‘Sarita's Kitchen’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वयंपाकघराला व्यवसाय आणि यशोशिखरे गाठण्याचे व्यासपीठ बनवणार्या सरिता पदमन यांच्या जीवनप्रवासाविषयी...
सरिता उत्कर्ष पदमन यांचा जन्म सांगोल्याचा. सरिता यांचे वडील किराण्याचे दुकान चालवायचे, तर आई गृहिणी. सरिता यांचे प्राथमिक शिक्षण सांगोल्यातील नगरपालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सांगोला विद्यामंदिर येथून पूर्ण केले. मुळात सरिता यांना लहानपणापासून टीव्हीवरील बातम्या पाहायला आवडायचे. त्यामुळे आपण वृत्तनिवेदक व्हावे, असे त्यांना वाटत होते. परंतु, ते स्वप्न त्यांना पूर्ण करण्यासाठी त्यावेळी योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. मग त्यांनी विज्ञान शाखेत सांगोला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सरिता वक्तृत्व स्पर्धा, निबंध, हस्ताक्षर अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत.
सरिता यांच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा त्या फक्त ११ वर्षांच्या होत्या. त्यावेळी आईने कुटुंबाला आधार देत सरिता आणि इतर भावंडांना चांगले शिक्षण देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यावेळी सरिता यांची आई घरकामे करणे, झुणका-भाकर केंद्रामध्ये ३००-४०० भाकर्या बनवणे, अशी कामे करीत असत. त्यानंतर सरिता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून घरगुती मेस सुरू केली. त्यावेळी सरिता यांना स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. त्याकाळात सरिता आणि त्यांची आई दोघी मायलेकी मिळून, दिवसभरात ८० पेक्षा जास्त डबे करायच्या. मात्र, सरिता यांनी स्वयंपाकघरात आईला मदत करूनही शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. पुढे सरिता यांना कठोर परिश्रमामुळे ‘इन्फोसिस’मध्ये नोकरीदेखील लागली. एवढेच नाही तर सरिता यांच्या प्रचंड मेहनतीमुळे त्यांना स्कॉटलंड, युकेमध्ये काम करण्याची संधीही मिळाली.
पुढे सरिता यांचे नौदलात कार्यरत असणार्या उत्कर्ष पदमन यांच्याशी लग्न झाले. मग त्या विशाखापट्टणमला स्थायिक झाल्या. तिथेही अनेक आव्हानांना तोंड देत स्थानिक खाद्यसंस्कृती आणि शिक्षिकेचा कोर्स सरिता यांनी केला. त्यानंतर पतीच्या नौदलातील सेवानिवृत्तीनंतर सरिता कुटुंबासह पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी सरिता यांच्या पतीने त्यांना पुन्हा नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आठ वर्षांच्या ब्रेकमुळे अनेक नकार पचवत अखेर सरिता यांनी ‘कॉग्नीझंट’मध्ये नोकरी मिळवली. त्यावेळी सकाळी ३ वाजता घरातून बाहेर पडणार्या सरिता कामामुळे १२-१४ तास घरी परतत नसतं. पण, त्यावेळी आपल्या लहान मुलाला आपली जास्त गरज असल्याचे लक्षात येताच, सरिता यांनी मातृत्वाची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारत नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या पूर्वप्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. दरम्यान, आईकडून शिकलेल्या पाककृतींचा वापर करून केटरिंग व्यवसायही सरिता यांनी सुरू केला. त्यावेळी समाजमाध्यामांचा वापर करून घरबसल्या सरिता वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याच्या ऑर्डर्स मिळवत.
मात्र, त्यांच्या यशाचा खरा प्रवास २०१८ मध्ये सुरू झाला. सरिता यांच्या बहिणीने त्यावेळी युट्यूब चॅनल सुरू केले होते. मग सरिता यांनी त्यांच्या बहिणीच्या सल्ल्यावरून ’Sarita's Kitchen’ हा युट्यूब चॅनल सुरू केला. त्यावेळी फक्त एक महिना आपण हा युट्यूब चॅनलचा प्रयोग करून पाहू, असे सरिता यांनी ठरवले. पण, हळूहळू त्यांना व्हिडिओ तयार करणे आवडू लागले. मग रात्ररात्र जागून त्या खाद्यपदार्थ बनवतानाचे व्हिडिओ तयार करू लागल्या. त्यांनी सुरुवातीला स्थानिक पाककृतींचे व्हिडिओ अपलोड केले. दरम्यान, गणेशोत्सवात त्यांनी मोदकांचा व्हिडिओ अपलोड केला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या युट्यूब चॅनलची विशेष गोष्ट म्हणजे, प्रमाणबद्ध रेसिपी आणि पाककृती समजावून सांगण्याची त्यांची हातोटी. यामुळे त्यांच्या चॅनलला भरघोस प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत सरिता यांच्या युट्यूब चॅनलवर ९०० हून अधिक व्हिडिओ उपलब्ध असून एक दशलक्ष सबस्क्रायबर्सही आहेत.
या प्रवासात सरिता यांना काही कटू अनुभवांनाही सामोरे जावे लागले. एकदा काही लोकांनी त्यांच्या कामावर टीका केली. परंतु, सरिता यांनी आत्मविश्वास गमावला नाही. त्या प्रामाणिकपणे काम करीत राहिल्या आणि प्रेक्षकांसाठी चांगल्या दर्जाचे व्हिडिओ त्या आजही तयार करतात. सध्या सरिता यांच्या टीममध्ये १२ हून अधिक लोक काम करतात. तसेच त्यांचे पती उत्कर्ष पदमनदेखील यात मदत करतात. तसेच सरिता यांनी घरगुती व्यवसायाची माहिती देणारे व्हिडिओसुद्धा तयार केले, ज्यामुळे १०० हून अधिक महिलांनी घरगुती व्यवसाय सुरू केले. त्याचीच पोचपावती म्हणजे त्यांच्यावर असलेलं प्रेक्षकांचं प्रेम. त्यामुळेच ’Sarita's Kitchen’ला ’YouTube India Creator Camp'मध्ये पॅनल सदस्य होण्याचा मान मिळाला. तसेच सरिता लाकडी घानाच्या तेलाचा व्यवसायही करतात, ज्याची जाहिरात सरिता आपल्या ’Sarita's Kitchen’ या चॅनलच्या माध्यमातून करतात, तरी भविष्यात लोकांपर्यंत अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ पोहोचवून, त्यातून उद्योजक घडविण्याचा सरिता यांचा मानस आहे. तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
-सुप्रिम मस्कर