निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! 'या' पाच राज्यात होणार निवडणूक
६० लाख मतदार प्रथमच करणार मतदान
09-Oct-2023
Total Views | 68
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा सोमवारी जाहीर केल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर, तर छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे सर्व राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. ते म्हणाले, छत्तीसगढ वगळता उर्वरित चार राज्यांतील निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या पाचही राज्यांच्या मतदानाची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
या निवडणुकांमध्ये एकूण १६.१४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील, त्यापैकी ८.२ कोटी पुरुष आणि ७.८ कोटी महिला मतदार असतील. यावेळी ६०.२ लाख नवीन मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. यासोबतच राज्यनिहाय आकडेवारी सादर करताना ते म्हणाले की, मध्य प्रदेशात ५.६ कोटी, राजस्थानमध्ये ५.२५ कोटी मतदार, तेलंगणात ३.१७ कोटी मतदार, छत्तीसगडमध्ये २.०३ कोटी मतदार, तर मिझोराममध्ये ८.५२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
५ राज्यांतील ६७९ विधानसभा जागांसाठी १.७७ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत
१७७३४ मॉडेल बूथ आणि ६२१ मतदान केंद्रे दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केली जातील
८१९२ मतदान केंद्रांवर महिला कमान सांभाळतील. १.०१ लाख मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे.
वनवासी खास बूथ असतील. दोन किलोमीटर परिसरात मतदान केंद्रे असतील
सी व्हिजिल अॅपच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अॅपच्या माध्यमातून लोकांना तक्रार करता येणार आहे.