गीता जयंतीनिमित्त कोलकाता येथील ब्रिगेड ग्राऊंडवर गीता पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ डिसेंबर रोजी होणार्या या कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा देण्यात आले असून, यावेळी एका लाखांहून अधिक लोक सामूहिक गीतापठण करतील. परंतु, आता कोलकाता पोलीस आणि प्रशासनाने कार्यक्रम आयोजित करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. विविध मठ, मंदिरे आणि हिंदू संघटनांनी ’गीता पाठ समिती’ स्थापन करून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सामूहिक गीता पठणासाठी आतापर्यंत १ लाख, २० हजार लोकांनी नोंदणीही केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मात्र, कोलकाता पोलिसांनी या कार्यक्रमाला अद्याप परवानगी दिलेली नाही. दरम्यान, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना, हिंदू संघटनांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळेल, अशी आशा बाळगणेही चुकीचेच म्हणा. हिंदू संस्कृती आणि धर्माचा सन्मान ममतांच्या राज्यात होईल तरी कसा म्हणा? यंदा हनुमान जयंतीच्या काळातही ममतांनी हिंदू बांधवांना अल्पसंख्याकांवर अत्याचार होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. याचाच अर्थ, हिंदू अत्याचार करतात, असा घ्यायचा का? ‘जय श्रीराम’चा नारा ऐकताच ममतादीदी पुरत्या बिथरतात. आता तर श्रीरामनवमीनिमित्त बंगालमध्ये विविध ठिकाणी निघालेल्या मिरवणुकांवरही दगडफेकीच्या घटना घडल्या. मिरवणुकांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, तेव्हा ममतांनी कधीही समाजकंटकांना शांतता राखण्याचे आवाहन केले नाही. जगदीप धनखड राज्यपाल असतानाही, ममतांनी आपलेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न केला. बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये हत्यांचे सत्र तर आता नेहमीचेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीवर टीका करण्याची संधीदेखील ममतांनी सोडली नाही. बंगालमधील एकही निवडणूक अशी नाही, ज्यामध्ये हिंसाचार झालेला नसेल, भाजपच्या अनेक नेत्यांवर बंगालमध्ये हल्ले होत असतात. खुद्द भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाडीवरदेखील बंगालमध्ये हल्ला झालेला आहे. दुर्गापूजेसाठीही असेच अनेक नियम ममता सरकारकडून हिंदू बांधवांवर लादले जात असतात. मग प्रश्न हाच की, गीतापठणाने असा नेमका कोणता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे? का नेहमीप्रमाणे पंतप्रधानांना निमंत्रित केले म्हणून हा विरोध?
भगव्या जर्सीची अॅलर्जी...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदींना प्रारंभीपासूनच म्हणा हिंदू धर्माविषयी राग होताच. परंतु, आता त्यांना भगव्या रंगाचीसुद्धा अॅलर्जी झाली आहे. हिंदू, भाजप, हिंदुत्व यांच्याविषयी चुकीची विधाने करण्याची एकही संधी आजवर ममतादीदींनी दवडलेली नाहीच. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कोलकाता येथे आयोजित एका पूजन कार्यक्रमात आला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर संपूर्ण देशाला भगव्या रंगात रंगवण्याचा आरोप केला. यावेळी उदाहरण देताना, त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या बदलेल्या जर्सीचे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे ’साधारण वंदे भारत’ रेल्वेचा रंगही भगवा झाला असून, हे योग्य नसल्याचे ममता बॅनर्जी यांचे म्हणणे. तसेच आधी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी स्वतःचे पुतळे बांधण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आता प्रत्येक गोष्टीला ‘नमो’ नाव ठेवले जात असल्याचा आरोपही ममतांनी केला. हिंदू धर्मावरून आता भगव्या रंगाचाही त्रास ममतांना होत आहे. ’जय श्रीराम’च्या घोषणांनी तर ममतादीदींचा पाराच चढतो. मात्र, आता भगव्या रंगाने त्यांचा तीळपापड झाला आहे. मुळात भारतीय क्रिकेट संघाची जर्सी सध्या निळ्या रंगाची आहे. ममतांनी जो आरोप लावला आहे, त्यानुसार जी भगवी जर्सी आहे, ती भारतीय क्रिकेट संघ सरावादरम्यान घालत असतो. त्यामुळे ममतांनी अर्धवट माहितीवर भगव्या जर्सीवर आक्षेप घेतला आहे. तसे पाहिल्यास विश्वचषकामध्येे नेदरलॅण्डच्या संघानेही बलाढ्य संघांना पराभवाचा दणका देत, खळबळ माजवली होती. अंतिम चार संघांमध्ये नेदरलॅण्ड संघ आपली जागा बनवतो की काय, अशी एकवेळ परिस्थिती निर्माण झाली होती. क्रिकेटमध्ये अतिशय दुबळा संघ म्हणून गणल्या जाणार्या नेदरलॅण्डच्या संघाची जर्सीसुद्धा भगव्या रंगाची होती. मग फक्त भगव्या रंगाच्या जर्सीमुळे नेदरलॅण्ड हिंदू राष्ट्र होणार आहे का? तिरंग्यात तर सर्वात वरती भगवा रंग आहे, एवढेच नव्हे तर उगवता सूर्य आणि मावळता सूर्याच्या रंगाचं काय करायचं, याचे उत्तरही ममता बॅनर्जी यांनी द्यायला हवे. हिंदू, हिंदुत्व, हिंदूंचे सण इथपर्यंत ठीक होत. परंतु, क्रिकेट संघाची जर्सी आणि रेल्वेचा रंगही ममतांच्या डोळ्यात खुपतोय, ही एका राज्याच्या आणि तेही बंगालसारख्या कोणेएकेकाळी स्वातंत्र्य संग्रमाचे केंद्र असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी निश्चितच शोभणारी बाब नाही.