पृथ्वीचे सौंदर्य हे निसर्गतः असलेल्या जैवविविधतेमुळे फुललेले. जैवविविधतेमध्ये विविध प्राणी, पक्षी, फुलांच्या, झाडांच्या आणि निसर्गातील अनेक जीवांचा समावेश होतो. पाण्यातील, जंगलातील, जमिनीवरील परिसंस्था या आणि अशा अनेक परिसंस्थांचा समावेश असणार्या प्रजातींमध्ये प्रदेशनिष्ठ प्रजातींचाही समावेश होतो. अशा या प्रदेशनिष्ठ प्रजाती, त्यांचे महत्त्व आणि वातावरण बदलाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो, हे आपण पाहू. पण, तत्पूर्वी या प्रदेशनिष्ठ प्रजाती नेमकं कशाला म्हणतात, हे समजून घेऊया. एखाद्या प्रदेशापुरती मर्यादित असलेली एखादी विशिष्ट वनस्पती किंवा प्राण्याची प्रजात म्हणजे (Endemic Species) ’प्रदेशनिष्ठ प्रजात.’ एखाद्या विशिष्ट परिसंस्थेत किंवा अधिवासातच या प्रजातींची उत्तम वाढ होते; कारण त्यांनी त्या अधिवासाशी जुळवून घेतलेले असते. यांनाच (native species) ’स्थानिक प्रजाती’, ‘मूळ प्रजाती’ असेही म्हणतात.
जैवविविधतेतेने नटलेल्या या परिसंस्थेला कालपरत्वे अनेक नैसर्गिक आणि मानवी धोके निर्माण झालेे. त्याची अनेक कारणे असली तरी हवामान आणि वातावरणीय बदल हेही त्यामागचे एक मोठे कारण. अत्याधिक तापमानातील बदलांचा परिणाम अनेक वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्या प्रजातींवर दिसून येत आहे. जमीन, पाणी, गोड्या पाण्यातील परिसंस्था तसेच बेट परिसंस्थेला याचा सर्वांत जास्त फटका बसत असल्याचे, संशोधकांच्या लक्षात आले आहे. अत्याधिक हवामान बदलांचे स्थानिक प्रजातींवर गंभीर परिणाम होऊन, प्रदेशनिष्ठ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचेही निरीक्षण नोंदवले गेले. एखाद्या परिसरामध्ये असलेल्या स्थानिक/मूळ प्रजातींच्या विस्थापनाला स्थानिक नसलेल्या प्रजाती प्रभावित करत असल्याचेही विश्लेषणात लक्षात आले. विदेशी प्रजाती किंवा प्रदेशनिष्ठ नसलेल्या प्रजाती या त्या विशिष्ट प्रदेशातच न वाढल्यामुळे इतर अधिवासातही जुळवून घेणं, त्यांना शक्य होतं. याउलटच प्रदेशनिष्ठ असलेली प्रजात ही त्या प्रदेशापुरतीच किंवा अधिवासापुरतीच तग धरू शकत असल्याने, त्या परिसरात इतर प्रजातींची संख्या वाढली, तर प्रदेशनिष्ठ प्रजातींचा निभाव लागू शकणार नाही.
हवामान बदलांमुळे उष्णतेच्या लाटा, शीतलहरी, दुष्काळ आणि पूर यांसारख्या तीव्र हवामानाच्या घटनांची वाढती वारंवारता पर्यावरणावर परिणाम करते, असे बीजिंग, चीनमधील ’चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या संशोधकांनी सांगितले. एका विश्लेषणात असे म्हटले आहे की, समुद्री प्राणी स्थानिक आणि स्थानिक नसलेल्या प्रजातीही एकंदरीत हवामानाच्या तीव्र घटनांबद्दल असंवेदनशील राहिले. स्थानिक मोलस्क, कोरल आणि अॅनिमोन्सवर उष्णतेच्या लाटेमुळे नकारात्मक परिणाम दिसून आला. उष्णकटिबंधीय प्रदेशातील स्थानिक प्रजातींपैकी ६० टक्क्यांपेक्षा जास्त प्रजातींना केवळ हवामान बदलामुळे नामशेष होण्याचा धोका असल्याचा अंदाज होता. बेटांवरील १०० टक्के आणि पर्वतीय प्रदेशातील ८४ टक्के प्रजाती नष्ट होण्याचा धोका जास्त होता. ५४ टक्के समुद्री स्थानिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नामशेष होण्याचा धोका असलेल्या समुद्री प्रजाती (२६ टक्के) या स्थानिक प्रजातींपेक्षा (५४ टक्के) दुप्पट जास्त होत्या.
संपूर्ण पृथ्वीवरील जैवविविधतेने समृद्ध असलेली २७३ ठिकाणे ’रीच स्पॉट्स’ म्हणजेच जैवविविधता मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली ही ठिकाणे आहेत. ही पुन्हा उभी राहू शकणार नाही. जमीन, स्वच्छ पाणी, पाण्यातील परिसंस्था आणि प्रदेशनिष्ठ प्रजातींची मोठी संख्या असलेली पाहायला मिळते. संशोधन न झाल्यामुळे तसेच अनेक धोके लक्षात घेता, त्याप्रमाणे अंमलबजावणी न केल्यामुळे आजवर भारताने आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या अनेक प्रजातींवर नामशेष होण्याची वेळ आलीच आहे. त्याचे परिसंस्थेवरही दृश्य-अदृश्य परिणाम झाले असतीलच. त्यामुळेच त्या-त्या विशिष्ट प्रांताची, प्रदेशाची, अधिवासाची खासियत असलेल्या प्रदेशनिष्ठ प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवल्या पाहिजेत. अधिवास पुनरूज्जीवित करून ती परिसंस्था आणि प्रदेशनिष्ठ प्रजातींचे संरक्षण करण्यात मदत होऊ शकेल. स्वतःच्या अधिवासाव्यतिरिक्त इतर अधिवासांशी जुळवून घेण्यासाठी सक्षम नसलेल्या या प्रजातींचा ‘एक्झॉटिक’च्या नादात बळी जाऊ न देता, त्यांचे संरक्षण करून ते सौंदर्य जपणे, हेच मानवजातीसाठी शहाणपणाचे ठरेल!