मागील काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचा कल हा म्युच्युअल फंडाकडे वाढलेला दिसतो. विविध अॅप्सच्या माध्यमातून अशाप्रकारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे तर अगदी सहजसोपे झाले आहे. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना बरेचदा परदेशातील विविध फंडांमध्येही गुंतवणुकीचे अनेक आकर्षक पर्याय ऐकीवात येतात किंवा त्यांच्या जाहिरातीही पाहायला मिळतात. पण, खरंच अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय फंडांमध्ये गुंतवणूक कशी करावी? त्याचे नियम-अटी नेमक्या काय असतात? अशी गुंतवणूक कितपत सुरक्षित असते? यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणारा हा लेख...
शेअर बाजाराला एक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडेही बघितले जाते. भारतात म्युच्युअल फंड विकणार्या बर्याच कंपन्या असून, त्यांच्या विविध म्युच्युअल फंड योजनादेखील आहेत. अशा या म्युच्युअल फंड योजना भारतात बर्याच लोकप्रिय झाल्या व यातील गुंतवणुकीत, गुंतवणूकदारांना आतापर्यंत चांगला परतावा मिळाला, मिळतो आहे व बाजाराचा ट्रेण्ड पाहिला, तर भविष्यातही मिळू शकेल.पण, भारतीय गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय फंडांतही गुंतवणूक करू शकतात. सध्याच्या जोडल्या गेलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय फंड देशांच्या आर्थिक उन्नतीसाठीनिश्चितच एक महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतातील गुंतवणूकदारांना जागतिक स्तरावर गुंतवणूक करायची असेल, तर ते भारताबाहेर प्रत्यक्ष शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा परदेशात अप्रत्यक्ष गुंतवणूक करणारे भारतातील आंतरराष्ट्रीय फंड यात गुंतवणूक करू शकतात. अशा जागतिक फंडात गुंतवणूक केल्यामुळे पोर्टफोलिओचे भौगोलिक विस्तृतीकरण साध्य करता येते. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेशी निगडित असणारी जोखीम कमी करणे शक्य होते. जागतिक फंडाची दीर्घ कालावधीसाठी जास्त परतावा देण्याची क्षमता असते. जागतिक फंडात गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदाराला निरनिराळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेत आणि शेअर बाजारात, औद्योगिक क्षेत्रात भिन्न जोखीम असलेल्या गुंतवणूक साधनातून गुंतवणूक करणे शक्य असते.
गुंतवणुकीसाठी जागतिक म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे. त्यातच म्युच्युअल फंड गुंतवणुकीत भारतीयांचे आकर्षण सातत्याने वाढत आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी इक्किटी शेअर तसेच रोखे, कर्ज अशा ‘डेट’ गुंतवणुकीशिवाय सोने, चांदी यामध्येदेखील गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंडांच्या जागतिक फंडांतून भारतीय गुंतवणूकदारांना परदेशातसुद्धा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करता येते. जागतिक फंडांचे व्यवहार भारतातील इतर फंडांप्रमाणेच होत असतात. जागतिक फंडात गुंतवणूकरुपयात केली जाते व म्युच्युअल फंड त्यांच्या धोरणानुसार एकत्रित रक्कम इतर देशातील गुंतवणूक साधनांतून परकीय चलनात करतात. जागतिक फंडांच्या युनिटची खरेदी-विक्री ही युनिटच्या ‘नेट अॅसेट व्हॅल्यू’ (एनएव्ही)नुसार केली जाते. अशा फंडांत एकरकमी गुंतवणूक करणे किंवा ‘एसआयपी’ (सिस्टीमॅटिक इन्व्हेसमेंट प्लान) करणे शक्य असते. अशा योजना प्राप्तिकर कायद्यानुसार,‘डेट’ फंडमध्ये येतात. परिणामी, विक्रीनंतर झालेल्या परताव्यावर ‘डेट’ योजनेप्रमाणेच कर तरतुदी लागू होतात.
आंतरराष्ट्रीय फंडांचे स्वरुप
अमेरिकेत, युरोपमध्ये, आशिया खंडामध्ये आशिया-प्रशांत व्यापून गुंतवणूक करणारे फंड, विशिष्ट देशांत गुंतवणूक करणारे फंड, उदाहरणार्थ. अमेरिका, चीन, जपान, तैवान इत्यादी एकाहून अधिक प्रदेशांत गुंतवणूक करणारे फंड, निरनिराळ्या स्कीमवर आधारित गुंतवणूक करणारे फंड, उदा. विकसनशील देश, जागतिक शेती उद्योग, सोने-चांदी उद्योग, जागतिक ऊर्जा, भारतीय गुंतवणूकदारांना परदेशात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करणारे आंतरराष्ट्रीय फंड आणि विकसनशील देशात गुंतवणूक करणारे फंड आकर्षक असतात. इतर प्रांतात गुंतवणूक करणारे फंड सध्या तरी आकर्षक वाटत नाही.अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी निगडित ं योजना - १) मिर अॅसेट एनवाय एस षरपस + शींष २) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल युएस ब्लूचिप इ क्विटी फंड ३) डीएसपी युएस फ्लेक्सिबल इक्विटी फंड ४) नियॉन इंडिया यूएस इक्विटी ऑपॉच्युनिटीज फंड या सर्व योजनांतून गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत किमान ९.९५ टक्के इतका परतावा मिळालेला आहे. भारतातील काही जागतिक फंड हे वरील कंपन्यांत प्रामुख्याने अमेरिकेत गुंतवणूक करतात.
‘मिरे अॅसेट एनव्हायएसईएफएएनजी प्लस इटीएफ’ची गुंतवणूक प्रामुख्याने अमेरिकेतील नव्या तंत्रज्ञान कंपन्यांत केली जाते. यातील गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना गेल्या वर्षात मोठा परतावा दिला आहे. ‘आयसीआयसीआयप्रुडेन्शिअल युएस ब्लूचिप इक्विटी फंडा’ने दहा उद्योग क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे. ज्यात वित्तीय सेवा २०.२७ टक्के, इतर सेवा २०.२३ टक्के व आरोग्य सेवा १८.२६ टक्के यांचा समावेश आहे. ‘डीएसपी युएस प्लेक्सिबल इक्विटी फंडा’ची गुंतवणूक ‘ब्लॅक रॉक ग्लोबल फंड्स’च्या ‘युएस फ्लेक्सिब्ल फंडा’त संपूर्णपणे केली आहे. ‘निपॉन इंडिया युएस इक्विटी ऑपॉर्च्युनिटिज फंडा’ची गुंतवणूक २५ कंपन्यांमध्ये आहे. २०२३ मध्ये अमेरिकेत सर्वांत मोठी समस्या म्हणजे वाढती महागाई ही होती. वाढविलेल्या व्याजदरांमुळे महागाई आटोक्यात आणण्यास मदत होत असून कंपन्यांच्या व्यवसायातील वाढ परत होताना दिसत आहे. त्यामुळेच अमेरिकेतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.देशात गुंतवणूक करणारे आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड प्रामुख्याने भारत, ब्राझील, इंडोनेशिया, तैवान, मलेशिया आदी विकसनशील देशांतील उद्योगसमूहात गुंतवणूक करत असतात. विकसनशीलदेशांतील गुंतवणुकीत जास्त जोखीम असते.
विकसनशील देशांत गुंतवणूक करणारे काही फंड
‘आदित्य बिर्ला सन लाईफ ग्लोबल इमर्जिंग ऑपॉर्च्युनिटिज फंडा’ची गुंतवणूक संपूर्णपणे परदेशातील आंतरराष्ट्रीय फंडात केली जाते. ‘कोटक ग्लोबल इमर्जिंग मार्केट फंडा’ची संपूर्ण गुंतवणूक कॅनडातील ‘सीआय इमर्जिंग मार्केट फंडा’त केली जाते. ‘एचएसबीसी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंडा’ची गुंतवणूक इंग्लंडच्या ‘एचएसबीसी ग्लोबल इन्व्हेस्टेमेंट फंड’ - ‘ग्लोबल इमर्जिंग मार्केट्स फंडा’मध्ये केली जाते. ‘एडलवाईज इमर्जिंग मार्केट ऑर्पोर्च्युनिटीज इक्विटी ऑफ शोअर फंडा’ची गुंतवणूक अमेरिकेतील ‘जेपी मॉर्गन फंड इमर्जिंग मार्केट ऑर्पोर्च्युनिटीज फंडा’त केली जाते.गेली कित्येक वर्षे युरोपमधील देशांची अर्थव्यवस्था फारशी चांगली नाही. अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. पुढच्या काही वर्षांत युरोपच्या देशांची अर्थव्यवस्था आव्हानात्मक असण्याची शक्यता असून, त्यामुळे युरोपात गुंतवणूक करणे अधिक जोखमीचे असे आणि फायदेशीर ठरणार होणार नाही. चीनची अर्थव्यवस्था पण सध्या अडचणीत असून ‘जीडीपी’ वाढ कमी होत चालली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता तशी कमीच आहे. अर्थव्यवस्था आणि धोरणांमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे जागतिक गुंतवणूकदार चीनमध्ये गुंतवणूक करण्यात फारसे उत्सुकही दिसत नाहीत. जपान हा एक प्रगत देश असून, जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.
आंतरराष्ट्रीय फंडातील गुंतवणुकीचे फायदे (१) गुंतवणूक रुपयात होत असल्यामुळेगुंतवणूकदाराला परकीय चलन खरेदी करावे लागत नाही. त्यामुळे गुंतवूकदाराला गुंतवणूक करतेवेळी अतिरिक्त खर्च करावा लागत नाही. (२) आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडात काही प्रमाणात गुंतवणूक केली, तर भौगोलिक ‘डायव्हर्सिफिकेशन’ होते. त्यामुळे जोखीम कमी होते (३) आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड हे भारतातील इतर म्युच्युअल फंडांप्रमाणे गुंतवणुकीसाठी अतिशय सुलभ असतात. सर्व व्यवहार भारतातील म्युच्युअल फंडांप्रमाणे होतात. (४) गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नसते. छोटी रक्कम गुंतविणेसुद्धा शक्य असते. (५) एसआयपी, एसटीपी किंवा एकरकमी गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध असतात. (६) या म्युच्युअल फंडांसाठी ‘लॉक-इन-पिरियड’ नसतो. त्यामुळे ‘एक्झिट लोड’ भरून कधीही गुंतवणूक काढून घेता येते. (७) जागतिक अनुभव असलेले फंड सखोल संशोधन आणि माहितीनुसार निर्णय घेत असतात, ज्याचा फायदा फंडाला होतो. (८) गुंतवणूक काढताना रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर जर खरेदीच्यावेळी असलेल्या डॉलरच्या किमतीपेक्षा जास्त असेल, तर विकल्यानंतर गुंतवणूकदारांना परकीय चलन परिवर्तनामुळे अधिक फायदा होऊ शकतो.
तोटे
(१) जागतिक फंडात गुंतवणूक परकीय चलनात होत असल्यामुळे परकीय चलनातील दराच्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांचे नुकसानदेखील होऊ शकते. (२) जागतिक स्तरावर असलेल्या आव्हानांमुळे अशा फंडांच्या कामगिरीवर विपरित परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे गुंतवणूकदाराला अपेक्षित परतावा न मिळण्याची जोखीम असते. (३) गुंतवणूकदारांना परदेशात गुंतवणूक करण्याचा अनुभव किंवा ज्ञान सहसा नसते. त्यामुळे फंड मॅनेजरवर जास्त विसंबून राहावे लागते. (४) गुंतवणूक काढताना रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर जर खरेदीच्या वेळी असलेल्या डॉलरच्या किमतीपेक्षा कमी असेल, तर विकल्यानंतर गुंतवणूकदारांना परकीय चलन परिवर्तनामुुळे नुकसान होऊ शकते. (५) आंतरराष्ट्रीय फंड हे भारतात ‘डेट फंड’ या वर्गात गणले जातात. त्यामुळे ‘डेट फंडां’ना लागू होणार्या कर तरतुदी आंतरराष्ट्रीय फंडांलादेखील लागू शकतात.जागतिकीकरणाचे फायदे घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि जागतिक ‘डायव्हर्सिफिकेशन’ मिळविण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे दीर्घ कालावधीसाठी चांगले ठरेल. अमेरिका व इतर विकसनशील देशांत गुंतवणूक करण्यासाठी ‘एसआयपी’चा चांगला उपलब्ध आहे. थोडी रक्कम दीर्घ कालावधीसाठी गुंतवली, तर जागतिक गुंतवणुकीचा मोठा निधी निर्माण होईल.