नवी दिल्ली : भारतात २०२२ साली ६६ हजार ७४४ लोकांचा हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरल्याने रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा आकडा रस्ते अपघातातील एकूण बळींच्या ४० टक्के आहे, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या ‘भारतातील रस्ते अपघात २०२२’ या अहवालात दिसून आले आहे.
अहवालानुसार २०२२ या एका वर्षात देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश क्षेत्रात एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघात झाले आणि त्यामध्ये १,६८,४९१ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ४,४३,३३६ जण जखमी झाले आहेत. गतवर्षातील आकडेवारीशी तुलना करता, या अहवालानुसार २०२२ या वर्षी अपघातात ११.९%, मृत्युंमध्ये ९.४% तर जखमींच्या प्रमाणात १५.३% वाढ झाली आहे.
हेल्मेट आणि सीट बेल्ट सारख्या सुरक्षिततेच्या उपायांचा अवलंब न केल्यामुळे ६६,७४४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे प्रमाणे एकूण मृत्यूच्या ४० टक्के आहे. काही अपवाद वगळता सर्व दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अनिवार्य आहे, परंतु गेल्या वर्षी हेल्मेट न घातल्यामुळे ५०,०२९ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. त्यापैकी ३५,६९२ (७१.३ टक्के) चालक आणि १४,३३७ (२८.७ टक्के) मागे बसणारे होते. त्याचप्रमाणे १६७१५ लोकांना सीट बेल्ट न लावल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी ८३८४ चालक आणि उर्वरित ८३३१ सहप्रवासी होते.
अतिवेग आणि लेनची शिस्त न पाळणे हेदेखेली रस्ते अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याने २०२२ मध्ये २२,५८६ अपघात झाले, ज्यात ९०९४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि २१,७४५ लोक जखमी झाले. त्यामुळे २०२१ सालच्या तुलनेत अपघातांमध्ये ५.१ टक्के, मृत्यूंमध्ये १२ टक्के आणि जखमींच्या संख्येत ६.८ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्याने ३३९५ जणांचा मृत्यू झाला. तसेच यामुळे झालेल्या ७५५८ अपघातांमध्ये ६२५५ जण जखमी झाले आहेत.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध
रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्याप्रती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कटिबद्ध असल्याचे मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. रस्त्यांचा वापर करणाऱ्यांची वर्तणूक, रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, वाहनांचे मापदंड, वाहतूक नियमांची अंमलबजावणी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका अशा विविध पैलूंवर देखील मंत्रालय काम करत आहे. केंद्रीय मंत्रालयाने इतर विविध संबंधित संघटना तसेच भागधारक यांच्या सहकार्याने शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते तसेच वाहने अशा दोन्हींची), अंमलबजावणी तसेच आपत्कालीन सेवा या चार घटकांवर लक्ष केंद्रित करून रस्ते सुरक्षेची समस्या सोडवण्यासाठी बहु-आयामी धोरण तयार केले आहे.