जेरुसलेम : इस्रायल हमासच्या दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जात असतानाच आता लेबनॉनमधील दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर हल्ला केला आहे. लेबनॉनमधून इस्रायलच्या सीमेत क्षेपणास्त्रे आणि मोर्टार डागण्यात आले आहेत. लेबनॉनमधून डागलेली क्षेपणास्त्रे माउंट डोव परिसरात पडली आहेत.
या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. हिजबुल्लाहने इस्रायलवर हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी इस्रायल संरक्षण दलाने लेबनॉनमध्ये तोफांचा मारा केला आहे.
दरम्यान, पॅलेस्टाईनची इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने शनिवारी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या लोकांच्या संख्येची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दहशतवादी संघटना हमास इस्रायली शहरांमध्ये महिला आणि मुलांवर अत्याचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यानंतर आता लेबनॉननेही इस्त्रायलवर हल्ला केला आहे.