नांदेड : नांदेड दुर्घटनेचे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेले असून शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीत शासकीय रुग्णालयातील रिक्त पदांबाबत सरकारने काय केलं असा सवाल हायकोर्टाने सरकारला विचारला आहे.
नांदेड मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. याबाबतची पहिली सुनावणी शुक्रवारी पार पडली आहे. यावेळी हायकोर्टाने सरकारला शासकीय रुग्णालयातील रिक्त पदांबाबत काय केलं असा सवाल केला आहे.
तसेच यासंदर्भात गेल्या ६ महिन्यात कोणती पावलं उचलली याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा असा आदेशही हायकोर्टाने सरकारला दिला आहे. यासोबतच शासकीय रुग्णालयातील औषधांच्या पुरवठ्याबाबत हायकोर्टाकडून माहिती मागवण्यात आली आहे. वैद्यकीय प्राधिकरणानेही प्रतिज्ञापत्र सादर करावे असे हायकोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे.