वसई : मुंबईतील कचरा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर पूल ते सातिवली खिंड दरम्यान आणून टाकला जातो. ही बाब बेकायदेशीर आहे. त्यामुळे तातडीने हा प्रकार थांबविला पाहिजे, अशी मागणी भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारिणी सदस्य केदारनाथ म्हात्रे यांनी पोलिस निरीक्षक, महामार्ग ट्राफिक पोलिस विभाग कोल्ही-चिंचोटी यांच्या कार्यालयात भाजपा शिष्टमंडळासह लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ट्रक रिकामा करणाऱ्या एकाही वाहनचालकावर कारवाई केली नाही. कचऱ्यामुळे महामार्गाच्या कडेला पावसाळ्यात पाण्याचा निचरा करणारी गटारे बुजली जातात. रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे होतात. कचरा कुजून दुर्गंधी पसरते. प्रदुषण व आरोग्याची समस्या निर्माण होते. यासोबतच डेब्रीजही टाकले जाते. या प्रकरणी जित सिंग, शिवपुजन गुप्ता आदी भाजप कार्यकर्त्यांनीही आवाज उठवला होता. यादरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस यांनी या संदर्भात कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशभर 'स्वच्छता अभियान' राबविण्यात आले होते. मात्र, यानंतरही रस्त्याच्या लगतचा कचरा हटविण्याची जबाबदारी महापालिका किंवा महामार्ग प्राधिकरणाने घेतली नाही. महामार्गालगत कचऱ्याचे ट्रक रिकामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केदारनाथ म्हात्रे यांनी कोल्ही चिंचोरी विभागाचे पोलीस निरिक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.