मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली. भारताने नाणेफेक जिंकत किवींना गोलंदाजीचे आमंत्रण दिले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी किवींची फलंदाज फळी मैदानात उतरेल. किवी संघ यात यशस्वी ठरतो की, भारतीय माऱ्यासमोर किवींचा संघ ढेपाळतो, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
दरम्यान, सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेट्ससाठी ७१ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर ७९ धावांवर खेळत असताना गिलला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने विराट कोहलीच्या मदतीने १६३ धावांची विक्रमी भागीदारीदेखील केली.
तसेच, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात शतकी खेळी करत नवा इतिहास रचला. विराटने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा मानकरी होण्याचा बहुमान त्याने पटकाविला. एकंदरीत, वानखेडेसारख्या लाल मातीच्या पिचवर किवींच्या फलंदाजीची खरी परीक्षा असणार आहे.