नवी दिल्ली: पोलीस अधिका-यांनी गरीब आणि दुर्बल घटकांप्रती नेहमीच संवेदनशील असले पाहिजे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच सक्रिय असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केले. हैदराबादस्थित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत ७५ आरआर भारतीय पोलिस सेवा (भापोसे) तुकडीच्या दीक्षांत कार्यक्रमास संबोधित करताना ते बोलत होते.
संवेदनशीलत संविधानास मानवी स्वरूप देते. संविधान निर्मात्यांनी संविधानात घालून दिलेल्या भावनेची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पोलीस अधिकार्यांनी देशातील गरीब, दुर्बल घटक आणि घटकांप्रती नेहमीच संवेदनशील राहून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच सक्रिय राहायला हवे. नियुक्तीच्या ठिकाणची स्थानिक भाषा, परंपरा आणि इतिहासाचा आदर राखून लोकांसोबत संवेदनशीलता जपून कायद्याचा आत्मा समजून घेऊन पुस्तकी दृष्टिकोनातून पुढे जावे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली ९ वर्षे आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत, असे गृहमंत्री शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ईशान्य भारत, नक्षलवाद आणि जम्मू आणि काश्मीर या सुरक्षेविषयक तीन हॉटस्पॉटमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास यश येत आहे. या हॉटस्पॉटमध्ये 2004 ते 2014 या 10 वर्षांमध्ये 33,200 हिंसक घटना घडल्या होत्या. तर गेल्या ९ वर्षात यातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये 12,000 पर्यंत घट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले आहे, असेही गृहमंत्री शाह यांनी यावेळी नमूद केले आहे.