ठाणे : वनवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला देऊ नयेत, या मागणीसाठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समिती व आदिवासी एकता परिषदेच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात आला. यावेळी अदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले, नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी, आदिवासी नेते हंसराज खेवरा आदीच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने वनवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. भर दुपारी गगनभेदी घोषणा देत साकेत मैदानातुन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुच करीत मोर्चेकऱ्यानी मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून सर्वच समाज बांधव पेटले असून शुक्रवारी ठाण्यात वनवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर वनवासींच्या आरक्षणात धनगरांचा समावेश नको , या मागणीसाठी उलगुलान मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ठाणे पालघर अशा विविध जिल्ह्यातून अनेक वनवासी बांधव सहभागी झाले होते. नामसाधर्म्याचा फायदा घेऊन अनेकांनी खोटी जात प्रमाणपत्रे बनवून वनवासी समाजाचे आरक्षण लाटल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. तेव्हा, आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर मुंबईचा पाणी पुरवठा तोडण्यासह महामार्ग बंद पाडण्याचा इशारा वनवासी समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.