‘विस्मृतिचित्रे’ ते ‘भारतीय विरागिनी’

भारतीय स्त्रीजीवनाच्या आस्था उलगडणारा साहित्यिक प्रवास...

    07-Oct-2023
Total Views | 67
Interview With Bharatiya Viragini Author By Dr. Aruna Dhere

 आज सर्वत्र स्वागत होत असलेले डॉ. अरुणा ढेरे यांचे ‘भारतीय विरागिनी’ हे चिंतनगर्भ पुस्तक विरागी संत कवयित्रींच्या कथा-व्यथा मांडते. या पुस्तकावर दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे कालच पुणे येथे आयोजित मुक्त संवादाचा साहित्यपूर्ण कार्यक्रमही अगदी उत्साहात संपन्न झाला. असे हे ‘भारतीय विरागिनी’ पुस्तक अरुणाताईंच्या साहित्याचा, संप्रदायांचा पापुद्रा उलगडून त्याचे अचूक विश्लेषण मांडते. या आशयघन पुस्तकाच्या आगमनासोबतच अरुणाताईंनी २५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘विस्मृतिचित्रे’ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दोन्ही पुस्तकांच्या आशयाचे पदर जरी भिन्न असले, तरी भारतीय स्त्रीजीवनाची आस्था हा समानधर्मी धागा या दोन साहित्यकृतींमध्ये प्रतिबिंबीत होतो. म्हणूनच ‘विरागिनी’ची वाट ‘विस्मृतिचित्रे’ने आरवली असावी, हे मानायला निश्चितच जागा आहे. असा हा स्त्रीजीवनाच्या आस्थेचा संवेदनशील मार्ग डॉ. अरुणा ढेरे यांनी आकाशवाणीसाठी गोपाळ अवटी यांना दिलेल्या मुलाखतीत रसज्ञतेने मांडला होता. अवटी यांनी ‘सृजन संवाद-भाग १’ या त्यांच्या पुस्तकात विविध क्षेत्रांतील ५० मान्यवरांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या. त्यापैकी अरुणाताईंची २०११ साली नाशिक येथे घेतलेली मुलाखत यानिमित्ताने पुन:प्रसिद्ध करीत आहोत.

काही पुस्तकं अशी असतात की, आपण ती वाचतो आणि त्यांच्या प्रेमात पडतो. प्रेमात पडण्याची कारणं अनेक असू शकतात. आशय असेल. मांडणी असेल. लेखकाची शैली असेल. तो लेखक आवडता असेल. अशी बरीच कारणं असू शकतात; पण काही पुस्तकं मात्र अशी आहेत की, ती तुम्हाला ढवळून काढतात. अस्वस्थ करतात.

अरुणाताई, खरं म्हणजे तुम्हाला सलामच केला पाहिजे की, जवळपास १८०७ ते १९७१ हा कालखंड म्हणजे सुमारे १७० वर्षांत इतकं मोठं चिंतन घडलं. मनन घडलं. वेगवेगळी सामाजिक परिवर्तनातली स्थित्यंतरं घडली. हे सगळं घडत असताना ज्या स्त्रियांनी प्रसिद्धीपासून दूर राहून किंबहुना प्रसिद्धी हा विचारच न ठेवता जे काही केलं, ते फार मोठ्या पद्धतीनं समोर आलं नव्हतं. जे तुमच्या पुस्तकानं पुढं आणलं. मला तर या क्षणी आता असा भास होतोय की, या पुस्तकातल्या सगळ्याच कर्तृत्ववान स्त्रिया मग त्या अगदी कार्पेंटर असतील, अवंतिकाबाई गोखले असतील, या सगळ्या तुमच्या मागे फेर धरून उभ्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही बसलेल्या आहात. मी तुम्हाला पाहतो आहे. पहिलाच प्रश्न हा की, स्त्रीविषयीची ही जी खोल आस्था आहे, त्याचं मूळ मला माहीत करून घ्यायचं आहे आणि ते या संदर्भासह माहीत करून घ्यायचं आहे की, अतिशय आदरणीय असे तुमचे पिताजी रा. चिं. ढेरे आणि तुमची तितकीच समृद्ध ग्रंथशाळा, जिला तुम्ही हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. तर हा आस्थेचा मार्ग कसा आहे?

एक तर फार लहान होते, तेव्हापासून मी एका मोठ्या वाड्यामध्ये वाढले आणि वाडासंस्कृतीचे जे काही भले-बुरे परिणाम व्यक्तींवर किंवा त्या पिढीवर होत आले, अशा एका पिढीमधली मी की, ज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याभोवतीचं एक बायकांचं जग मला बघायला मिळालं. जे आजच्या छोट्या आणि काहीशा अलिप्त आणि संवादाचा अभाव असलेल्या विभक्त आणि फ्लॅट संस्कृतीमधून सहज शक्य होत नाही, असं एक खूप मोठं जग बायकांचं माझ्याभोवती होतं, ज्यामध्ये कुटुंबात वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळ्या भूमिकांमधल्या बायका मी पाहत होते. त्यांच्याविषयीच्या आस्थेचा धागा हा अगदी लहानपणापासून नकळत्या वयात माझ्यापर्यंत आला.

दुसरी गोष्ट, मगाशी तुम्ही जो माझ्या वडिलांचा उल्लेख केलात, त्यांच्याकडून मिळालेली असं म्हणूया. कारण, लोकसंस्कृतीचा त्यांचा अभ्यास व त्यासाठी नाना निमित्तांनी आमच्या घरी येणारे लोकसंस्कृतीचे उपासक, त्यांच्या तोंडची गाणी, ज्या वाडासंस्कृतीत मी वाढले, तिथे साजरी होणारी व्रतं, सण, उत्सव आणि त्यानिमित्तानं खुलं होणारं बायकांचं एक मोठं जग, त्यांनी सांभाळलेली गाणी, कथा, गोष्टी, व्रतकथा या सगळ्यांपासून एकूण स्त्रीजीवनाविषयीची माझी जाण आणि कुतूहल वाढत गेलं आणि तिसरी गोष्ट घरातल्या समृद्ध ग्रंथशाळेची! मी त्याला ‘शाळा’ म्हणते याचं कारण, ती खरोखरंच दुसरी शाळा होती. पुस्तकांसोबत जगणं आणि वाढणं ही खूप मोठी गोष्ट आहे-माणसाच्या आयुष्यात. ती आपल्याला इतकी सहज, नकळत जन्मापासून मिळावी, हे माझं भाग्य आहे. ज्या घराच्या भिंतीच पुस्तकांच्या होत्या, अशा घरात मी वाढले आणि घरातल्या कुठल्याही पुस्तकाला हात लावावा आणि वाचत सुटावं, असं वाचन फार लहान वयापासून केलं. त्यामधून मनात कुतूहल जागं होत गेलं, ते निरनिराळ्या बायकांविषयीचं. बायकांना मखरात बसविणं, त्यांना देवी म्हणणं आणि दासीची वागणूक देणं, या दोन्ही टोकांमध्ये अनेक पायर्‍यांवर, अनेक पातळ्यांवर खरं भारतीय स्त्रीजीवन आहे.

मला नेहमी असं वाटतं की, भारतीय स्त्रीची तिच्या बाबतीतली एक विसंगती अशी आहे की, आपण त्यांच्याविषयीचं कुठलंही एक विधान केलं, त्यांच्या प्रगतीविषयीचं केलं किंवा त्यांच्या अधोगतीविषयीचं केलं, तर त्याच वेळी त्याच्या अगदी विरुद्ध टोकाचं विधानही इथे तितकंच खरं असू शकतं. कारण, हा समाज एकजिनसी नाही आणि त्यामुळे मध्य प्रवाहातल्या बायकांचं आयुष्य, वरच्या स्तरातल्या बायकांचं आयुष्य, खेड्यापाड्यातल्या दलित, ग्रामीण स्त्रियांचं आयुष्य आणि मेरेवरच्या समाजातल्या बायकांचं आयुष्य की, ज्यांना तुमचा कायदा, देश काहीच माहीत नाही, अशाही प्रकारचं ज्यांना आपल्या हक्काची जाणीव झालेली आहे, अशा बायका, ज्यांना ती नाही अशा बायका, तर हे सगळं जेव्हा पुस्तकातून आणि प्रत्यक्षातून आपल्याभोवती आलं, त्यावेळेला त्यांच्याविषयीचं कुतूहल आणि त्यांच्या शक्तीचा, कर्तबगारीचा शोध कुठेतरी घेतला पाहिजे, अशी इच्छाही मनामध्ये जागी झाली.

जवळपास २१ अग्निशिखांची मांडणी या तुमच्या ’विस्मृतीचित्रे’ मध्ये आहे. खरं तर दोन वर्षे वेगवेगळ्या वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून हे लेख येत होते. अतिशय अभ्यासपूर्ण असे हे लेख, त्यांचा हक्कच होता की, चांगल्या पुस्तकरुपाने ते दस्तावेजीकरण म्हणून राहावं. मला या पुस्तकाबद्दल अशी उत्सुकता आहे की, जे सुधारकांच्या परस्परांच्या संबंधांचं जाळं, असा जो तुम्ही उल्लेख केलेला आहे, त्याचा अभ्यास करणं इतकं सोपं नव्हतं. हे पुस्तक निर्माण करीत असताना त्या जाळ्याची वीण तुम्हाला समजून घ्यावी लागली असेल की, एकाच काळात अगदी आगरकरांपासून त्यांचे विरोधकही होते आणि समकालीन सगळी इतरही समर्थक मंडळीही होती. तुम्ही अतिशय उदारपणे सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे, तर हे परस्पर संबंधांचं जे जाळं आहे, त्याच्याविषयी तुमच्या मनात काय होतं नेमकं?

असं पाहा की, एकोणिसावं शतक हाच महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठा महत्त्वाचा कालखंड आहे. पुढच्या महाराष्ट्राची जडणघडणच या काळातलं जे आपल्याला देणं आहे, त्याच्या हातानं झालेली आहे. तेव्हा एका बाजूला स्त्रीजीवन हाच या सगळ्यात अनेक प्रश्न घेऊन महाराष्ट्रात जे प्रबोधन घडत होतं, त्याच्यात स्त्री हा एक केंद्रस्थानी असणारा प्रश्न होता आणि त्या जीवनात बदल आवश्यक आहे, असं वाटणारे पुरूष ही या काळातली खूप मोठी देणगी आहे. कारण, असे आगरकर उभे झाले. न्यायमूर्ती रानडे उभे झाले. गोपाळराव देशमुख उभे झाले. महात्मा फुले उभे झाले. कर्वे आले पाठोपाठ, तर या मंडळींना जे जाणवत होते ’विस्मृतीचित्रे’ मध्ये तुम्ही पाहाल, तर तुमच्या लक्षात येईल की, त्यांचे विचार ज्या समाजाच्या निरनिराळ्या भागांपर्यंत झिरपले, त्याच्यामधून सामान्य घरांतली सामान्य पुरुष माणसंसुद्धा जागी झाली, त्यात कुणी कुणाचे सासरे आहेत, कुणाचे भाऊ आहेत, कुणाचा नवरा आहे. कुणाचे मुलगे आहेत की, ज्यांना आपल्या आया, आपल्या बायका, बहिणी, सुना या शिक्षित व्हाव्या असं वाटलं. शिक्षण ही आज आपल्यासाठी अनेक गोष्टींमधली स्त्रियांच्या प्रगतीची एक गोष्ट असं वाटत असलं, तरी १९व्या शतकाचा विचार करता, जोपर्यंत बायकांना शिक्षणाची संधीच नाही, तोपर्यंत शिक्षण हे त्यांच्यासाठी आयुष्याचं दुसरं नाव होतं की, एक जीवंतपण त्यांचं ओळखलं जाण्याची ती एक खूण होती. त्यांना जागं करणं, माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांना एक साधन देणं म्हणजे त्यांना शिक्षण देणं. कारण, तोपर्यंत माणूस म्हणूनही कुणी त्यांची दखल घेत नव्हतं. म्हणजे बालविवाह होते. सतीप्रथा नुकतीच बंद झाली होती. विधवांचा पुनर्विवाह मंजूर नव्हता. अशा एका काळामध्ये की, जिथे पुरुषांच्या नुसतं समोर येणं किंवा पुरुष घरात असताना मोठ्यानं हसणं, हासुद्धा जीवघेणा मार पडेपर्यंतचा गुन्हा ठरत होता, अशा काळात बायका जगत होत्या. त्या सगळ्याच बाजूंनी वंचित होत्या. सगळ्याच बाजूंनी शोषित होत्या आणि त्या केवळ समाजातल्या खालच्या थरातल्या स्त्रिया होत्या, असं नाही. उच्चवर्णीयांच्या घरातही तीच परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत होती. तुम्ही आजसुद्धा बघा की, ज्यावेळेला घरातल्या कुटुंबाच्या वंशावळी तयार होतात, त्यावेळेला स्त्रियांच्या अंगांनी वंशवृक्ष हा कधी झालेला नाही. मी ज्यावेळेला ’विस्मृतीचित्रे’च्या निमित्ताने या बायकांचा शोध घ्यायला लागले, तेव्हा मी ज्या घरांमधून गेले, तिचे फोटो किंवा लग्न झालेल्या मुली कुठल्या घरांमध्ये गेल्या आहेत, याचीसुद्धा पुरेशी माहिती नाही. म्हणजे वडिलांकडून आपण घराणी सांगत आलो; पण आईकडूनच्या घराण्याची माहिती फार कमी वेळेला आपल्याला मिळत गेली, असं माझ्या लक्षात आलं. तेव्हा अवघडच होतं. या सगळ्या बायकांच्या आयुष्याचा, जगण्याचा विचार करता आणि मग शिक्षणासाठी म्हणजे सुरुवातीच्या काळात बायकांच्या सभांना जायचं, तर या बायकांना घरामधून परवानगी नसायचीच! पाटाखाली पुस्तक ठेवून तांदूळ निवडताना ते पुढे सरकवून वाचायचं कुणी नाहीय म्हणून किंवा चपला बाहेर टाकायच्या भिंतीवरून आणि देवाला जातेय असं सांगून बाहेर जाणं. कारण, पायात चपला घालणं, हीसुद्धा स्त्रीच्या दृष्टीने पुरूष माणसांचा आणि समाजाचा अपमान करणारी गोष्ट होती. ज्यावेळेला बायकांनी पहिल्यांदा डोक्यावर छत्री, पायात चपला आणि अंगात जाकीट घालून जाणार्‍या बायका पाहिल्या तेव्हा समाजाने टीका केली की, या बायका आमचा अपमान करताहेत. आता या डोक्यावर छत्री धरायला लागल्या. पायात चपला घालायला लागल्या. कुठपर्यंत यांची मजल जाणार? तेव्हा आगरकरांनी असं लिहिलं होतं की, त्याही माणूस आहेत. ऊन, वारा, पाऊस हा जसा तुम्हा पुरुषांना लागतो, तसाच बायकांना लागतो आणि त्यामुळे हे साहजिक आहे. तुमच्या लक्षात येईल की, इतक्या गोष्टी नाकारल्या गेल्या होत्या की, शिक्षण हे एक हत्यार आहे, एक साधन आहे. या बायकांच्या विकासासाठी, त्यांची अस्मिता जागी करण्यासाठी, त्याही माणूस आहेत, हे समाजाला दाखवून देण्यासाठी असं, त्या काळातल्या सुधारकांना वाटलं. त्यांची चरित्रं आणि त्या काळातलं इतर साहित्य वाचत असताना मला स्वतःला अभ्यासातून हे जाणवलं की, यांचे परस्परांचे, सुधारणांच्या एकूण पद्धतींविषयी मतभेद असू शकतील कदाचित. आधी राजकीय की सामाजिक किंवा इतर काही; पण स्त्रीप्रश्नांची गोष्ट जेव्हा आली, तेव्हा आपापल्यापरीनं ही माणसं त्यासाठी मात्र समाजाच्या विरोधात ठामपणाने उभी राहिलेली दिसतात.
 
या पुस्तकातल्या आशयाकडे आज मी कमीच वळणार आहे. एका वाचकाच्या मनातली म्हणून माझी उत्सुकता ही आहे की, अशी पुस्तकं निर्माण होतात साहित्यामध्ये, ते एक मोठं भाग्य असतं वाचकांचं आणि अभ्यासकांचंसुद्धा. जी अप्रकाशित साधनं तुम्हाला हाताळावी लागली असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचताना खूप अडचणी आल्या असतील. काही वेळा वीटही आला असेल, असं म्हणवत नाही. अर्थात, तर या संशोधन साधनांपर्यंत पोहोचण्यातले काही अनुभव आम्हाला सांगा.

हे काम करायला लागले ते कुठे-कुठे अहेतूक वाचत असताना या बायकांच्या कर्तृत्वाविषयी प्रथम उल्लेख मला मिळाले तेव्हापासून. म्हणजे असं जाणवलं की, एक-दोन मोठी नावं आपल्याला माहीत आहेत. सावित्रीबाई फुले माहीत आहेत. आनंदीबाई जोशी, पंडिता रमाबाई माहीत आहेत; पण त्यांच्या पलीकडे अशा कित्येक बायकांची नावं माझ्यासमोर येतात की, त्यांनी त्या काळात केलेल्या कामांविषयीच्या उल्लेखानं जे जग खूप मोठ्या तर्‍हेनं खळबळून गेलेलं आहे. त्यांना ती गोष्ट खूप मोठ्या मिळकतीची वाटलेली आहे. या बायकांनी काहीतरी एक मोठं ध्येय गाठलंय. ध्येय गाठलेलं आहे, हे मला तर त्या काळाच्या वाचनानं जाणवत होतंच; पण मग या बायकांविषयी अधिक माहिती मिळते का? कसा संघर्ष केला त्यांनी? कशी असतील त्यांची आयुष्यं? असं कुतूहल वाटून मी अभ्यास केला आणि त्यासाठी अक्षरशः मला काळ पिंजून काढावा लागला. कारण, खरं सांगायचं तर काळ हा सर्वभक्षकच असतो आणि त्याची भूक खूप मोठी असते, त्यामुळे तो सारखा गिळत असतो आणि त्यातून बायकांची आयुष्यं गिळणं खूप सोपं असतं. वामनराव चोरघडेंच्या एका कथेतली वाक्यं मला आठवतात. साधी कथेची सुरुवात होती की, ज्यात एका घराचं वर्णन त्यांनी केलं होतं, ’असं बैठं कौलारू घर होतं. घराच्या पुढे अंगण होतं. अंगणात एक आड होता पाणी भरण्यासाठी आणि बायकांना जीव देण्यासाठी.’

तेव्हा याप्रकारचं आयुष्य असताना ज्या बायकांनी काही वेगळं करून दाखवलं, त्या बायकांचं धैर्यही मोठं असणार, असं वाटून मी कामाला लागले आणि ते शोधत असताना मला त्या काळातल्या मासिकांची, मुख्यतः नियतकालिकांची खूप मोठी मदत झाली. कारण, त्यांच्यावरती पुस्तकं निघणं अवघडच होतं. म्हणजे बघा, आजही तुम्ही विचार केलात, तर पुरुषांविषयी स्त्रियांनी लिहिलेली चरित्रं पुष्कळ आहेत. अगदी मराठीतलं पहिलं रमाबाई रानड्यांनी जे लिहिलं आत्मचरित्र आहे, ’आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी’, तेही त्यांचं स्वतःचं असण्यापेक्षा रानड्यांचं अधिक आहे. त्या रानड्यांशी एकरूप झाल्या होत्या, म्हणून ते त्यांचंही होतं असं आपण म्हणू.

आपल्याजवळ काही महत्त्वाचं आहे. आपण लिहिलं पाहिजे, याची जाणीव त्या बायकांना नाही, त्यामुळे त्यांनी स्वतः फार कमी लिहिलेलं. त्यांच्याविषयी फार कमी लिहिलं गेलेलं. मग काय मिळालं मला तर जुनी अनियतकालिकं खूप धांडोळलीत मी. ती माझ्या घरातच बर्‍याच मोठ्या प्रमाणात होती आणि काही संदर्भांसाठी मला चांगल्या ग्रंथालयांची मदत झाली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय असेल, ठाण्याचं असेल किंवा पुण्यातीलही असतील, शासकीय असतील, याच्यामधून शोध मात्र हट्टाने घेत गेले. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, कुठेतरी एक-दोन ओळींची बातमी असायची की, शाहू छत्रपतींनी प्रतिनिधी म्हणून आपल्या राज्यातल्या, आपल्या संस्थानातल्या दोन मुलींना राष्ट्रीय काँग्रेससाठी पाठविलेलं आहे किंवा सामाजिक परिषदेसाठी पाठवलेलं आहे. तेव्हा विशेष वाटायचं, मग या मुली कोण? या मुली शाळेत शिकणार्‍या होत्या. त्या शाळेचा जुना मोठा इतिहास लिहिलेला होता, तर तो इतिहास शोधा. मग त्याच्यात त्यांचे उल्लेख मिळाले. मग तिथे पाहा. मग कोल्हापूर संस्थानात असेलच. मग कोल्हापूरला चौकशी करा. अनेकदा नातेवाईकांचा हात धरूनच मला पुढे जावं लागलं. काहींचे तर ’विस्मृतीचित्रे’मध्ये तुम्ही पाहाल की, फोटोसुद्धा मिळालेले नाहीत. उपलब्ध नाहीत, त्यांच्या नवर्‍यांचे किंवा वडिलांचे फोटो मी छापलेले आहेत. ते मला जे मिळाले; पण बर्‍याच ठिकाणी त्यांचे नाहीत.
 
अर्थात, याउलटही सकारात्मक अनुभव होते, जे परिशिष्टामध्ये उल्लेखिलेले आहेत. तुमचे प्रत्येक प्रकरणाचे जे शेवट आहेत, ते मोठे बोलके वाटतात मला. अस्वस्थ करणारेही वाटतात. तुम्ही तीन-चार ओळींतल्या शेवटच्या परिच्छेदात असा काही तरंग सोडून देता की, तुमच्याही मनातली अस्वस्थता वाचकांपर्यंत पोहोचते. म्हणजे एखाद्या डोहामध्ये खडा टाकावा आणि ते तरंग किनार्‍यापर्यंत यावेत, तसा तो परिच्छेद असतो. हे जे अस्वस्थ करणारे, हुरहुर लावणारे शेवट आहेत, त्याच्यामधून काही प्रश्नही निर्माण होतात. कधी तुमची खंतही जाणवते. त्याच्यापैकी एक म्हणजे इंदुमती राणेंचा उल्लेख करायचा झाला, तर ’काळानं काही त्यांची दखलच घेतली नाही,’ अशी एक खंत तुम्ही व्यक्त केली आहे. थोडं सविस्तर असं काय सांगायचंय, या विषयावर? कारण, असं तर बर्‍याचजणांच्या वाट्याला आलंच.

असं बर्‍याच जणांच्या वाट्याला आलं. इंदुमती देवी त्याच्या प्रतिनिधी आहेत, असं मला वाटलं. मुळात शाहू छत्रपतींसारखा माणूस आपली सूनबाई शोधताना, ज्या काळामध्ये डोक्यावर पुस्तकं ठेवा, चालून दाखवा, सुईत दोरा ओवून दाखवा, गाणं म्हणून दाखवा अशी सुनेची परीक्षा घेतली जात असे त्या काळात. हा माणूस ’चा-ची-चे’ विभक्ती विचारतो. बोक्याचं स्त्रीलिंग विचारतो आणि सुनेची परीक्षा याप्रकारे तिच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेऊन घेतो आणि अशी सून घरात आणतो व तिला घडविण्याची एक जिद्द बाळगतो. ती मुलगी इतकी हुशार. दुर्दैवाने दोनच वर्षांमध्ये विधवा होते, तरी आपल्या सासर्‍याच्या मदतीने एक नवं जग पाहू इच्छिते. डॉक्टर होऊ इच्छिते आणि सगळा प्रतिसाद देते शाहू छत्रपतींच्या स्वप्नाला.

मला असं वाटलं की, एका अतिशय परंपरेने बांधलेल्या समाजामध्ये, स्त्रीच्या शालीन, कुलीन आणि खानदानीपणाविषयीच्या कल्पना समाजात फार पक्क्या असताना, अशा समाजामध्ये इंदुमतीदेवी राहिल्या. कुणाचा आधार नसताना म्हणजे नवरा तर अकराव्या वर्षी गेलेला. सासरेही फार लवकर गेले. त्या तरुणपणाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवायच्या आधीच! अशा वेळेला घरच्या इतर सगळ्यांचा त्यांच्या शिक्षणाला विरोध, त्यामुळे पुढे उच्चशिक्षण घेऊ न शकलेल्या अशा बाईंनी स्वतःचे एक उत्तम ग्रंथसंग्रहालय निर्माण करावं, अभ्यास करावा. उपनिषदांपासून नाना विषयांवर अभ्यास करावा, रस घ्यावा त्याच्यात. कोल्हापुरात त्यांनी पहिली महिलांची संघटना ’वनिता’ समाजाच्या निमित्ताने सुरू करावी, बायकांना एक मोकळं जग मिळावं, यासाठीची धडपड करावी. हे मोठं विलक्षण होतं. संगीत नाटकासारख्या कलांमध्ये रुची घ्यावी. बालगंधर्वांच्या पहिल्या लाँग प्ले रेकॉर्डस् निघाव्यात. यासाठीची खटपट त्यांनीच केलेली आहे.

होय, तो उल्लेख फार उत्सुकता वाढविणारा आहे.

किंवा टागोरांच्या महाराष्ट्रीय मैत्रिणीची समाधी शोधून काढून त्याच्याविषयी दखल घ्यावी. या सगळ्या गोष्टी इतक्या अपूर्वाईच्या आताच्या काळातही आहेत, तर मला असं वाटलं की, या तर्‍हेच्या कर्तबगार स्त्रियांना वाचकांपुढे आणताना एक सत्कार्य घडत आहे. जर खरोखरच समाजानं त्यांची योग्य आठवण ठेवली असती, तर स्त्रीजीवनाचा एक मोठा समूह त्या समाजाशी जोडलेला जो होता, त्याला विकासाच्या वाटा आणखी लवकर खुल्या झाल्या असत्या. या सगळ्यामध्ये कुठेही स्त्रित्वाच्या कल्पनांना, समाजाने जे आदर्श निर्माण केलेले होते, त्यालाही धक्का न लावता त्यांनी जे मिळवलं, ते खूप मोठं होतं. शांतपणाने संघर्ष करणे, ही एक गोष्ट असते. बंडखोरीची भाषा बोलत तोडफोड करणं, ही आणखी एक गोष्ट असते. समाजाच्या चौकटी लवचिक करणं, हाही एक संघर्ष असू शकतो स्वतःच्या देशात.
 
मला यानिमित्ताने आणखी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचंय की, त्या काळच्या सबंध समाजात दुर्दैवाने पुरुषांना हजारो वर्षांची मोकळीक आणि ज्ञान मिळविण्याची संधी मिळत गेली. त्या तुलनेत आता १५० वर्षांपासून ती संधी बायकांना मिळायला लागली असं दिसतं, तरीही मिळालेली घ्यायला पुन्हा बायकांना ५०-६० वर्षे जावी लागली. त्याच्यामध्ये कृष्णाबाई केळवकरांसारखी प्रातिनिधिक स्त्री आहे असं मी म्हणते; पण तुम्ही विचार करा की, लहान वयात लग्नं व्हायची. मुलींची आणि मुलांचीही. मुली लग्न होऊन घरात आल्या की, त्या घराशीच पूर्ण बांधल्या जायच्या आणि मुलं म्हणजे मुलगे जे असायचे, त्यांना मान, नवे शिक्षण, नवा समाज, अनुभव आणि मग अनेक वाटा खुल्या व्हायच्या. हीच गोष्ट सेनापती बापट यांची. त्या काळातल्या अनेकांच्या बाबतीत असं घडतं की, त्यांची आयुष्यं पुढे वेगळी होत जायची. अंतर पडत जायचे मुलं आणि मुलींच्या अनुभवांमध्ये. मग एका अर्थाने सहजीवन सुरूच व्हायचं नाही, अशी स्थिती अनेकांची झाली आहे. यात बायकांच्या ज्या सीमाबद्ध मर्यादा आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी राहाणं आणि जग पालथं घालणारे पुरूष पलीकडे जाणं, हे विठ्ठल रामजींच्या बाबतीतही झालं आणि त्या काळात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणारी पहिली विद्यार्थिनी होती-कृष्णाबाई केळवकर. तेव्हा अशी एखादी ’जन्ममैत्रिण’ जो त्यांनी शब्द वापरलाय, अशी एखादी स्त्री मिळणं ही गोष्ट शक्य नव्हती; पण मला असं वाटतं की, असं झालं असतं तर मग स्त्री-पुरुषांनी बरोबरीने एक समाजाच्या कल्याणासाठी काही प्रयत्न करणं, ही गोष्ट फार लवकर साध्य झाली असती नाही का?

खरं भाग्य मी माझं म्हणते की, या बायकांच्या आयुष्यापर्यंत मला पोहोचता आलं. कारण, मला नेहमी असं वाटतं की, आपल्या आयुष्याला एका मोठ्या गोष्टीचा स्पर्श होणं, ही सामान्य माणसासाठी खूपच महत्त्वाची गोष्ट असते आणि तो स्पर्श झाला की, तुमच्यामध्ये पुष्कळसं काही जागं होत असतं. तुम्हालाही पुष्कळ घडायला आणि शिकायला मिळत असतं. तेव्हा खरी ऋणी मी या बायकांची आहे, असं मला वाटतं. ’वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही’ अशी व्यथा व्यक्त करताना ही व्यथा जगलेल्या अनेक स्त्रियांची दुःखं आणि त्यांचं जीवन तुम्ही बोलकं केलंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवलंत. हे वाड्मयीन इतिहासात आता एका अर्थानं पक्कं झालेलं आहे की, २०० वर्षांनीसुद्धा जेव्हा अभ्यास होईल, महाराष्ट्रीय ’स्त्री’चा, समाजकारणाचा तेव्हा, हे पुस्तक मदतीला धावून येईल.

गोपाळ अवटी
(गोपाळ अवटी हे आकाशवाणी पुण्याचे निवृत्त संचालक आहेत)

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121