प्रवासी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार
31-Oct-2023
Total Views | 64
मुंबई : प्रवासी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन गर्दीला आळा बसावा, यासाठी कर्मचार्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी बुधवार, दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) रजनीश गोयल यांनी सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुंबईतील वाढत्या गर्दीचा फटका सर्वसामान्यांसह सर्वच घटकांतील नोकरवर्गाला बसत आहे. मागील अनेक वर्षे या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्या त्या स्तरातील कर्मचार्यांच्या वेळात बदल करण्याची मागणी जोर धरत होती. याची मध्य रेल्वेने गांभीर्याने दखल घेत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेव्या ‘डीआरएम’ स्तरावर त्या त्या विभागाच्या प्रमुखांना त्यांच्या कर्मचार्यांसाठी वेळेत बदल करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे गोयल यांनी सांगितले.
क्रॉसिंग गेट बंद करणार
लेव्हल क्रॉसिंगबाबत ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास सर्वच क्रॉसिंग गेट बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
असा आहे दोन शिफ्टमध्ये कामाचा पर्याय
‘डीआरएम’ विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:४५ आणि सकाळी ११:३० ते संध्याकाळी ७:४५ अशा दोन शिफ्टचा पर्याय सुरुवातीला चाचणी आधारावर हे बदल असून, महिना ते महिना अशा तत्त्वावर बदल आधारित आहे. बुधवार, दि. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असून या बदलांसाठी कर्मचार्यांची मतेही मागविणार येणार आहेत.
अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारांसाठी मोफत सेवा
वाढत्या गर्दीमुळे होणारे रेल्वे अपघात विचारात घेऊन रेल्वेने उपाययोजना म्हणून ‘इमर्जन्सी मेडिकल रूम’ (ईएमआर)ची सोय केली आहे. आतापर्यंत ३३ स्थानकांवर ‘ईएमआर’च्या सुविधेसाठी संबंधितांशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. आणखी २६ स्थानकांवर सर्व्हे सुरू आहे. यात विशेष म्हणजे रेल्वे स्वतः अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारांसाठी मोफत सेवा पुरविणार आहे.