मुंबई : गेल्या काही वर्षात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) प्रगतीचे नवनवीन शिखर गाठत असतानाच आता इस्त्रोकडून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. इस्त्रोवर दररोज १०० हून अधिक हल्ले होत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली आहे.
याविषयी बोलताना एस सोमनाथ म्हणाले की, इस्त्रोवर दररोज १०० हून अधिक सायबर हल्ले होत आहेत. तसेच सायबर हल्ल्याच्या या घटना अशा वेळी घडत आहेत ज्यावेळी इस्रो दररोज यशाची नवीन शिखरे गाठत आहे. परंतू, अशा हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इस्रो मजबूत सायबर सुरक्षा नेटवर्कने सुसज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही, असेही ते म्हणाले.
केरळमधील कोची येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सायबर परिषदेच्या १६ व्या सत्राच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना सोमनाथ म्हणाले की, अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि चिप्सच्या वापराने चालणाऱ्या रॉकेट तंत्रज्ञानामध्ये सायबर हल्ल्यांची शक्यता खूप जास्त आहे.
सोमनाथ म्हणाले की, सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात मदत करणारे उपग्रह देखील आहेत, ज्यावर सायबर हल्ले होत असतात. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जातात. या सर्वांचे रक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच प्रगत तंत्रज्ञान एक वरदान आणि धोका दोन्ही असल्याचेही ते म्हणाले.