लय शोधताना

    19-Nov-2023   
Total Views | 169
Article on Violinist Pt. Milind Raikar

आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींवरून समस्त प्रेक्षकवर्गाला धुंद करणारे ज्येष्ठ कलाकार, व्हायोलिनवादक पं. मिलिंद रायकर. मूळचे गोव्यातील. परंतु, त्यांचा गोवा ते मुंबई प्रवास त्यांच्या संगीत साधनेइतकाच खडतर, रोमहर्षक आहे. त्यांच्या या सूरसाधनेविषयी..

तारा छेडल्या जातात, सूरतरंग निर्माण होतात आणि ते ऐकताना आपण झंकारून उठतो. पण, हेच सूर सिद्ध करण्यामागे त्या कलाकाराचा एक विलक्षण प्रवास असतो. सहज साध्य न होणार्‍या सुरासाठी केलेली अखंड साधना असते ती. पं. मिलिंद रायकर या व्हायोलिनवादकाबद्दल आपल्याला माहिती आहे; पण सापडत नसलेल्या एका लयीसाठी (मींडसाठी) गोव्यातून मुंबईपर्यंत त्यांनी धडपडत केलेल्या प्रवासाबद्दल, त्यातून त्यांना गवसत गेलेल्या माणसातील, जगण्यातील सुरावटीबद्दलचा हा प्रवास.

गोवा म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतात, ते सुंदर समुद्रकिनारे. ही भूमीच कलात्मक आहे. इथली माती कला प्रसवते. सृजनाचे सोहळे होतात ते इथेच. मिलिंद यांचा जन्म इथला. जसा संगीताचा कानोसा घेऊनच, त्यांचा जन्म झाला. वडील शाळेत शिक्षक, संवादिनीवादक. हे घरातलं वातावरण पाहून, तो छोटा पाच वर्षांचा मुलगा आपल्या गोड आवाजात गाऊ लागला. नंतर गिटार वाजवू लागला. ऑर्केस्ट्रामध्ये कला सादर करण्याचं, त्याच पहिलं वहिलं स्वप्न त्याने पाहिलं आणि त्यानंतर अशी अनेक स्वप्ने त्याला पडत गेली. एकेका स्वप्नाचा पाठपुरावा करतच, मिलिंद मोठे झाले. ही स्वप्न म्हणजे त्यांच्या साधनेतील प्रेरणा. त्या प्रेरणांनी त्यांना जगभर फिरवले अन् त्यांच्यासोबत गेलेल्या व्हायोलिनच्या निमित्ताने या भारतीय रागसंगीताचे कुतूहल मनामनात निर्माण झाले.

प्रश्न इथूनच सुरू होतो. जर रागसंगीताचा ध्यास आहे, तर त्यांनी सहज उपलब्ध असलेली भारतीय वाद्ये सोडून व्हायोलिनची निवड का केली असावी? आपला मुलगा गिटार वाजवतो; पण पाश्चिमात्य संगीतासोबतच त्याने हिंदुस्थानी रागसंगीतही शिकावे. त्यासाठी सतार, बासरी अशी भारतीय वाद्ये उपलब्ध आहेत. परंतु, आपल्या गोव्यात ती शिकवणारे कुणी नाहीत. तेव्हा व्हायोलिन एक माध्यम आहे. शिकण्यासाठी थोडेसे कठीण पण अतिशय सुरीले वाद्य. हे वडिलांचे स्वप्न. वडिलांच्या इच्छा मिलिंद यांना स्वप्ने पुरवत होत्या! सर्वच बाबतीत एक खंबीर आधार आणि अतूट विश्वासाने बांधलेलं हे बाप-लेकाचं नातं होतं. या नात्याचे पडसाद आता मिलिंद आणि यज्ञेश यांच्यातसुद्धा दिसतात. एकत्र सादरीकरण करताना, त्या दोघांचा एकमेकांकडे न पाहता केवळ व्हायोलिनच्या माध्यमातून जो संवाद होतो, तो नजर लागावी असा सुंदर.

इयत्ता नववीत असताना मिलिंद व्हायोलिन वाजवायला तयार झाले. त्यापूर्वी बाबांनी अनेकदा त्यांना याबाबत सांगितले होते. ज्यादिवशी मिलिंद यांचा होकार आला, त्याच दिवशी सायकलवर बसवून बाबांनी त्यांना एका बियर बारमध्ये नेले. ते एका ख्रिश्चन माणसाचे दुकान होते. त्यांनी पूर्वीच घेऊन ठेवलेली व्हायोलिन या दुकानात ठेवली होती. फादर शेवियरकडे त्यांची प्राथमिक शिकवणी सुरू झाली. घरात वडील संवादिनीवर एक-एक राग घेत, तेव्हा मिलिंद आपल्या पाश्चिमात्य पद्धतीने हिंदुस्थानी राग व्हायोलिनवर छेडण्याचा प्रयत्न करत. पाश्चिमात्य संगीतात संतत सूर नाहीत. ते संगीत तुटक आहे. परंतु, भारतीय संगीत म्हणजे एकच सलग सुरावट. पण, गोव्यात व्हायोलिन आणि रागसंगीत जाणणारा गुरू काही केल्या मिलिंद यांना सापडेना. इथे सुरू झाला, तो गुरू शोध. त्या नादात शिष्यवृत्ती मिळता-मिळता राहिली.

पुढे पणजीला गेल्यावर पं. बी एस मठ नावाच्या एका गुरूचा पत्ता मिलिंद यांना लागला. तारखांवर तारखा, वेळेवर वेळ देऊन मिलिंद मठ यांच्या घरी खेपा घालू लागले. शिष्याची चिकाटी तपासण्याचा गुरूंचा हा नेहमीचा खेळ. काही महिने असे गेल्यावर वडिलांच्या मध्यस्तीनेच प्रशिक्षण सुरू झाले. एकदिवस वडिलांनी सांगितले की, ”तू दिवसभर रियाज करणार असशील, तर महाविद्यालय सोडून दे.” महाविद्यालय संपले. मध्यंतरी एकदा ताज हॉटेलमध्ये सादरीकरण झाल्यानंतर, स्वप्नांच्या थैलीत एका अजून स्वप्नाची भर पडली. जोडीला चित्रपटात गायची इच्छा. तेव्हा हॉटेल आणि ऑर्केस्ट्रामध्ये मिलिंद आपली व्हायोलिन घेऊन जाऊ लागले, तशी आपला मुलगा चुकीच्या मार्गाने जाईल म्हणून वडिलांनी पुन्हा एकदा मध्यस्ती केली. शिष्यवृत्ती मिळाली आणि मुंबईला अंधेरीत पं. दातार यांच्याकडे त्यांचे शिक्षण सुरू झाले.

आयुष्याला मुंबईच्या लखलखीत लक्ष लक्ष प्रकाशवाटांचा स्पर्श झाला की, जगण्यालाही तेवढ्याच वाटा फुटतात. इथे त्यांची ट्रेनपासून अगदी संगीतसाधकाची मूलभूत गरज असलेल्या रियाजाच्या जागेपर्यंत वानवा होती. राहण्याची आणि जेवण्याची सोय मावशीकडे, त्यानंतर शिक्षण दातार गुरुजींच्या घरी, पुन्हा संध्याकाळी रियाजासाठी मामाच्या घरी. असा रोजचा २६ किलोमीटरचा सायकल फेरा सुरू झाला. एकदिवस वाटेने चालताना कुठल्यातरी गल्लीतून संगीताचे सूर ऐकू येऊ लागले, ते घर होते-गणेश धामणकर यांचे. एखाद्या उत्तम मैफलीत सर्व वाद्यांचे सूर जसे जुळतात, तसे गणेश यांच्याशी त्यांचे जुळले आणि रियाजासाठी हक्काचे घर त्यांना मिळाले.

पुढे सकाळी दातार गुरुजी, नंतर शाळा, पुढे किशोरी आमोणकरांचे घर, पुन्हा शाळा, संध्याकाळी रियाजासाठी गणेश यांचे घर. असे आयुष्य चहू बाजूंनी भिरभिरू लागले. पुढे भारताबाहेरील सादरीकरणासाठी त्यांचे देशाबाहेर आणि देशभर दौरे सुरू झाले आणि एकाच वेळी रागसंगीत आणि पाश्चिमात्य संगीत असा दोहोंचा मिलाफ जुळून आला. त्यांच्या व्हायोलिनलाही हीच सवय झाली. आज दातार परंपरा असलेली ’रायकर अकॅडमी ऑफ व्हायोलिन’ नव्या जिज्ञासू पिढीला सुरांचा मार्ग दाखवत अखंड विद्यादानाचे कार्य करते आहे.
 

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.
 
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121