दि. १० जून २०२०. राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन पुण्यात साजारा होत होता. ह्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ह्याचं कार्यक्रमात फुले पगडीचा स्वीकार करायच्या सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. खुद्द याच कार्यक्रमात सुरुवातीला शरद पवार, भुजबळांनी पुणेरी पगडी घातली आणि नंतर फुले पगडीचं माहात्म्य त्यांच्या ध्यानात आलं. मग छगन भुजबळांच्या डोक्यावर फुले पगडी शरद पवारांनी घातली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ओबीसींचा आहे, असा प्रयत्न शरद पवारांनी उपस्थितांना करुन देण्यास सुरुवात केली. आज हे सगळ सांगण्याची गरज काय तर नुकतेच शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हायरल होणाऱ्या दाखल्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.
कुणी म्हटलं हाच दाखला खरा आहे कुणी म्हटलं हा दाखला खोटायं. जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन पहाता शरद पवारांना ओबीसी म्हटलं गेलं याचा पवार गटाने संताप व्यक्त करत हा सगळा बालीशपणा असल्याचं म्हटलंयं. लेखक आणि व्याख्याते नामदेवराव जाधव यांनी १० नोव्हेंबरला एक फेसबूक पोस्ट केली होती ज्यात ते म्हणतात, "शरद पवार हेच मराठा आरक्षण चे मारेकरी हे मी पुरावनिशी उघड पाडले म्हणून मला गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमक्या येत आहेत. आता आम्हाला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची आहे. सोबतच पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात हे होत आहे या गुंड प्रवृत्तीचा निषेध." सोबत त्यांनी वन इंडिया या संकेतस्थळाचा दाखला दिलायं. ज्यात पवारांचे पूर्ण नाव नाव, जन्म ठिकाणी, जन्मतारीख, पक्षाचं नाव, व्यवसाय, धर्म आणि त्याखाली जातीचा उल्लेख करण्यात आलाय. ज्यात शरद पवारांच्या जातीचा उल्लेख ओबीसी असा करण्यात आलाय.
पवारांची जात ही ओबीसी असल्याचं दाखवत पवार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत, असा आरोप आपल्या विविध व्हिडिओमध्ये त्यांनी केलायं. पण या जातीच्या दाखल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना कामाला लावलय. कारण ह्यावर आता माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आणि वादविवाद सुरु झालीयं. त्यामुळे ओबीसी दाखल्याने नेमंक पवारांना कसं गोत्यात आणलंय. हे प्रकरण नेमंक कसं सुरु झालं? ह्याबद्दल पवार गटाला नेमकं स्पष्टीकरण का द्यावं लागतयं?मुळात १० नोव्हेंबर रोजी व्याख्याते नामदेवराव जाधव यांनी फेसबुकवर शरद पवारांबद्दलचे एक सर्टिफिकेट पोस्ट केले. त्यात शरद पवारांच्या वैयक्तिक माहितीसह त्यांच्या जातीचा सुद्धा उल्लेख होता. त्यात त्यांची जात ओबीसी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे दि. १२ नोव्हेंबरला सोशल मीडियावर अन्य सोशल मीडिया युजर्सकडून पवारांचे हे सर्टिफिकेट व्हायरल करण्यात आले. मग सुप्रिया सुळे , जयंत पाटील, रोहित पवार यासर्वांनीच माध्यमांसमोर येत या प्रकरणी आपली भुमिका मांडली.
एकंदरित या सगळ्यांच्या बोलण्याचा सूर असा होता की, शरद पवार मराठाचं आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने ओबीसी असल्याचे व्हायरल होणारे सर्टिफिकेट बनावट आहे. मुळात शरद पवारांच्या आजवरच्या राजकारणाकडे पाहिलं तर मराठ्याचा नेता म्हणून जनमानसात त्यांची ओळख आहे. मग अशावेळी सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या सर्टिफिकेटला उत्तर देऊन पवार मराठा असल्याचे सतत सांगण्याची गरज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना का लागली? असा प्रश्न ही निर्माण होतो. मुळात मधल्या काळात ओबीसी मताच्या राजकारणासाठी मराठ्यांना वेगळ पाडण्याचे अनेक मनसुबे पवारांनी रचले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो. दुसरीकडे भुजबळांना ओबीसी नेता म्हणून ओळख मिळवून देण्यात ही पवारांचा मोलाचा वाटा होता. पण आता छगन भुजबळ ही शरद पवारांसोबत नाहीत. त्यात आधीच मराठा आरक्षणासंबधी शरद पवारांची भुमिका अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी त्यांना मराठा आरक्षणा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवढा महत्वाचा नाही. असं वक्तव्य केलं होत.
त्यावेळी मराठा समाजाच्या मोर्चाला पवारांनी पाठिंबा दिला नव्हता. मराठा समाजानं मग अशा नेतृत्वावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. पवार ओबीसी नाहीत, हे सांगावं लागलं यातच पवार गटाची हार आहे. शरद पवारांनी आपली ओळख राष्ट्रीय स्तरावर मराठा नेता म्हणून केली. मात्र, दुसरीकडे २०१४ मध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देऊ केले. तुष्टीकरणाच्या राजकारणाचाही आरोप शरद पवारांवर झाला. याबद्दल नामदेव राव जाधव यांनी आणखी एक व्हीडिओद्वारे त्यांच्यावर आरोप केला आहे. ते म्हणाले - २३ मार्च १९९४ हा दिवस मराठ्यासाठी काळा दिवस आहे. कारण ह्याच दिवशी मराठ्याचे आरक्षण ओबीसींना देण्यात आले. त्यामुळे जर शरद पवार मराठा असते तर त्यांनी हा अन्याय मराठ्यांवर होऊ दिला नसता. त्यामुळे शरद पवार ओबीसी नेते असल्याचा दावा ही जाधव यांनी केला. दरम्यान त्यांनी २३ मार्च १९९४ च्या जीआरची श्र्वेतपत्रिका काढण्याची मागणी ही जाधव यांनी केली. त्यामुळे ओबीसी समाजाशी आमचं भाडणं नाही, तर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्यासोबत असल्याचं ही जाधव यांनी सांगितले.
मुळात राजकारणात पवारांची भुमिका संभ्रमात टाकणारी होती. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नव्हती, छत्रपतींना गोब्राम्हणप्रतिपालक म्हणण्यास पवारांतर्फे झालेला विरोध असो किंवा छत्रपती संभाजीराजेंचा धर्मवीर म्हणण्यास केलेला विरोध पहाता याबाबतीत आधीच मराठा समाजाचा रोष पवारांवर आहेच. पण ह्या दाखला प्रकरणामुळे आणखीन नुकसान होण्याचं लक्षात आल्याने ह्या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आक्रमक झालेत. त्यामुळे आपणच विणलेल्या जाळ्यात स्वतः पवार गट अडकलायं का? आणि त्यामुळेच मराठा असल्याचं सांगण्याची गरज भासत आहे का? असा प्रश्न ही निर्माण होतोय. तसेच महाराष्ट्राचं सोशल इंजिनिअरींग जमतं, असा दावा करणाऱ्या शरद पवारांना एका व्हायरल सर्टिफिकेटने येवढा धक्का का बसलाय? असा प्रश्न वांरवार निर्माण होतोयं.