नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी काही ना काही योगदान देणाऱ्या देशभरातील ६२ कोटी रामभक्तांना विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) श्रीरामललाचा प्रसाद पोहोचविण्यात येणार आहे. अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत होणाऱ्या या अभुतपूर्व सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज होत आहे.
श्रीराम मंदिरासाठी आपापल्या क्षमतेप्रमाणे योगदान देणाऱ्या देशातील कोट्यवधी नागरिकांना श्रीरामाचा प्रसाद पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी विहिंपच्या ४५ संघटनात्मक प्रांताचे अधिकारी ४ नोव्हेंबर रोजी अयोध्येत दाखल होणार आहेत, येथून ते ५ नोव्हेंबर रोजी श्रीरामललाचा प्रसादरूपी ‘अक्षतकलश’ आपापल्या प्रांतांमध्ये रवाना होणार आहेत. हा ‘अक्षतकलश’ प्रांत, विभाग, ब्लॉक असा प्रवास करून श्रीरामभक्तांच्या घरी पोहोचणार आहे.
‘अक्षतकलशा’च्या माध्यमातून २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी जवळच्या मंदिरांमध्ये पोहोचून पूजा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विहिंपचे कार्यकर्ते करणार आहेत. आतापर्यंत एक लाखांहून अधिक मंदिरांमध्ये प्रार्थना करण्याची योजना आखण्यात आली आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशातील एकही मंदिर या मोहिमेत सहभागी होण्यापासून दूर राहू नये यासाठी विहिंप प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व मंदिरांचे प्रशासक आणि पुजारी यांच्याशी संपर्क साधला जात आहे.
श्रीराम मंदिराच्या उभारणीदरम्यान लोकांकडून वर्गणी गोळा करण्यासाठी विहिंपतर्फे ४४ दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात देशातील १३ लाख गावांतील ६२ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात विहिंपला यश आले होते. याशिवाय, राम मंदिराच्या आंदोलनापासून इतिहासाच्या विविध कालखंडात लाखो लोकांनी मंदिर उभारणीत आपली भूमिका बजावली होती. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनात या सर्वांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली आहे.