युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करणे राष्ट्रनिर्मिती – पंतप्रधान नरेंद्र मोदी
28-Oct-2023
Total Views | 101
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना ५१,००० पेक्षा जास्त नियुक्ती पत्रे वितरित केली. देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान देशभरातील ३७ ठिकाणे मेळाव्याशी जोडली गेली होती.
या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की रोजगार मेळाव्यांचा प्रवास एका महत्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली. केंद्र आणि रालोआ शासित राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित विविध रोजगार मेळाव्यांमध्ये लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. आजही ५०,००० पेक्षा जास्त तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी उमेदवारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार्या पारंपारिक क्षेत्रांना सरकार बळकट करत आहे, त्याचबरोबर नवीकरणीय ऊर्जा, अंतराळ, ऑटोमेशन आणि संरक्षण निर्यात यासारख्या नवीन क्षेत्रांना प्रोत्साहन देत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन संधी खुल्या होत आहेत असे सांगत, त्यांनी, ड्रोनच्या मदतीने पिकांचे मूल्यांकन आणि पोषक तत्वांच्या फवारणीची उदाहरणे दिली. स्वामित्व योजनेंतर्गत जमिनीच्या मॅपिंगसाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती भागात ड्रोनचा वापर करून औषधे वितरित केल्याचा त्यांनी उल्लेख केला, ज्यामुळे अंदाजे वेळ २ तासांवरून २०-३० मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. स्टार्टअप्सना ड्रोनचा खूप फायदा झाला आहे आणि नवीन रचना आणि तंत्रज्ञान तयार करण्यात मदत झाली आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
युवकांना क्षमतावर्धनासाठी केंद्राच्या योजना
नवीन संधींचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी युवकांना सुसज्ज करणाऱ्या कौशल्य आणि शिक्षणाच्या उपक्रमांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नवीन वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी, आयआयएम आणि आयआयआयटी सुरू झाले आहेत आणि पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत करोडो तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. विश्वकर्मांसाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. कौशल्यांचे पुनर्शिक्षण आणि कौशल्य अद्ययावत करणे हा आजचा क्रम असल्याने सर्व विश्वकर्मांना आधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांशी जोडत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.