वडाळे तलावावर फटाके वाजवण्यास बंदी

पक्ष्यांचा अधिवास वाचवण्यासाठी पनवेल महापालिकेचा निर्णय

    13-Nov-2023   
Total Views |


vadale lake


मुंबई (विशेष प्रतिनिधी): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिम कोर्टाने फटाके वाजवण्यावर निर्बंध लावले आहेत. मुंबई आणि परिसरातील वाढते प्रदुषण पाहता पनवेल महानगरपालिकेने वडाळे तलावावर फटाके वाजवण्यावर बंदी घातली आहे. पनवेलमधील वडाळे तलाव अनेक स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असल्यामुळे त्यांचे फटाक्यांपासुन संरक्षण व्हावे या दृष्टीकोनातुन स्थानिक पक्षी निरिक्षकांनी हा निर्णय घेण्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडे हा प्रस्ताव मांडला होता. स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांच्या अधिवासाचा धोका लक्षात घेत पनवेल महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.


मुंबईतील आणि एकुणच देशातील प्रदुषणाचा प्रश्न गंभीर होत चाललाय. दिल्लीपेक्षाही मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरल्याचे निदर्शनास आले होते. आरोग्याच्या अनेक समस्यांबरोबर पर्यावरणाला ही याचा धोका असलेला पहायला मिळत आहे. दरवर्षी, हिवाळ्याच्या काळात अनेक पक्षी भारतात आणि महाराष्ट्राच्या पाणथळ ठिकाणांवर आलेले पहायला मिळतात. हिवाळ्याचा संपुर्ण कालावधी ते भारतात असतात. त्याचबरोबर, पाणथळ ठिकाणे अनेक स्थानिक पक्ष्यांचा अधिवास असतो. त्यांची घरटी, प्रजननाच्या जागा, तसेच खाद्याच्या जागा ही पाणथळ ठिकाणे असल्यामुळे या जागांचे संवर्धन होणे किती गरजेचे आहे, हे यामुळे लक्षात येतेच.


दरम्यान, नुकतेच वडाळे तलावाचे सौंदर्यीकरण केले गेले. यामुळे ही पक्ष्यांना त्रास होऊ शकतो यामुळे पर्यावरण प्रेमी काहीसे नाराज होते. तलावाच्या बाहेर पोस्टर जाहिराती लावुन जनजागृती करण्याच्या प्रयत्न केला गेला असुन पनवेल महापालिकेच्या या निर्णयाचे आता स्वागत होताना दिसत आहे. "वडाळे तलावावर अनेक पक्ष्यांचा अधिवास असुन हा निर्णय घेणं अत्यंत गरजेचं होतं. फटाके न वाजवण्याबाबत फलकांद्वारे सांगितले गेले असले तरी अजुनही काही हुल्लडबाज फाटाक्यांची आतषबाजी करताना दिसत आहेत", अशी माहिती स्थानिक पक्षी अभ्यासक माधव आठवले यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली आहे.



समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121