'इसिस'चा भारतातील सुत्रधार वजिहुद्दीनला अटक! पुणे आणि दिल्ली मॉड्युलच्या सहकार्याने अनेक हल्ले करण्याचा कट
18-Nov-2023
Total Views | 124
लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) इसिस या दहशतवादी संघटनेविरुद्ध कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. नोव्हेंबर महिन्यात एटीएसने इसिसच्या अनेक दहशतवाद्यांना अटक केली आहे. आता इसिसचा स्वयंघोषित खलिफा असलेल्या वजिहुद्दीन याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
वजिहुद्दीन हा मूळचा छत्तीसगडमधील दुर्गचा आहे. दरम्यान, एटीएसकडून केवळ वजिहुद्दीनचीच नाही तर त्याच्याशी संबंधित लोकांचीही चौकशी करण्यात येत आहे. वजिहुद्दीन हाच इसिसचा भारतातील मास्टरमाईंड असून तो इसिसच्या पुणे आणि दिल्ली मॉड्युलच्या सहकार्याने अनेक हल्ल्यांची योजना आखत असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासोबतच इसिसच्या पुणे मॉड्यूलचा सदस्य शाहनवाजसोबत त्याने बॉम्बस्फोटांचे प्रशिक्षणही सुरू केले होते. तसेच वजिहुद्दीन हा रामपूर, संभल, अलिगढ ते उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत वेगवेगळ्या संघटनांमार्फत भारताविरुद्ध जिहादसाठी इस्लामी सैन्य तयार करत होता.
एटीएसने आता वजिहुद्दीनला अटक करत १० दिवसांच्या कोठडीची न्यायालयात मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून एटीएसकडून त्याच्या सर्व संपर्कांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्याने आतापर्यंत किती लोकांना कट्टरपंथी बनवले याचीही चौकशी केली जात आहे.