‘स्त्री-जीवन-स्वातंत्र्या’चा सन्मान

    08-Oct-2023   
Total Views |
Human Rights Activist Narges Mohammadi Won Nobel Peace Prize

नुकतीच ‘नोबेल शांतता पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. इराणमधील महिला अत्याचाराविरुद्धचा लढा आणि सर्वांसाठी मानवाधिकार व स्वातंत्र्याचा प्रचार, पुरस्कार करण्यासाठी त्यांना यंदाचे ‘नोबेल’ जाहीर झाले आहे. सध्या नर्गेस मोहम्मदी या तुरुंगात आपली शिक्षा भोगत असून, ‘नोबेल शांतता पुरस्कार‘ जिंकणार्‍या त्या १९व्या महिला आहे. हे पारितोषिक त्यांना दि. १० डिसेंबर रोजी ऑस्लो येथे, अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला प्रदान केले जाईल. विशेष म्हणजे, मोहम्मदी या २००३च्या ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेत्या शिरीन इबादी यांच्या नेतृत्वाखालील बिगर-सरकारी संस्था ‘डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राईट्स सेंटर’च्या उपप्रमुखदेखील आहेत.

कट्टर इस्लामी राजवट असणार्‍या इराणच्या निर्दयी सरकारविरोधात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोठा लढा उभारला. खोमेनी सरकारच्या अनेक स्त्रीविरोधी कायद्यांविरोधात त्यांनी आवाज उठवला. इराणमधील महिलांच्या संघर्षाचा, त्या प्रमुख चेहरा बनल्या. सरकारविरोधात अपप्रचार केला म्हणून त्या सध्या तेहरानमधील इविन या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. नर्गेस यांना आतापर्यंत १३ वेळा अटक करण्यात आली असून, पाच वेळा दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांच्या एकूण कारावासाची शिक्षा ही जवळपास ३१ वर्षं इतकी आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नर्गेस यांचे वडील शेतकरी होते.

१९७९ साली इस्लामिक क्रांतीनंतर राजेशाही संपुष्टात आली. यावेळी नर्गेस यांच्या नातेवाईकांनादेखील अटक करण्यात आली होती. सिटी ऑफ काजविन येथून ‘न्यूक्लिअर फिजिक्स’चे शिक्षण घेतलेल्या नर्गेस यांना महिला विद्यार्थी संघटनेत जाण्याची इच्छा होती. मात्र, ते शक्य न झाल्याने त्यांनी स्वतः एक संघटना काढली. महिला अधिकारांचे समर्थन करणार्‍या ताशक्कोल दानेशजुयी समूहातदेखील त्यांनी भाग घेतला. कट्टरपंथियांनी महिलांवर लादलेले निर्बंध त्यांनी झुगारून दिले होते. मानवाधिकार चळवळ उभारल्यामुळे त्यांना १६ वर्षे कारावासाची शिक्षा झाली. मोहम्मदी यांनी फाशीच्या शिक्षेच्या वापराविरुद्धच्या मोहिमेत स्वतःला झोकून दिले. इराणी तुरुंगात चालणारा राजकीय कैद्यांचा, विशेषतः महिलांचा छळ आणि लैंगिक हिंसाचार, यालाही त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच, सप्टेंबर २०२२ मध्ये इराणमध्ये महासा जिना अमिनी या कुर्दिश तरूणीला हिजाब व्यवस्थित न घातल्यामुळे पोलिसांनी कोठडीत ठेवून प्रचंड मारहाण केली होती. या मारहाणीत या तरुणीला आपला जीव गमवावा लागला होता. तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली. सरकारविरोधात ठिकठिकाणी तीव्र निदर्शने सुरू झाली. ‘स्त्री-जीवन-स्वातंत्र्य’ अशी घोषणा देत लाखो इराणी नागरिकांनी सरकारची क्रूरता आणि स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध शांततापूर्ण निषेध आंदोलनात भाग घेतला. सरकारने आंदोलकांवर कठोर कारवाई करण्यात सुरुवात केली. ५००हून अधिक निदर्शकांना मारण्यात आले. हजारो जखमी झाले, पोलिसांच्या गोळीबारात अनेक अंध नागरिकांनाही ठार करण्यात आले. २० हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली. नर्गेस यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन उभे राहिले. त्यामुळे त्यांना तुरुंगवासासह तब्बल १५४ फटक्यांची शिक्षा सुनावली गेली. आजही त्या तेहरान येथील तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, नर्गेस यांचे पती तगी रहमानी हेदेखील सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक आहेत. त्यांनीसुद्धा १४ वर्षांचा कारावास भोगला असून, सध्या ते त्यांच्या मुलांसह फ्रान्समध्ये राहत आहे. आपल्या मुलांपासून दूर असलेल्य नर्गेस यांना आपल्या मुलांना प्रत्यक्ष भेटून आता कित्येक वर्षं उलटली आहेत. नर्गेस यांनी ‘व्हाईट टॉर्चर’ नावाचं एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी तुरुंगातील आपले अनुभव आणि इतर कैद्यांच्या कथा लिहिल्या आहेत. नर्गेस यांच्याआधी इराणी महिला न्यायाधीश, वकील तथा शिक्षिका शिरीन इबादी यांनाही २००३ साली ‘शांततेचे नोबेल’ मिळाले होते. सध्या त्या लंडनमध्ये अज्ञातवासात राहत आहे. नर्गेस यांना मिळालेले ‘नोबेल’ हे प्रत्येक कट्टरपंथियाविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाला नवे बळ देणारे आहे.

७०५८५८९७६७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.