मुंबई (विशेष प्रतिनिधी): पश्चिम घाटातील तमिळनाडू राज्यातुन पालीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. 'निमास्पिस ट्रायड्रा' आणि 'निमास्पिस सुंदरा' अशी या पालीच्या प्रजातींची नावं ठेवण्यात आली आहेत. न्यूझिलंडच्या झूटॅक्सा या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर रोजी या संबंधीचा शोधप्रबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातुन रंगीबेरंगी पालीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध साताऱ्याचे अमित सय्यद यांनी लावला आहे. वन्यजीव संशोधक अमित सय्यद यांनी पालींची नावं त्यांच्या शरीरावर असलेल्या रचनेवरुन ठेवली आहेत. 'निमस्पिस ट्रायड्रा' या पालीमध्ये शरीरावर असणाऱ्या पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या अशा तीन रंगांमुळे ट्रायड्रा असे नाव देण्यात आले आहे. तर, शरीरावर असणाऱ्या काळ्या, पिवळ्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या सुंदर नक्षीमुळे 'निमस्पिस सुंदरा' असे नाव देण्यात आले आहे.
या कुळातील पालींवर गेल्या दहा वर्षापांसुन अभ्यास करणाऱ्या अमित यांना २०१८ मध्ये पहिल्यांदा पालीच दर्शन झालं होतं. ही वेगळी पाल असल्याचे लक्षात आल्यानंतर संशोधनांती नवीन संशोधन त्यांच्या हाती लागले आहे. या संशोधनामध्ये अमित सय्यद हे प्रमुख संशोधक असून त्यांच्यासमवेत सॅमसन कुरुंबकरण, राहुल खोत, शिवा हर्षन, ओमकार अधिकारी, आयान सय्यद, मासूम सय्यद, अहमद फैजल, अहमद जेरिथ, शुभंकर देशपांडे, जयदत्त पूरकायस्था आणि शवरी सुलाखे हे सहभागी होते.
"या दोन्ही पाली आकाराने अतिशय लहान असून त्या जास्तीत जास्त ३५ मिलिमीटर एवढ्याच लांबीच्या किंवा आकाराच्या असतात. भारतातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध असल्यामुळे पश्चिम घाटातील विविध जंगलामध्ये असंख्य प्रकारची लहान मोठे प्राणी आपले वास्तव्य टिकवुन आहेत.या पालींच्या शोधामुळे पश्चिम घाटातील सौंदर्यात भरच पडली आहे."
- अमित सय्यद
वन्यजीव संशोधक
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.