नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चीनकडून मोठा निधी घेतल्याच्या आरोपावरून न्यूजक्लिक या ऑनलाइन पोर्टलशी संबंधित ३० ठिकाणी छापे टाकले. यासोबतच पोलिसांनी न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकारांच्या घरांचीही झडती घेतली. याच प्रकरणासंदर्भात दिल्ली पोलीस माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या घरीही पोहोचले. दरम्यान पोलीस घरी झडती घेण्यासाठी आल्याची माहिती येचुरी यांनी स्वत: एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.
दिल्ली पोलिसांच्या छाप्यात सीपीआय(एम)चा कोणताही सहभाग नसल्याचा दावा ज्येष्ठ नेत्याने केला. येचुरी म्हणाले, "दिल्ली पोलिस आमच्या घरी पोहोचले आहेत कारण आमच्या पक्षाचे सहकारी आमच्यासोबत राहतात, ज्याचा मुलगा न्यूजक्लिकमध्ये काम करतो. ते छापेमारी का करत आहेत याविषयी कोणतीही माहिती नाही."
येचुरी पुढे म्हणाले, "पोलिस हे सर्व का करत आहेत हे देखील सांगत नाहीत? पोलिसांनी स्पष्टीकरण द्यावे अशी आमची इच्छा आहे. हा प्रसारमाध्यमांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. त्यामुळेच (भारताचा) जगातील वृत्तपत्रांमध्ये क्रमांक लागतो. मात्र आता ह्या निर्देशांकात सातत्याने घसरण होत आहे. दुसऱ्या बाजूने आपण लोकशाहीची जननी आहोत असा प्रचार केला जात आहे, असे ही येचुरी म्हणाले.
तसेच या छापेमारीनंतर प्रेस क्लब ऑफ इंडियाने सांगितले की न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकार आणि लेखकांच्या घरांवर छापे टाकल्यामुळे आम्ही चिंतित आहोत. त्याचबरोबर आम्ही घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत आणि तपशीलवार निवेदन जारी करू, असे प्रेस क्लब ऑफ इंडिया सांगितले.
दरम्यान एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्यूजक्लिकशी जोडलेल्या विविध परिसरांवर सध्या दिल्ली पोलिसांचे छापे हे यूएपीए आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत दि. १७ ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यावर आधारित आहे. UAPA, IPC कलम 153A (दोन गटांमधील वैर वाढवणे), IPC कलम 120B (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.