, दुसर्याला कमी लेखण्याची वृत्ती, द्वेष, मत्सर, सुडाची भावना हे सर्व अहंकारापाठोपाठ माणसाच्या मनात प्रवेश करतात व माणसाच्या मनाचा ताबा घेतात. अती अहंकारी माणूस या विकारांच्या आहारी केव्हा गेला, हे त्याचे त्याला समजत नाही आणि मजेची बाब म्हणजे, त्यातच तो आनंद मानू लागतो. त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. अशावेळी विवेकी माणसाने क्रिया पालटणार्या भक्तिपंथाकडे जावे, असे समर्थांनी मागील श्लोक क्र. ११५ मध्ये सांगितले आहे. समर्थ म्हणतात, ‘क्रिया पालटे भक्तिपंथेचि जावे.’
’वाद-विवाद-संवाद’ या विषयावर मागील आठ श्लोकांतून समर्थांनी आपले विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. वादविवादाला उद्युक्त करणार्या अहंभावाला विवेकाने आवरता येते. विवेकाने अहंकाराला दूर सारून आपल्या आचारविचारात पालट करायचा असेल, तर परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. ’क्रिया पालटे भक्तिपंथेचि जावे’ असा निष्कर्ष समर्थांनी काढला आहे. आपण एकदा मनोभावे भगवंतांची भक्ती करायला सुरुवात केली की, भगवंतच आपल्याला सांभाळून घेतो, तो ’भक्ताची उपेक्षा करीत नाही, हे भक्तांच्या मनावर दृढ करण्यासाठी स्वामींनी, ’नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी’ अशी शेवटची ओळ असलेले क्रमांक ११६ ते १२५ असे दहा श्लोक यापुढे लिहिले आहेत. भगवंताला आपल्याशी एकरूप झालेल्या भक्ताचा अभिमान असतो. भगवंत अशा अनन्य झालेल्या भक्ताची काळजी घेतो. त्याला भरकटू देत नाही. त्याला चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही. अशी अनेक उदाहरणे संतवाङ्मय वाचताना आढळून येतात. तेथे परमेश्वर अथवा गुरू भक्ताला सांभाळत असतात.
भोवतालच्या भौतिक वातावरणाचा, तेथील विचारविकारांचा मारा भक्तांवर सतत पडत असतो. त्याने चित्तविक्षेप होण्याची शक्यता असते. या भौतिक आकर्षणांना बळी पडून परमार्थ भक्ताच्या मनात आपल्या परमार्थ मार्गाविषयी संभ्रम निर्माण होतो. अशा प्रसंगी भगवंत भक्ताची उपेक्षा न करता, त्याच्याकडे दुर्लक्ष न करता, त्यातून त्याला मार्ग दाखवतो. भगवंताला भक्ताचा अभिमान असतो. ‘देव भक्ताभिमानी’ असे समर्थांनी म्हटले आहे.
मनाच्या श्लोकांचा साकल्याने विचार केला तर असे दिसून येते की, यापूर्वीच्या श्लोक क्र. २७ ते ३७ या ११ श्लोकांची शेवटची ओळ, ’नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’ अशी आहे आणि आताच्या श्लोक क्र. ११६ ते १२५ या दहा श्लोकांची शेवटची ओळ ’नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी’ अशी आहे : हे साम्य आढळले तरी येथे द्विरुक्तीचा दोष नाही, हे पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल. येथे देव व राम, तसेच भक्त या शब्दांचा प्रयोग समानार्थी आहे. स्वामींचा परमेश्वर, भगवंत राम आहे. त्यांच्या दृष्टीने राम हा त्यांचे सर्वस्व आहे. स्वामींच्या हातून जे धार्मिक, संस्कृती रक्षणाचे, सामाजिक, राजकारणसदृश तसेच वाङ्मयीन असे अलौकिक कार्य झाले, त्या सर्व कार्याचे श्रेय ते नम्रपणे रामाला देतात. दासबोधात शेवटी,
सकळ करणे जगदीशाचे ।
आणि कवित्वचि काय मानुशाचे।
ऐशा अप्रमाण बोलण्याचे। काय घ्यावें॥
असे सांगून त्या कार्याचे श्रेय स्वत:कडे घेतलेले नाही. स्वतःला ते समर्थांचा म्हणजे रामाचा दास म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. आपले जन्मगाव जांब सोडतानाच आपले ‘नारायण’ हे नाव महाराष्ट्रात सोडून देऊन ’रामदास’ या नावानेच ते महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यामुळे पूर्वीच्या श्लोकांतून ’राम दासाभिमानी’ असा उल्लेख येतो.
आता या पुढील श्लोकांचा, श्लेक क्र. ११६ पासून ’देव भक्ताभिमानी’ याचा अभ्यास करताना रचनासाम्य कसे आले ते पाहायचे आहे- ’राम दासाभिमानी’ हे वाक्य खरे आहे, असे स्वामी म्हणाले. त्यावेळी त्यांना लोकांना आश्वासक संदेश द्यायचा होता. त्या काळात संपूर्ण देशात मुसलमानांची जुलमी राज्यसत्ता होती. समर्थाच्या काळी म्लेंच्छांच्या राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणाने एकंदर समाजाची सर्वदृष्ट्या वाताहत झाली होती. लोकांचा देवावरचा, धर्मावरचा विश्वासच हरवला होता. लोक भयभीत झाले होते. मुसलमानांच्या आक्रमणाचा वेग भयावह होता. सामान्य माणसाला वाटत होते की, त्यांचा देव, त्यांचे पीरबाबा त्यांना मदत करतात, पण आम्ही मात्र निराधार आहोत! अशा धार्मिक, सांस्कृतिक पडझडीच्या काळात लोकांच्या समोर राम व हनुमान यांचे अतुलनीय पराक्रम ठेवून त्यांची भक्ती केल्यास हा राम भक्ताची उपेक्षा करीत नाही, त्याला आधार देतो, असा आश्वासक संदेश देऊन स्वामींनी हिंदू समाजाचा आत्मविश्वास, धैर्य परत आणले.
श्लोक क्र .११६ ते १२६ या श्लोकांत पुराणातील दाखले देऊन देवाला भक्ताचा अभिमान असतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दासबोधाच्या कथनात शिष्यांनी मधूनमधून विचारलेल्या शंकांचे निरसन करताना वेगवेगळे मुद्दे मध्येच येतात व त्यावर भाष्य केले जाते. तसाच काहीसा प्रकार मनाच्या श्लोकांच्या बाबतीत झाला असावा. स्वामी म्हणाले, ’राम दासाभिमानी’ आहे. त्यासाठी एखाद्या शिष्याने त्याला काही शालाधार किंवा पुराणकथांचा संदर्भ विचारला असावा. यासाठी स्वामींनी पुराणग्रंथातील दाखले देत श्लोक क्र. ११६ पासून देवाला भक्ताचा अभिमान कसा असतो, हे सांगितले असावे. तेव्हा ’राम दासाभिमानी’ या श्लोक गटापेक्षा ’देव भक्ताभिमानी’ या श्लोक गटाची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यासाठी हा ११६वा श्लोक पाहा. म्हणजे वरील
विधानाची सत्यता लक्षात येईल.
बहू श्रापितां कण्टला अंबऋषी।
तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी।
दिल्हा क्षीरसिंधू तया ऊपमानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥ ११६ ॥
या श्लोकाचे सविस्तर विवरण पुढील लेखात पाहता येईल.