बंगळुरु : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने भरती परीक्षेच्या वेळी हिजाबसारख्या डोकं झाकण्याऱ्या कपड्यांवर बंदी घातली आहे. दरम्यान, परिक्षेच्या वेळी केवळ मंगळसूत्र घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रात ब्लूटूथ, इयरफोन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
यासोबतच परीक्षेच्या वेळी मुलींना उंच टाचांचे शूज, जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी आहे. दरम्यान, कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या ड्रेस कोडमध्ये प्रतिबंधित कपड्याच्या यादीमध्ये हिजाबचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. परंतु भरती परीक्षेच्या वेळी डोके झाकण्याबाबतच्या नियमांमध्ये हिजाबवरही बंदी असेल हे स्पष्ट आहे.
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने राज्यातील बोर्डाच्या अनेक आगामी भरती परीक्षांबाबत हा निर्णय घेतला आहे. राज्यभरात नोकरभरतीसाठी १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
काही विद्यार्थांकडून परिक्षेदरम्यान ब्ल्युटूथ उपकरणांचा वापर होत असल्याच्या तक्रारींनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यानुसार परिक्षेच्या वेळी कुठल्याही प्रकारे डोकं किंवा तोंड झाकण्यावर बंदी आणण्यात आली आहे.