हमासच्या हल्ल्यात १० नेपाळी विद्यार्थ्यांचा मृत्यू!
09-Oct-2023
Total Views | 55
जेरुसलेम : इस्त्रायलवर पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने हल्ला केल्यानंतर अनेक निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. दरम्यान, या हल्ल्यात जवळपास १० नेपाळी विद्यार्थी ठार झाले असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. त्यामुळे इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यात १० नेपाळी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. तसेच 'शिका आणि कमवा' या कार्यक्रमांतर्गत १७ नेपाळी विद्यार्थी दक्षिण इस्रायलमधील कुबुझ अल्युमिम येथे राहत होते.
त्यापैकी दोन जण सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले असून तीन विद्यार्थी जखमी झाल्याचेही यात सांगण्यात आले आहे. गाझा पट्टीतून हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्त्रायलवर रॉकेट हल्ला केला. त्यानंतर इस्त्रायलनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचे ठरवले.
त्यामुळे गाझा आणि इस्त्रायल या दोघांमध्येही युद्ध सुरु आहे. यात हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून असंख्य जखमी झाले आहेत. याआधीही हमासने इस्त्रायलवर अनेक हल्ले केलेत. परंतू, हा हल्ला सर्वात भीषण असल्याचे म्हटले जात आहे.