नवी दिल्ली : कतारमध्ये अटकेत असलेल्या भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असा दिलासा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिला आहे.
कतारमध्ये कार्यरत असलेल्या निवृत्त नौसैनिकांना गतवर्षी हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर तेथे खटला चालविण्यात येत होता, अखेरीस त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला आहे. भारत सरकारने याविषयी कतारच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कतारमध्ये या नौसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीविषयी त्यांनी ‘एक्स’वर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कतारमध्ये अटकेत असलेल्या ८ भारतीयांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारत सरकार या खटल्यास सर्वाधिक महत्त्व देत असल्यावर त्यांच्याशी बोलताना भर दिला आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असून त्याविषयी कुटुंबियांशी समन्वय साधला जात असल्याचेही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, निवृत्त नौसैनिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे नौदलप्रमुख अॅडमिरल हरि कुमार यांनीदेखील स्पष्ट केले आहे.