मुंबई : बारावीची परिक्षा पुढील वर्षी २१ फेब्रु. पासुन तर, दहावीची परिक्षा १ मार्च पासुन सुरू होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करत आहेत. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी २० नोव्हें. संपली असून, दहावीसाठी मुदतवाढ आणि बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यासंबंधी परीपत्रक काढण्यात आले आहे.
मार्च २०२४ परीक्षेस नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करता येत आहेत. इयत्ता दहावीसाठी नियमित अर्जाची मुदत संपली असून आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
विलंब शुल्कासह १ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येतील. इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. अर्जाचे शुल्क भरल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, असे मंडळाकडून स्पष्ट केले आहे.