स्वरोदय शास्त्राच्या साधनेने स्वरांचा पंचगुणात्मक अनुभव येतो व साधक रागरागिण्यांची स्वरुपे, सहवास आणि तत्सम पंचगुण अनुभवू शकतो. श्रीकृष्णाच्या रासक्रीडेतील अनुभव असल्याच स्वरज्ञानींना येऊ शकतात. जड उपकरणातून हे अनुभव येत नाहीत. रात्रीमागे रात्री साधनेत घालविण्यापेक्षा गप्पा, गांजा, मदिरा आणि मदिराक्षींच्या सेवनात आम्ही सर्वच करू, पण नैष्ठिक साधन करायचे म्हटले म्हणजे आमच्या अंगावर काटा उभा राहतो आणि कसलाच अनुभव न घेता हे सर्व थोतांड आहे, असा शेरा मारून आम्ही स्वतःला धन्य व श्रेष्ठ बुद्धिवादी समजतो.
वरील साधन निष्ठेने व व्रतस्थरित्या केल्यास नाडी शुद्धी होऊन आजही साधकाला स्वरांच्या पंचगुणात्मक अवस्थांचा अनुभव येईल, याची खात्री लेखक स्वतःच्या अनुभवाला धरून देऊ शकतो. मात्र, ’केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ ही समर्थांची उक्ती साधकाने मनावर बिंबवून तद्नुसार वागणे अत्यावश्यक आहे. साधना म्हणजे शिळोप्याच्या गप्पा व तर्कटांचा शुष्क वाद नव्हे. स्वरसाधना साध्य झाल्याने गायकाला आपल्या गेय राग-रागिण्यांची स्वरुपे अवकाशात पाहता येतात. स्वर ज्ञानाच्या या सिद्धींचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. बोलपटात नादाचे रुपांतर विद्युतलहरीत म्हणजे प्रकाशात करून पुन्हा त्या प्रकाशलहरींचे रुपांतर नादात करतात. प्रकाशाला तीन बाजू म्हणजे लांबी, रुंदी आणि खोली देण्याचा प्रयत्न आता साध्य झाला आहे. त्याला ‘थ्रीडी छायाचित्रण’ असे म्हणतात. प्रकाशाला नादाचे रुप देऊन त्या नादाला प्रकाशाद्वारे किंवा नादाद्वारेच स्पर्श, गंध आणि स्वाद देता आल्यास नाद पंचगुणात्मक होईल. नादाला स्वाद देण्याचाही प्रयत्न यशस्वी झाला आहे.
आता राहिला गंध व स्पर्श. गंधगुण प्रकाशगुणापेक्षा अती जड आणि स्पर्श गुण प्रकाशवेगापेक्षा अती वेगवान व सूक्ष्म असल्याने आजतागायत वैज्ञानिकांना चित्रपटाला किंवा स्वरांना गंध आणि स्पर्श हे गुण प्राप्त करून देण्याच्याबाबतीत यश येऊ शकले नाही. पुढे कदाचित येईलही, पण वरील किमया बाह्य उपकरणांद्वारे साधावी लागेल. उपकरण म्हटले की, त्यांना मर्यादा आलीच. गानयोगी नादांचे पंचगुण स्वतःच बाह्य उपकरणांशिवाय अनुभव शकतो. म्हणून असला गायक गानयोगी आणि त्याच्या त्यादृष्टीने साकारलेल्या पद्धतशीर शास्त्रीय गायनाला गानयोग म्हणत असत व आजही म्हणतात. पण, असा गानयोगी होण्याकरिता नैष्ठिक जीवन जगण्याची आवश्यकता असते. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, पण त्यामागे चंद्रावर पाऊल ठेवणार्या अंतराळयात्रीपासून तो त्यांना तसला अंतराळप्रवास सुकर करण्याकरिता साहाय्य करणारे सहस्त्रावधी वैज्ञानिक या सर्वांना एक प्रकारचे नैष्ठिक अनुशासनबद्ध जीवन जगावे लागते व रात्रंदिवस खपावे लागते. पण, सहस्त्रावधींच्या नैष्ठिक परिश्रमाचे फळ चंद्रावर उतरणार्या दोघा-चौघा अंतराळवीरांनाच प्राप्त होते. गानयोगातील गानयोग्याचे नैष्ठिक जीवन त्याच्याच कामाला येते. शिवाय त्याची फलश्रुती तो इतरांनाही देऊ शकतो. गानयोगाची सत्ये व सिद्धी पडताळून पाहून त्या सामान्यांच्या दारी राबविण्याकरिता नैष्ठिक जीवन जगू शकणार्या अनुशासनबद्ध तापसांची आज पुन्हा आवश्यकता आहे. पाश्चात्यांनी बाह्य उपकरणांच्याद्वारे नादांची द्विगुणात्मक अनुभूती घेतली, तर त्यावर भाळून जाऊन त्यांची भाटगिरी करण्यापेक्षा स्वतःच त्याचे पंचगुणात्मक अनुभव घेणे केव्हाही श्रेयस्कर होईल, यात शंका नाही.
योग्याच्या असामान्य शक्ती
असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो की, वैज्ञानिक सत्यांचा अनुभव वैज्ञानिक उपकरणाद्वारे सर्वांनाच येऊ शकतो. मग गानयोगातील अनुभव सर्वांनाच का येऊ नये? प्रश्न वरकरणी योग्य वाटत असला, तरी वैज्ञानिक अनुभव आणि यौगिक अनुभव यात मुलतःच भेद असल्याने त्यांच्या अनुभूतीकरिता केल्या जाणार्या प्रयत्न प्रकारातही भेद असणारे वैज्ञानिक अनुभव बाह्य उपकरणांच्याद्वारे प्राप्त होऊ शकत असल्याने ज्या कोणाजवळ ती उपकरणे असतील व ज्यांना ती व्यवस्थित हाताळता येत असतील, त्यांना त्या वैज्ञानिक सत्यांचा अनुभव घेता येईल. वैज्ञानिक अनुभव परतंत्र व मर्यादित स्वरुपाचे असतात. एकाच उपकरणावर सर्वच प्रकारचे अनुभव येऊ शकत नाहीत. नाद ऐकण्याचे उपकरण निराळे, तर वर्णाची दृश्यप्रचिती घेण्याचे उपकरण निराळेच असते. त्या सर्व अनुभवांचा साक्षात्कार होण्याकरिता एकच उपकरण अपुरे असते. या दृष्टीने सर्व गुणांचा सर्वतोपरी अनुभव घेण्याकरिता सहस्त्रावधी उपकरणे गोळा करावी लागतील व चालू करावी लागतील. एवढेही करून प्रत्येक गुणाची अनुभूती भिन्न भिन्न प्रकारे येईल. त्यांची एक समयावच्छेदे करून एकत्रच अनुभूती घेणे आज तरी अशक्य आहे. एवढी सर्व उपकरणे एकाच व्यक्तीजवळ असणे आणि ती सर्व उपकरणे एकट्यालाच समर्थपणे हाताळता येणे अशक्यप्राय आहे.
शिवाय बाह्य उत्तेजन असल्याशिवाय वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग होणे अशक्य आहे. उपकरणे स्वयंभु नसतात, म्हणजे आकाशवाणीवरुन वार्ता व संगीत प्रसारित केल्याशिवाय घरोघरी असणार्या रेडिओवर गाणी व वार्ता ऐकूच येणार नाहीत. पण, यौगिक सामर्थ्याचे अनुभव घेण्याचे एकमात्र उपकरण म्हणजे मानवी शरीर व त्या शरीरात नांदणारे अंतःकरण हे होय. एकाच शरीराच्या आधारे असणारे व सर्व अनुभवांना पारखू शकणारे एकच उपकरण! यौगिक अनुभव बाह्य उत्तेजनाशिवाय अनुभवाला येऊ शकतात. कारण, योगशास्त्राचा एक महान सिद्धांत आहे, ’जे पिंडी ते ब्रह्मांडी.’ त्यामुळे योग्याचे अनुभव स्वतंत्र, स्वयंभु व स्वसंवेद्य असतात. त्यांना देशकालाचे बंधन नाही. केवळ एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, ती म्हणजे हे सर्व अनुभवू शकणारे शरीर व अंतःकरणाचे उपकरण अत्यंत कार्यक्षम व शक्तिशाली ठेवण्याकरीता नैष्ठिक अनुशासनबद्ध जीवन! मानवी इंद्रियांच्या शक्ती मर्यादित असतात. मानवाने आपल्या इंद्रियांच्या बर्याच शक्ती गमावल्या आहेत. कुत्र्यांना दूरचे ऐकू येते व त्यांचे घ्राणेन्द्रिय अतिसूक्ष्म असते. मानव याबाबतीत बराच मागे आहे. गरुड पक्षाला बरेच दूरचे दिसते.
माणूस इथेही कमी पडतो. कावळ्याला लिंगदेह किंवा प्रेतयोनी दिसते, तर माणूस याबाबतीत कावळ्यावर पूर्णपणे अवलंबून असतो. मरणोत्तर संस्कारात कावळ्याकडून पिंड शिवला गेला की तो जीवात्मा या देहातून मुक्त झाला, असे मानण्यात येते. कावळा पिंड शिवत नसल्यास त्या मृत शरीराचा जीवात्मा त्या पिंडाभोवती व शरीराभोवती फिरत असतो. त्यामुळे कावळा त्या पिंडाला स्पर्श करू शकत नाही, अशी शास्त्रीय समजूत आहे. यावरून कावळ्याला सूक्ष्म देह पाहता येतो, असे मानले गेले आहे. सूर्याच्या किरणांचे पृथक्करण केल्यास त्यातून दृश्यमान होणारे सप्तरंगच असतात. परंतु या सप्तरंगापूर्वी आणि नंतरही अनेक रंग शलाका असतात. लाल रंगापूर्वीच्या रंग शलाकांना इन्फ्रारेड तर जांभळ्या रंगानंतरच्या रंगशलाकांना ‘अल्ट्रावायोलेट’ असे म्हणतात.
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
योगिराज हरकरे
९७०२९३७३५७