‘आशियाई क्रीडा स्पर्धा’ आणि भारताची चमकदार कामगिरी

    08-Oct-2023
Total Views | 139
Indian Players Performance Asian Games Hangzhou 2022

चार वर्षांआड होणार्‍या ‘आशियाई क्रीडा स्पर्धा’ यावेळेस चीनमधील हांगझाऊ शहरात १९व्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धा हांगझोऊ २०२२’ अशा नावाने संपन्न झाल्या. चीनमधली आताची ही तिसरी स्पर्धा, आधी २०२२ मध्ये नियोजित होती. पण, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे तेव्हा न होता, त्या स्पर्धा दि. २६ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपन्न झाल्या. फुटबॉलच्या स्पर्धा मात्र आपल्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजे दि. १९ सप्टेंबरलाच सुरू झाल्या, तर त्यातील महिलांच्या ‘टी-२०’ क्रिकेट स्पर्धा दि. २१ सप्टेंबरपासून व पुरुषांच्या २७ सप्टेंबरपासून सुरू झाल्या. या स्पर्धेत भारताने १०० पेक्षा अधिक पदकांची कमाई केली. त्यानिमित्ताने...

भारताने केला श्रीगणेशा...

दिल्लीत १९५१ साली भारताने ‘आशियाई क्रीडा स्पर्धां’चे सगळ्यात आधी आयोजन केले होते. ‘आशियाई क्रीडा स्पर्धां’ची ती पहिलीच वेळ होती. त्यामध्ये आशिया खंडातील ११ देशांच्या एकूण ४८९ क्रीडापटूंनी त्यातील ५७ क्रीडाप्रकारांत सहभाग घेतला होता. जपानच्या खालोखाल भारताने त्यामध्ये दुसरे स्थान पटकावले होते. १९५० सालच्या त्या नियोजित स्पर्धा, तेव्हाही एक वर्ष पुढे ढकलल्यामुळे १९५१ साली खेळवण्यात आल्या होत्या.

‘एशियाड’

भारताने १९५१ नंतर पुन्हा एकदा १९८२ साली दिल्लीतच याचे आयोजन केले होते. दि. १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात ’दूरदर्शन’ चालू झाले असले तरी त्याचा पसारा खर्‍या अर्थाने वाढला होता-तो १९८२ साली. देशात झालेल्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धां’च्या प्रसारणामुळेच. तेव्हा स्पर्धेत सगळ्यांच्या वाहतुकीसाठी पुण्याजवळील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारखान्यात बनवलेल्या आणि नंतर एसटीच्या ताफ्यात लोकप्रिय झालेल्या ’एशियाड’ सर्वमुखी झाल्या.

गत स्पर्धेतला भारत

हांगझाऊच्या आधी २०१८ साली झालेल्या १८व्या ‘एशियाड’मध्ये भारताने ५७० क्रीडापटूंचे दल उतरवले होते आणि त्यांनी २९ खेळांमध्ये सहभाग घेतला होता. २०१८च्या स्पर्धेत १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्य, अशी एकूण ७० पदकांची त्यावेळेपर्यंत ‘आशियाई स्पर्धे’त मिळवलेल्या सगळ्यात जास्त पदकांची ती संख्या होती. त्यात भारत आठव्या स्थानावर राहिला होता. ‘हांगझाऊ स्पर्धे’त भारताने १९व्या स्पर्धेतील ११व्या दिवशीच ती पदकसंख्या पार करीत आधीचे अनेक विक्रम मोडले.

‘हांगझाऊ स्पर्धे’तले क्रीडाप्रकार

४० क्रीडांच्या सणात सहभागी होत आनंदात-उत्साहात परत आलेल्या आपल्या क्रीडापटूंनी सगळ्या भारतीयांना शतकोत्तर पदकांची भेट देऊन समाधानी केले आहे. त्याबद्दल आपण प्रथमतः ’इस बार सौ पार’ करणार्‍यांना धन्यवाद देऊ. अभिनंदनास प्राप्त असलेल्या भारताने जलतरण, धनुर्विद्या, धावणे, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, जलद चालणे, मॅरेथॉन, बॅडमिंटन, पाच जणांचे व तीन जणांचे बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, ब्रिज (पत्ते), बुद्धीबळ, चढणे (Climbing), क्रिकेट, सायकलिंग, घोडेस्वारी, तलवारबाजी, फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हॅण्डबॉल, टेनिस, टेबल टेनिस अशा ४० क्रीडाप्रकारांत भाग घेतला होता. भारताने त्यासाठी देशाच्या विविध प्रातांतील एकूण ६५५ क्रीडापटूंना त्यात उतरवलं होतं. सगळ्यात जास्त ८९ खेळाडू हरियाणातले होते, तर नंतर क्रमांक लागतो, तो ७३ खेळाडू उतरवलेल्या महाराष्ट्राचा. भारताच्या फक्त सिक्कीम आणि त्रिपुरा या दोघांपैकी तसेच लक्षद्वीप, लडाख, दादरा नगरहवेली, दीव-दमण यांच्यापैकी एकाचाही त्यात सहभाग नव्हता. अ‍ॅथलेटिक्सच्या ६८ जणांचा असणारा सहभाग हा सगळ्यात मोठा होता.

शतकमय भारत...

‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त भारतीय महिलांनी पुरुषांच्या अगोदरच क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. क्रिकेटमध्ये महिला व पुरूष पहिल्यांदाच सहभागी होत होते. भारतीय पुरुषांनी ’टी-२०’त पावसामुळे खेळ बंद पडल्याने भारताच्या जागतिक क्रमवारीच्या आधारावर अफगाणिस्तान विरुद्धच्या अंतिम लढतीत सुवर्णपदक मिळवले. बघून झाल्यावर लगेचच भारतात सगळे आता एकदिवसीय ‘विश्वकरंडक’ स्पर्धा बघत आहेत. चीनमधील पदकांचे शतक झळकवल्यावर क्रिकेटमधील शतके बघायला सगळे उत्सुक आहेत. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या सणात सहभागी होणार्‍या क्रिकेटपटूंचा उत्साह सगळे वाढवत आहेत. घरोघरी सणाचं वातावरण, हे क्रीडाविश्व घेऊन येत आहे.

भारतात ई-स्पोर्ट्स(मन)

भारतात सध्या जितके क्रिकेटचे बेसुमार आकर्षण दिसून येत आहे, त्याच्याच जोडीने असलेला आजकालचा खेळ म्हणजे ‘ई-स्पोर्ट्स.’ हा खेळ या ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त होता. आजच्या पिढीतील लोकांचा तो आवडीचा खेळ. ‘ई-स्पोर्ट्स’मध्ये तीन पत्ती, रमी, पोकर आणि फँटसीसारखे प्रकार वगळलेले असतात. केवळ स्पर्धात्मक खेळांत जिथे खेळाडू त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा वापर आभासी, इलेक्ट्रॉनिक गेम खेळण्याकरिता करतील, अशा खेळांना ‘ई-स्पोर्ट्स’ म्हणून स्पर्धेत उतरवले होते. भारताने यादेखील खेळात आपला सहभाग नोंदवला होता.

‘मूर्ती लहान; पण किर्ती महान’

या १९व्या ‘आशियाई स्पर्धेती’ल भारतीय चमूमध्ये वयाने सगळ्यात लहान असणारे, हे पाच खेळाडू होते :

१. धिनिधी देसिंघू १३ वर्षांची जलतरणपटू.
२. हशिका रामचंद्र १५ वर्षांची जलतरणपटू.
३. अनाहत सिंग १५ वर्षांचा स्क्वॅशपटू.
४. पूजा १६ वर्षांची उंच उडी धावक.
५. सविता श्री भास्कर १६ वर्षांची बुद्धीबळपटू.

भारताची चढती भाजणी...

’इस बार सौ पार’ असे पदकांचे शतक गाठायचे, असा संकल्प करून गेलेला भारत जेव्हा एकेका क्रीडाप्रकारात उतरू लागला, तसतसा तो वरच चढू लागला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजे दि. १९ सप्टेंबरलाच सुरू झालेल्या स्पर्धेत तीन रौप्य आणि दोन कांस्य, अशा पाच पदकांचा श्रीगणेशा भारतीय क्रीडापटूंनी दि. २४ सप्टेंबरला केला. तेव्हा भारत सातव्या क्रमांकावर होता. प्रारंभापासूनच यजमान देश चीन मात्र पहिल्या क्रमांकावर राहिला. गणेश विसर्जनाच्या रात्रीपासून यजमानापाठोपाठ कोरिया, जपान, उझबेकिस्तान, थायलंड यांच्या पाठोपाठ बरेच दिवस पदक तालिकेत भारत सहाव्या स्थानापर्यंत पोहोचलेला दिसत होता, त्या रात्रीअखेर सहा सुवर्ण, आठ रौप्य अन् ११ कांस्यपदकांची कमाई केली होती. नंतर जेव्हा मैदानी आणि इतर खेळ सुरू झाले, तेव्हा पदकतालिकेत चढ उतार होऊ लागले. बरेच दिवस भारत चौथ्या स्थानावर दिसू लागला. ‘हांगझाऊ स्पर्धे’तला बुधवार, दि. ४ ऑक्टोबरच्या दिवसापर्यंत भारत सर्वात यशस्वी ठरला होता. एकाच दिवशी तब्बल १२ पदकांची कमाई भारताने केली आणि एकूण पदकसंख्या ८१ पर्यंत पोहोचवली. दि. ४ ऑक्टोबरच्या पदकांत तीन सुवर्ण, पाच रौप्य व चार कांस्य, अशा १२ पदकांचा अंतर्भाव होता.

असे वर जात आणि सातत्य राखत शनिवार, दि. ७ ऑक्टोबर २०२३ला आपले क्रीडाप्रकारातील सहभाग घेऊन झाल्यानंतरच्या शेवटाला भारताने पदकतालिकेतले चौथे स्थान २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य अशा १०७ पदक संख्येने ’लॉक’ केले.

एक दोन साडेमाडे तीन...
 
आपल्या क्रीडापटूंना जसे प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन हात करायला लागत होते व त्यावर मात करीत ते जिंकत होते. तसेच चार हात चिनी पंच आणि क्रीडाधिकारी मंडळींशीदेखील करण्याची वेळ येत होती.

महिलांच्या १०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत आंध्र प्रदेशच्या ज्योती याराजी हिला मिळालेल्या कांस्यपदकाचे रुपांतर नाट्यमयरित्या रौप्यपदकात झालेले, या स्पर्धेत दिसून आले. ज्योती याराजी पक्की जाणून होती आणि ती त्या पुढच्या स्वानुभवाने पक्की शहाणी झाली होती. ज्योतीने कायमस्वरुपीच ध्यानात ठेवले आहे की, “भारत में रेस शुरू करने के लिए एक मॅन्युअल गन का इस्तेमाल करते हैं। वहीं, विदेशों में वे एक इलेक्ट्रॉनिक स्टार्टर का उपयोग करते हैं। मैं इससे होने वाली आवाज से परिचित नहीं थीं। इसलिए मुझे पता ही नहीं चला की रेस कब शुरू हो गई थी। मैंने तभी दौड़ना शुरू किया। जब मैंने अन्य अ‍ॅथलिटों को दौड़ते देखा। तशी चूक ज्योतीने परत कधीच केली नाही. पण, ‘हांगझोऊ स्पर्धे’त अजबच घडले. या शर्यतीत १२.९१ सेकंद अशी वेळ नोंदवत ती तिसरी आली. परंतु, भारताने चीनच्या यानी वूने ’एक दोन साडेमाडे तीन’ म्हणायच्या आधीच धावायला सुरुवात केल्याबद्दल आक्षेप नोंदवला. तांत्रिक समितीने त्या घटनेची शहानिशा करून चीनच्या त्या धावपटूला अपात्र ठरविले. त्यामुळे भारताच्या ज्योतीला कांस्यच्या जागी रौप्य बहाल करण्यात आले आणि ज्योती रौप्यपदकाची मानकरी ठरली, अशा घटना जागतिक स्पर्धांमध्येही कशा घडत असतात, त्याचे उदाहरण चीनमधील या स्पर्धेत दिसून आले. पण, असे जरी असले तरी दि. ४ ऑक्टोबरची घटना म्हणजे तशा घटनांवरचा कळसच ठरला. अतिशय सुमार दर्जाची पंचांची कामगिरी ‘हांगझाऊ स्पर्धे’त अनुभवायला मिळाली होती. आपल्या नीरज चौप्राने फेकलेला भाला नेमका कुठे पडला, हेच तेथील पंचांना कळत नव्हते. अंतर मोजण्याची अत्याधुनिक यंत्रणाच तेथे कूचकामी ठरली होती. म्हणून त्याला पुन्हा एकदा भालाफेक करण्यास सांगण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत, अशी घटना प्रथमच पाहायला मिळाली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याच्या घटनेत रौप्यपदक मिळवणार्‍या भारताच्याच किशोर जेनाच्या दुसर्‍या फेकीत ’फाऊल’ देण्यात आला होता. किशोर जेनाचा पाय आखलेल्या रेषेच्या मागे होता, हे उघडउघड दिसत होते. यावेळी नीरजने आपल्या सवंगड्याची बाजू मांडत पंचांशी चर्चा केली. त्यानंतर ती भालाफेक मान्य करण्यात आली. चीनच्या पंचांनी व पदाधिकार्‍यांनी प्रथम ज्योती याराजीसोबत वादग्रस्त निर्णय दिला आणि आता नंतर नीरज चौप्रा व किशोर जेनाबाबत वागले. नंतर शनिवार, दि. ७ ऑक्टोबरला पुरूष कबड्डीत भारत-इराण लढतीत भारताने जेव्हा सुवर्णपदक मिळवले होते, त्या सामन्यात शेवटच्या क्षणात ’डू-ऑर-डाय’ या नवीन नियमाप्रमाणे निर्णय देताना पंचांनी चुकीचे निर्णय घेत भारतावर अन्याय केला होता, त्यावेळी व्हिडिओ अंपायरची मदत घेण्यात आली होती. मग बरेच वादविवाद झाले आणि निर्णय भारताच्या बाजूने लागला होता. नेमके निर्णय घेण्याची क्षमता हांगझोऊच्या पंचांमध्ये नव्हती का, हे सारे ते चिनी जाणूनबुजून तर करत नव्हते ना! असा विचार आपण केला तर तो चुकीचा ठरू नये.

पॅरिसचे तिकीट...

यावेळीच्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त चमकदार कामगिरी करीत आपण जास्तीत जास्त क्रीडा प्रकारांत ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवायचा, असे ठरवून चीनला जाऊन आलेले आपले क्रीडापटू येताना पॅरिसची तिकीटही घेऊन येयचे विसरले नाहीत. अनेक क्रीडाप्रकारांत याआधीच तो कोटा विविध स्पर्धांमधून मिळाला असला तरी अनेक क्रीडाप्रकारांना तो अजून मिळालेला नाही आणि ही आलेली संधी आपण सोडलेलो नाही. धनुर्विद्येत (तीरंदाजी) सहा जणांसाठी, पाण्यात कलात्मकतेने पोहण्याची कला दाखवणार्‍या(आर्टिस्टिक स्विमिंग) दहा जणांसाठी, मुष्ठियुद्धात (बॉक्सिंग) ३४ जणांसाठी, ब्रेक डान्स (ब्रेकिंग) नृत्यक्रीडेत दोन जणांसाठी, हॉकीच्या दोन संघांसाठी, आधुनिक पेंटॅथलॉन (मॉडर्न पेंटॅथलॉन) की ज्या क्रीडा प्रकारात प्रत्येक स्पर्धकाला धावणे, घोडेस्वारी, पोहणे, तलवारबाजी, आणि पिस्तुलाने नेमबाजी, अशा एकूण पाच प्रकारांत भाग घ्यावा लागतो, त्या दहा जणांसाठी, समुद्राच्या लाटांवर नौकानयन (सेलिंग) करणार्‍या सहा जणांसाठी, (टेनिस) टेनिसपटूंना दोन, (वाटर पोलो) पोहण्याच्या तलावात गोल करणार्‍या वॉटर पोलो म्हणजे पाण्यात खेळायचा. पोलोच्या दोन संघांसाठी असे वाटे राखून ठेवले होते. त्या नऊ क्रीडा प्रकारांतील अंतिम सामन्यात पोहोचलेल्या क्रीडापटूला अथवा त्याच्या देशाला असे एकूण ७४ ‘ऑलिम्पिक कोटा’ आशिया खंडातील क्रीडापटूंना प्रदान करण्यात आला. त्यातील बरीच पॅरिसची तिकीटं भारताने मिळवली जसे की पुरूष हॉकी. २०२४च्या ‘पॅरिस ऑलिम्पिक’साठी मिळालेल्या त्या तिकिटांवर कोणाला देशाचे प्रतिनिधी म्हणून पाठवायचे, ते आता आपली ‘ऑलिम्पिक’ संघटना ठरवणार आहे. महिला हॉकी संघासारखी तिकीट काहींना मिळू शकली नाहीत.

चला परत भेटू...

आजपर्यंतच्या ‘आशियाई स्पर्धेत’ला भारताचा असणारा सहभाग भारताच्या दृष्टिकोनातून बघता सर्वात मोठा होता. काही क्रीडाप्रकारांत उच्च प्रतीचा संघ, तर काहींमध्ये दुसर्‍या फळीचे खेळाडू असलेले संघ उतरवले गेले. भारत सरकारने काही क्रीडा प्रकारांत संघ पाठवायचाच नाही, तर काही क्रीडा प्रकारांत विचारांती संघ पाठवायला परवानगी दिली होती. हांगझोऊला गेलेल्या काहींना ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळाला नाही. काही क्रीडा प्रकारांत मुलांना तो मिळालाय. ती आपली मुलं आता सराव करून पॅरिसला जातील आणि मुली नाही. अजून काही स्पर्धेंतून त्या तो कोटा मिळवू शकतील. त्यामुळे महिला हॉकीसारखा ज्यांना कोटा मिळू शकला नाही, त्यांनी नाउमेद होऊ नये. जास्तीत जास्त क्रीडापटू ऑलिम्पिकमध्ये दिसण्यासाठी आपण सगळ्यांनाच शुभेच्छा देऊ. आता चीनला जसे संघ गेले होते. तसेच पॅरिसमध्येही जाल, अशा त्यांना दिलेल्या या शुभेच्छा आहेत. असे आता आपण काहींबाबत आनंदी आहोत, तर काहींबाबत दुःखी आहोत. भारतातील खेळ ही एक भावना आहे आणि भारताच्या क्रीडा प्रतिभेचे संवर्धन, हे राष्ट्राला जागतिक स्तरावर पुढे नेण्याचा ध्यास आहे. खेळात जिंकणे किंवा पराभव महत्त्वाचा नसतो, तर खेळाची भावना आणि खेळाडूवृत्ती राष्ट्राला आनंद देते. असे आपण परत एकत्र येणार आहोत-‘पॅरिस ऑलिम्पिक’मध्ये. एइची - नागोया या जपानमधील प्रांतामध्ये २०२६च्या २०व्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धां’मध्ये. नागोया हे जपानमधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ही इशिकावा प्रांताची राजधानी आहे. त्या जपानच्या प्रतिनिधीकडे हांगझाऊ चीनच्या प्रतिनिधीने रविवार, दि. ८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी यजमानपद सुपुर्द करीत झेंडा हाती सोपवला गेला आहे.

’हार्ट टू हार्ट’ हे या स्पर्धेतील घोषवाक्यासहित पंधरवडाभर चाललेला, हा महोत्सव रविवारी संपवताना सौहार्द आणि सन्मान एकमेकांना प्रदान करीत सगळ्यांनी एकमेकांची रजा घेतली आहे आणि सांगितले की, ’चला पुन्हा भेटू नवीन मैदानांवर नवीन ठिकाणी’ तोपर्यंत आपले क्रीडापथक कसून सराव करत राहतील. आता आपण सारे जसे त्यांच्याकडे शतकी पदकांचे मागणे मागितले होते. तसेच शतकाचे मागणे ऑलिम्पिकसाठीही मागू. ते दिसायला जरी अवघड वाटत असेल तरी आपल्या क्रीडापटूंनी ते मनावर घेतले, तर ते अवघड नसावे. भारत मातेच्या पदकमलावर अर्पण करण्यास आपण सारे त्यांना प्रोत्साहित करीत आशीर्वाद देत राहू. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित सगळे याच विचारांचेच असतील, हे पक्के.
इति!

 श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी हॉकीपटू आणि खेलकूद आयाम प्रमुख, जनजाती कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आहेत.)
९४२२०३१७०४
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121