लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादासंबंधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
११ नोव्हेंबर रोजी याबद्दलची माहिती पुढे आली आहे. राकीब इमाम अन्सारी, नावेद अन्सारी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाजिम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दहशतवादी मुस्लीम तरुणांना इसिसशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हे चारही जण तरुणांना जिहादबद्दल मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षण देत असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या अब्दुल्ला अर्शलान, तारिक आणि वझिउद्दीन यांच्या चौकशीदरम्यान एटीएसला महत्त्वाचे सुगावे मिळाले होते. त्याआधारे १० आणि ११ नोव्हेंबरला अलीगड, संभल आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये एटीएसकडून छापे टाकण्यात आले.
यावेळी जवळपास ६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीनंतर राकीब इमाम अन्सारी, नावेद अन्सारी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाजिम यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना अलीगड आणि आसपासच्या परिसरात इसिसचे मॉड्यूल तयार करायचे असल्याचे सांगण्यात येत आहे.