गवताळ कुरणे झाली पक्षीमय; देशविदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

    25-Oct-2023   
Total Views | 226
migrated birds


मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्यातील गवताळ कुरण अधिवासांवर आता स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. पाणथळ भागांप्रमाणेच आता गवताळ प्रदेशांमध्ये देखील देश-विदेशातून अनेक स्थलांतरित पक्षी दाखल झालेले दिसून येत आहेत. पुणे जिल्ह्यातील भिगवण, बारामती भागात या पक्ष्यांची रेलचेल पहायला मिळत आहे.
दरवर्षी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांतुन विविध पक्षी स्थलांतर करत असतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान हे पक्षी भारतात स्थलांतर करतात. मुख्यत्वे हे पक्षी युरोपातुन स्थलांतर करत असून पॅलिड हॅरियर, मोन्टेगो हॅरियर, ग्रेटर स्पॉटेड इगल, स्टेप इगल, कॉमन केस्ट्रल या शिकारी पक्ष्यांचा त्यामध्ये समावेश आहे. याचबरोबर, लार्क, पिपिट्स, वॅगटेल्स, युरोपियन रोलर, कॉमन स्टोनचॅट, ब्ल्यू चिक्ड बी इटर असे अनेक पक्षी आता दिसू लागले आहेत. या पक्ष्यांच्या दर्शनाने भिगवण परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना मिळाली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

palid harrier


पॅलिड हॅरियर म्हणजेच पांढुरका भोवत्या हा पक्षी आग्नेय युरोपातून दरवर्षी भारत आणि आग्नेय आशियात स्थलांतर करतो. मोन्टेगो हॅरियर हा लांब पल्ल्यात स्थलांतर करणारा पक्षी असून तो युरेशियातुन भारतीय उपखंडात स्थलांतर करतो. ग्रेटर स्पॉटेड इगल या पक्ष्याला बुटेड इगल असेही म्हंटले जाते. पुर्व आणि मध्य युरोपासह, रशिया, चीन आणि आशियाच्या काही भागांमध्ये हा  आढळतो. “ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान येणाऱ्या या पक्ष्यांमुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळाली असून पक्षीप्रेमी आणि सामान्य पर्यटकांची भिगवण परिसरात गर्दी जमू लागली आहे. पक्षी छायाचित्रकारांनाही यानिमित्ताने चांगली संधी मिळते आहे”, अशी माहिती 'अग्निपंख बर्डवॉचर ग्रुप'चे संदीप नगरे यांनी 'मुंबई तरूण भारत'शी बोलताना दिली.


समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121