बळवंत रामचंद्र बर्वे हे सावरकरांच्या प्रभावळीतले, अभिनव भारतचे सभासद. स्वतांत्र्य सेननानी. जॅक्सन वध खटल्यात गुन्हेगार ठरवून बळवंत यांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. त्यांचे राष्ट्रप्रेम, निष्ठा शब्दातीत. त्यांच्या ‘स्मृती’ या लेखात जागवल्या आहेत.
१९०९ सालचा जॅक्सन वधाचा खटला, मैत्रीची, देशभक्तीची अनेक उदाहरणंया एका खटल्यासाने घालून दिली. मैत्री सावरकरांशी आणि मैत्र देशाशी, स्वराज्याशी, स्वाभिमानाशी. बळवंतजींचा जन्म कोठूरे, एक अगदी छोटेसे गाव, निफाड तालुका, जिल्हा नाशिक. ज्याची लोकसंख्या आज ५०२२ आहे असे हे गाव. सावरकर महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले होते हे त्याचे उदाहरण. बर्वे तसे सधन शेतकरी कुटुंबातले, पण त्यावेळी भारतात बहुदा हे विचार नसावेच, सधन-निर्धन, शेतकरी-नौकरदार, शिक्षित-अशिक्षित तेव्हा फक्त एकच गोष्ट प्रत्येकाच्या मनात होती, ती म्हणजे स्वातंत्र्य. त्यामुळे प्रत्येक परिवाराने आपापल्यापरीने या यज्ञात समर्पण केले आहे आणि त्या यज्ञाचे फलित म्हणजे आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य.
कोठुरेच्या अभिनव भारतच्या सदस्यांच्या बैठका बर्वेच्या मदतीशिवाय अशक्य होत्या. अभिनव भारतच्या कामाच्या तीन पायर्या होत्या. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी जिला पाया म्हटले जाऊ शकते ती म्हणजे सार्वत्रिक जनमत, विशेषतः तरुणांमध्ये इंग्रजी राजवटीविरूद्ध तयार करणे, दुसरी पायरी, आता ज्यांची मते अशा तर्हेनेतयार झालीत त्यांना प्रत्यक्ष लढाईला तयार करणे, त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणे. तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे या सगळ्या कामासाठी लागणारा पैसा उभा करणे. या तिन्ही पायर्यांचा आढावा घेण्यासाठी १९०६ साली अभिनव भारताचीगुप्त सभा घेण्यात आली होती. बर्वेंनी ठाणे आणि भिवंडी भागात अभिनव भारतच्या ध्येयाचा प्रसार-प्रचार केला. सावरकरांनी लिहिलेले ’मॅझिनी’ हे पुस्तक जास्तीत जास्त घरांमधून वाचले जाईल हे बघितले, त्यातून देशप्रेमाची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनात प्रज्वलित होईल आणि सतत तेवती राहील हा त्यामागचा उद्देश. हे पुस्तक जवळ बाळगणे हाच त्यांचा गुन्हा ठरला आणि त्यांना गोवण्यासाठी पुरावा.
त्यांचे अभिनव भारतचे काम बघता, त्यांचा अभिनव भारतच्या सदस्यांशी संपर्क बघता, त्यांनी जॅक्सन वधातसुद्धा मदत केली असणार हे इंग्रजांनी हेरले. अशा छोट्या छोट्या कड्या जबरदस्तीने जोडल्या गेल्या. ज्याचे फलित म्हणजे बळवंत रामचंद्र बर्वे जॅक्सन वधाच्या कटात सामील होते हे इंग्रजांनी सिद्ध केले आणि त्यांना दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. देशप्रेम, देशाभिमान हाच गुन्हा ठरवला गेला. राजद्रोहाची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटून आल्यावर ते परत कोठुरे येथे गेले. कालांतराने त्यांचा मृत्यू त्यांच्या जन्मगावी झाला. दुःख हेच आहे की अशा जाज्वल्य स्वातंत्र्य सेनानी विषयी काहीही माहिती आपल्या जवळ नसावी, त्यांची जन्म तारीख, मृत्यू, त्यांचे छायाचित्र, त्यांचे एकंदर आयुष्य. त्यांनी पूर्ण भावनेने समर्पण केले हेच खरे. एकेका देशभक्ताचे स्मरण हीच त्यांच्या कार्याची ओळख आणि त्यांना श्रद्धांजली ठरेल.
सोनाली तेलंग
९८८११३२३९३