रामलीला मैदानावर होणारी 'मुस्लिम महापंचायत' रद्द; उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली
26-Oct-2023
Total Views | 183
1
नवी दिल्ली : २९ ऑक्टोबर २०२३ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या ‘अखिल भारतीय मुस्लिम महापंचायत’ला दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात कार्यक्रमाच्या पोस्टर्सवर पण टिप्पणी केली आहे. कार्यक्रमाची पोस्टर्स धार्मीक भावना भडकवणारी असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
यापूर्वी दिल्ली पोलिस आणि दिल्ली महापालिकेनेही या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली होती. याविरोधात 'मिशन सेव्ह कॉन्स्टिट्यूशन' नावाच्या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक वकील महमूद प्राचा हे आहेत. या संस्थेचा दावा आहे की ती जनतेमध्ये, विशेषत: दलितांमध्ये घटनात्मक अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करते.
दिल्ली पोलिसांनी कार्यक्रमाला जातीयवादी ठरवून मनमानी पद्धतीने परवानगी रद्द केली, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी दिल्ली पोलिसांचा निर्णय कायम ठेवला. ते म्हणाले की, कार्यक्रमाचे पोस्टर पाहता दिल्ली पोलिसांचा निर्णय मनमानी मानता येणार नाही.