मेट्रोच्या गर्डर लॉचिगसाठी ३० ऑक्टोबर पर्यंत वाहतुक बदल
26-Oct-2023
Total Views | 273
ठाणे : ठाण्यातील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेवर गर्डर बसविण्याच्या कामासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुक बदल लागू करण्यात आले असून यानुसार या रस्त्यावरील पर्यायी मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत हे वाहतुक बदल लागू असणार आहेत, असे वाहतुक पोलिसांनी स्पष्ट केले.
ठाणे शहर तसेच घोडबंदर भागात वडाळा-घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून येथील कासारवडवली ते वेदांत रुग्णालय या भागात मेट्रो मार्गिकेच्या खांबावर ‘यु’ आकाराचा गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान वाहतुक कोंडी किंवा अपघात होऊ नये यासाठी वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत.
घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहतूकीसाठी कासारवडवली ते वेदांत रुग्णालय या भागात एकेरी मार्गिका खुली असेल. तर हलकी वाहने ऑस्कर रुग्णालयाजवळून सेवा रस्त्याने पुढे कासारवडवली सिग्नल येथून मुख्य मार्गाने किंवा पेट्रोल पंप येथून सेवा रस्त्याने वेदांत रुग्णालय येथून मुख्य रस्त्याने वाहतुक करतील. हे वाहतुक बदल ३० ऑक्टोबरपर्यंत मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत लागू असतील.